सामाजिक

दुष्काळी मदतीसाठी अर्जाची मुदत वाढवा ; आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांची मागणी; कागदपत्रे मिळविताना ऑनलाइन अडथळ्यांचा फटका

1011386357

आंबेगाव : तालुका दुष्काळग्रस्त म्हणून उशिरा जाहीर झाल्याने नुकसानभरपाईसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांना कमी कालावधी मिळाला आहे. त्यातच सातबारा, आठ-अ उतारा यांसह आवश्यक कागदपत्रे मिळविताना ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकसानभरपाईचे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार (ता. १९) रोजी संपल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी शासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

आंबेगाव तालुक्यातील अनेक गावांना यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून, रब्बी हंगामातील पेरण्यांवरही परिणाम झाला आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई महत्त्वाची आहे. मात्र, तालुका उशिरा दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याने अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेसा वेळ मिळाला नसल्याची भावना आहे.

नुकसानभरपाईचा अर्ज दाखल करण्यासाठी सातबारा उतारा, आठ-अ उतारा यांसह विविध कागदपत्रांची आवश्यकता आहे. ही कागदपत्रे ऑनलाइन काढताना अनेकदा इंटरनेट सेवा खंडित होणे, संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येणे, प्रणाली संथ होणे अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून वेळेत अर्ज दाखल करणे अनेकांना शक्य झालेले नाही.

शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी

दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केवळ तांत्रिक अडचणींमुळे नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेऊन अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ द्यावी. तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वडगावपीर येथील सोसायटीचे अध्यक्ष दिलीप पोखरकर, लोणी सोसायटीच्या अध्यक्ष रुक्मिणी वसंत वाळूंज, माजी अध्यक्ष शरद वाळूंज, पहाडरा सोसायटीचे उपाध्यक्ष खंडू वायकर, सरपंच मच्छिंद्र वाघ तसेच लोणी-धामणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

शासन या मागणीची दखल घेऊन नुकसानभरपाईच्या अर्जांसाठी मुदतवाढ जाहीर करणार का, याकडे आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related posts

सामाजिक कार्यकर्ते हनुमंत टाव्हरे यांच्या पाठपुराव्यामुळे तलाठी व मंडल अधिकारी यांना प्रिंटर भेटले !!

Chief Editor

समर्थ फार्मसी मध्ये वन्यजीव सप्ताहाचे आयोजन ; सर्पदंशाबाबत अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक उपचारपद्धतीचा स्वीकार करा – डॉ.सदानंद राऊत

Chief Editor

समर्थ आय.टी.आय बेल्हे च्या ६३ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो कंपनी मध्ये ऑन जॉब ट्रेनिंगसाठी निवड !!

Chief Editor

Leave a Comment