
पंचनामा प्रतिनिधी – जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त ‘प्रतिजैविक प्रतिकारशक्तीविरुद्ध लढा’ या संकल्पनेतून राजुरी (ता. जुन्नर) येथे भव्य फार्मासिस्ट रॅलीचे आयोजन करण्यात आले. समर्थ शैक्षणिक संकुलातील समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी व समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे यांच्यासह विविध फार्मसी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभागी होत प्रतिजैविकांचा योग्य वापर, औषधोपचारांबाबत जागरूकता आणि प्रतिजैविक प्रतिकारशक्तीचे दुष्परिणाम यांविषयी जनजागृती केली.
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (आयपीए), आळेफाटा स्थानिक शाखा, नॅशनल फार्मास्युटिकल वेल्फेअर असोसिएशन, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (संलग्न सीएपीडी, पुणे) तसेच समर्थ शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या रॅलीमध्ये समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे, जय हिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी आणि श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, माळवाडी-बोटा येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्यांच्या माध्यमातून प्रतिजैविकांचा अनावश्यक व अयोग्य वापर टाळणे, औषधांचा जबाबदारीने वापर करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे याबाबत प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके होते. प्रमुख पाहुणे म्हणून केमिस्ट असोसिएशन, पुणेचे उपाध्यक्ष रमेशशेठ शेवाळे उपस्थित होते. शेळके यांनी फार्मासिस्टची सामाजिक जबाबदारी आणि औषधांच्या योग्य वापराबाबत जनजागृतीचे महत्त्व स्पष्ट केले. शेवाळे यांनी प्रतिजैविकांचा अतिवापर, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि औषधांचा विवेकपूर्ण वापर करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. संतोष चोरडिया व डॉ. रूपाली थोरात यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जुन्नर, आंबेगाव व खेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष चोरडिया, सचिव महादेव तांबे, खजिनदार निलेश गांधी, ज्येष्ठ फार्मासिस्ट रायचंदशेठ गांधी, जुन्नर तालुका अध्यक्ष रसिक गांधी, आंबेगाव तालुका अध्यक्ष पंढरीनाथ तळेकर, खेड तालुका अध्यक्ष अतुल पिंगळे, सीएपीडी पुणेचे सदस्य महेश शिंदे,माजी सभापती दिपक औटी, माजी सरपंच माऊली शेळके,जि.के.औटी,एम.डी.घंगाळे, ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ पाटील औटी, माजी तंटामुक्ती उपाध्यक्ष गणेशराव हाडवळे, जनता विकास मंडळाचे सचिव प्रदीपशेठ डुंबरे, मच्छिंद्र हाडवळे, सचिन काळे आणि गणेश पोखरणा उपस्थित होते.
आयपीए आळेफाटा स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. डी. डी. गायकवाड, डॉ. सुरेश जाधव, डॉ. तेजस पाचपुते व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अश्विनी गायकवाड व प्रा. प्राची पडवळ यांनी सूत्रसंचालन केले, तर समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले यांनी आभार मानले.




