
“ज्ञान मेंदूत साठवा, आईला देव माना आणि रुग्णसेवेत ईश्वर शोधा”; समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे प्रेरणादायी व्याख्यान
पंचनामा प्रतिनिधी – जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञान, जिद्द, मेहनत आणि संस्कार यांची सांगड घालणे आवश्यक आहे. मिळवलेले ज्ञान मेंदूत साठवून त्याचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करा, आईला देव माना आणि रुग्णसेवेत ईश्वर शोधा,” असा मोलाचा संदेश पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी विद्यार्थ्यांना दिला.
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर बेल्हे येथे ‘शून्यातून विश्व’ या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द, चिकाटी आणि सेवाभाव यांचे महत्त्व त्यांनी आपल्या अनुभवांतून विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती यांच्या पूजनाने आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय लोंढे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. लहाने यांनी ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर विषयाचे सखोल ज्ञान आत्मसात करून त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करणे महत्त्वाचे आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवता येते. अपयशाने खचून न जाता त्यातून शिकण्याची वृत्ती जोपासावी आणि आपल्या ध्येयाप्रती प्रामाणिक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
आईचे स्थान प्रत्येकाच्या जीवनात सर्वोच्च असल्याचे सांगत त्यांनी मातृप्रेम, त्याग आणि संस्कारांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. आईचा आदर करणे आणि तिने दिलेल्या संस्कारांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी रुग्णसेवेतील माणुसकीला विशेष महत्त्व दिले. रुग्णांच्या वेदना आणि अडचणी समजून घेऊन त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधणे, योग्य उपचार करणे आणि सेवाभावाने कार्य करणे हे प्रत्येक आरोग्यसेवकाचे कर्तव्य आहे. रुग्णाला उपचारांसोबत मानसिक आधार आणि विश्वास देणेही तितकेच महत्त्वाचे असून, निःस्वार्थ रुग्णसेवेतच खऱ्या अर्थाने ईश्वरसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके आणि सचिव विवेक शेळके यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीचा आढावा सादर केला.
कार्यक्रमास समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ हॉस्पिटलचे डॉ. रमेश पाडेकर, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर, डॉ. रुस्तुम दराडे,प्रा. निर्मल कोठारी, प्रा.शुभम शेळके यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यशवंत फापाळे, डॉ. श्रवंती तोडचीरकर, डॉ. जयश्री मते,डॉ. गौरी डोंगरे डॉ.रश्मी चव्हाण आणि डॉ. मधुसूदन कुऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले. डॉ. मानसी गवळी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.स्नेहल गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.
ज्ञान, संस्कार, जिद्द आणि सेवाभाव यांच्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधतानाच समाजाच्या कल्याणासाठी योगदान द्यावे, हा डॉ.तात्याराव लहाने यांच्या मार्गदर्शनाचा मुख्य संदेश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.



