
निरगुडसर : संकटाच्या क्षणी दाखवलेले प्रसंगावधान आणि वेळेवर केलेले CPR एखाद्याला जीवनदान देऊ शकते, याचा प्रत्यय निरगुडसर येथे आला.
मंचर येथील डॉ. साबळे डायग्नोस्टिक्सचे सर्वेसर्वा रेडिओलॉजिस्ट डॉ. धनंजय साबळे हे पारगाव येथील ओम हॉस्पिटलमध्ये जात असताना निरगुडसर येथे त्यांच्या समोर दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. या अपघातातील १८ वर्षीय तरुण त्यांच्या समोरच कोसळला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉ. साबळे यांनी तातडीने वाहन थांबवून तरुणाची तपासणी केली. त्यावेळी नाडी व कॅरोटिड पल्स जाणवत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपल्या सहाय्यकाच्या मदतीने CPR सुरू केले. रुग्णवाहिका येईपर्यंत त्यांनी CPR सुरू ठेवून तरुणाला मदत केली.
डॉ. साबळे यांच्या प्रसंगावधानामुळे आणि त्यांच्या सहाय्यकाच्या तत्पर सहकार्यामुळे या तरुणाला वेळेवर प्राथमिक जीवनरक्षक मदत मिळाली. त्यानंतर तरुणाला पारगाव येथील ओम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सध्या हा तरुण ओम हॉस्पिटलमध्ये स्थिर असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, डॉ. साबळे हे रेडिओलॉजिस्ट असून त्यांचे मुख्य कार्य वैद्यकीय निदान करणे आहे. मात्र, आपल्या वैद्यकीय अनुभवाचा आणि ज्ञानाचा योग्य वेळी उपयोग करून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. संकटाच्या क्षणी केवळ बघ्याची भूमिका न घेता तातडीने मदतीसाठी पुढे येणे, हे त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवते.
“योग्य वेळी दिलेले CPR हे जीवन आणि मृत्यू यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरू शकते,” याची जाणीव करून देणारी ही घटना आहे.
डॉ. धनंजय साबळे आणि त्यांच्या सहाय्यकाच्या या तत्पर, धाडसी व सेवाभावी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम!



