सामाजिक
1010413449

परिवर्तनाच्या प्रेरणा जागविणारे लोकमान्य टिळक : अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान आजही प्रेरणादायी – प्रा. राजीव सावंत


पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, बेल्हे येथे क्रांतिकारक विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी समर्थ शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळकांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा सामाजिक परिवर्तनातील प्रभाव यावर सविस्तर विवेचन केले.
प्रा. राजीव सावंत म्हणाले की, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख शिल्पकार होते. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” हा त्यांचा घोष भारतीय जनतेच्या मनात स्वातंत्र्याची जाज्वल्य प्रेरणा निर्माण करणारा ठरला. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी समाजात राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजवली. ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांद्वारे त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या अन्यायाविरुद्ध निर्भीड आवाज उठविला. शिक्षण, राष्ट्रभक्ती, सामाजिक जागृती आणि लोकसंघटन यांची सांगड घालत त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. त्यांच्या विचारांमधून देशभक्ती, स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा आजही प्रत्येक भारतीयाला मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा आढावा घेताना प्रा. सावंत म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, श्रमिक आणि उपेक्षित घटकांचे वास्तव प्रभावीपणे मांडले. त्यांच्या साहित्याने सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवी मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश दिला. ‘फकिरा’ ही त्यांची कादंबरी सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारी साहित्यकृती असून अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची ऊर्जा ती आजही युवकांना देते. त्यांनी कष्टकरी समाजाचे दुःख, त्यांचे संघर्ष आणि स्वाभिमान यांना शब्दरूप देत साहित्याला सामाजिक चळवळीचे प्रभावी माध्यम बनविले.
विद्यार्थ्यांनी महान व्यक्तींच्या विचारांचा केवळ अभ्यास न करता ते आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावेत, सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रविकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार,डॉ. लक्ष्मण घोलप, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. गणेश बोरचटे, विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शुभांगी लामखडे यांनी केले तर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

1010413449

Related posts

विजय कोल्हापूरे यांचा श्रीराम पायी दिंडी पिंपळगाव (खडकी) यांच्या वतीने सन्मान !!

Chief Editor

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्ताने पारगाव (शिंगवे) येथे संपन्न झाले गुरूचरित्र पारायण, गृह पठण !!

Chief Editor

तमाशा फड मालक,अष्टपैलू कलावंत अमन तांबे यांचे निधन

Chief Editor

Leave a Comment