
प्रतिजैविक प्रतिकारशक्तीविरुद्ध लढा’ या संकल्पनेतून आरोग्यविषयक जनजागृती !!
पंचनामा प्रतिनिधी – जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन (IPA), आळेफाटा स्थानिक शाखा, नॅशनल फार्मास्युटिकल वेल्फेअर असोसिएशन, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन (संलग्न CAPD, पुणे) तसेच समर्थ शैक्षणिक संकुलातील समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी आणि समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरी येथे भव्य फार्मासिस्ट रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून प्रतिजैविकांचा योग्य वापर आणि प्रतिजैविक प्रतिकारशक्तीच्या वाढत्या समस्येबाबत जनजागृती करण्यात आली.
या रॅलीमध्ये समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे; समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे; विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, आळे; जय हिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी आणि श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, माळवाडी-बोटा येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना ‘प्रतिजैविक प्रतिकारशक्तीविरुद्ध लढा’ ही होती. प्रतिजैविकांचा अनावश्यक व अयोग्य वापर टाळणे, औषधांचा जबाबदारीने वापर करणे आणि प्रतिजैविक प्रतिकारशक्ती रोखण्यासाठी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्यांच्या माध्यमातून प्रतिजैविकांचा योग्य वापर, औषधोपचारांबाबतची जागरूकता आणि प्रतिजैविक प्रतिकारशक्तीचे दुष्परिणाम याविषयी प्रभावी संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यास मदत झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून केमिस्ट असोसिएशन, पुणेचे उपाध्यक्ष रमेशशेठ शेवाळे उपस्थित होते. वल्लभ शेळके यांनी आपल्या मार्गदर्शनातून फार्मासिस्टची सामाजिक जबाबदारी, औषधांचा योग्य वापर आणि प्रतिजैविक प्रतिकारशक्ती रोखण्यासाठी जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित केले. रमेशशेठ शेवाळे यांनी प्रतिजैविकांचा अतिवापर, त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि औषधांचा विवेकपूर्ण वापर करण्याची आवश्यकता याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी जुन्नर, आंबेगाव व खेड तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष चोरडिया, सचिव महादेव तांबे, खजिनदार निलेश गांधी, ज्येष्ठ फार्मासिस्ट रायचंदशेठ गांधी, जुन्नर तालुका अध्यक्ष रसिक गांधी, आंबेगाव तालुका अध्यक्ष पंढरीनाथ तळेकर, खेड तालुका अध्यक्ष अतुल पिंगळे, CAPD, पुणेचे सदस्य महेशशेठ शिंदे तसेच विद्या विकास मंदिर राजुरीचे माजी प्राचार्य जि. के.औटी सर ,राजुरी गावचे उपसरपंच माऊलीशेठ शेळके, राजुरी गावचे ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ पाटील औटी, राजुरी गावचे माजी तंटामुक्ती उपाध्यक्ष गणेशराव हाडवळे, जनता विकास मंडळाचे सचिव प्रदीपशेठ डुंबरे ,मच्छिंद्र हाडवळे सचिन काळे, गणेश पोखरणा यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व मान्यवरांचा सत्कार IPA आळेफाटा स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. डी. डी. गायकवाड, डॉ.सुरेश जाधव, डॉ . तेजस पाचपुते व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके यांनी केले. यावेळी संतोष चोरडिया आणि डॉ. रूपाली थोरात यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी गायकवाड आणि प्रा. प्राची पडवळ यांनी केले, तर समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष घुले यांनी आभार मानले.



