
आंबेगाव : तालुका दुष्काळग्रस्त म्हणून उशिरा जाहीर झाल्याने नुकसानभरपाईसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांना अत्यल्प कालावधी मिळाला आहे. त्यातच आवश्यक कागदपत्रे मिळविताना तसेच ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईच्या अर्जापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार (ता. १९) रोजी संपल्याने शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे शासनाने नुकसानभरपाईचे अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांना यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पाण्याअभावी रब्बी हंगामातील पेरण्यांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
नुकसानभरपाईचा अर्ज दाखल करण्यासाठी सातबारा उतारा, आठ-अ उतारा यांसह विविध आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. ही कागदपत्रे ऑनलाइन उपलब्ध करून घेताना इंटरनेट सेवा खंडित होणे, संकेतस्थळ अथवा ऑनलाइन प्रणालीमध्ये तांत्रिक अडथळे येणे, सर्व्हरची समस्या निर्माण होणे आदी अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे मुदतीत अर्ज दाखल करणे अनेक शेतकऱ्यांना शक्य झालेले नाही.
शासनाने अडचणींची दखल घ्यावी
दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केवळ ऑनलाइन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागू नये. शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेऊन अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवावी. तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वडगावपीर येथील सोसायटीचे अध्यक्ष दिलीप पोखरकर, लोणी सोसायटीच्या अध्यक्ष रुक्मिणी वसंत वाळूंज, माजी अध्यक्ष शरद वाळूंज, पहाडरा सोसायटीचे उपाध्यक्ष खंडू वायकर, सरपंच मच्छिंद्र वाघ तसेच लोणी-धामणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
शासन या मागणीची दखल घेऊन नुकसानभरपाईच्या अर्जासाठी मुदतवाढ जाहीर करणार का, याकडे आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
