ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

शिरूर लोकसभेतील महत्वाच्या प्रकल्पांसाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची मा.खासदार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली नवी दिल्लीत यशस्वी भेट!

शिरूर लोकसभेतील महत्वाच्या प्रकल्पांसाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची मा.खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली नवी दिल्लीत यशस्वी भेट!

शिरूर लोकसभा मतदारसंघातील रखडलेले रा.मा.६० खेड टोलनाका ते नाशिक फाटा या महामार्गाच्या महामार्गावरील एलिवेटेड कॉरिडोर प्रकल्पाचा तांत्रिक प्रक्रियेसह डीपीआर लवकरात लवकर पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू व्हावे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक असलेल्या वढू-तूळापूरला जोडणाऱ्या देहू-आळंदी – मरकळ – तूळापूर या रू.५४.२२ कोटींच्या कामास केंद्रीय मार्ग निधी (CRF) अंतर्गत मंजूरी मिळावी यासह पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापुर ते शिरुर रस्ता रूंदीकरणाचे काम प्राधान्याने हाती घ्यावे आदि प्रमुख मागण्यांसह अन्य महत्वपूर्ण विषयांवर मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची भेट घेतली. आढळराव पाटील यांच्या आग्रही मागण्यांची गडकरी साहेबांनी गंभीरतेने दखल घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत आपण शिरूर लोकसभेतील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सत्वर कार्यवाहीचे निर्देश देणार असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या भेटी दरम्यान मा.नितीनजी गडकरी यांच्याशी आढळराव पाटील यांची विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रीय महामार्ग ६० खेड टोलनाका ते नाशिक फाटा या महामार्गाचे सहापदरीकरण व्हावे यासाठी आढळराव पाटील हे सन २०१३ पासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करीत आहेत. या महामार्ग रुंदीकरणासाठी आपण सर्वप्रथम डिसेंबर २०१७ मध्ये मंजुरी देऊन १०१३ कोटींची निविदाही मंजूर केली होती. मात्र मोशी ते नाशिक फाटा हद्दीतील डीपीआरला आलेल्या हरकतींमुळे सदर निविदा थांबवण्यात आली होती. पुढे फेब्रुवारी २०२० मध्ये पुन्हा ६५० कोटींची प्रसिद्ध झालेली निविदाही काही कारणास्तव थांबविण्यात आली होती. ही बाब आढळराव पाटील यांनी निदर्शनास आणून देत या महामार्गाचे काम प्रक्रियेत अडकून पडल्याने वाढती औद्योगिक वाहतूक व दळणवळणाचा प्रचंड ताण येऊन या भागात सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या महामार्गावरील एलिवेटेड कॉरिडोर प्रकल्पाचा तांत्रिक प्रक्रियेसह डीपीआर लवकरात लवकर पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्याच्या दृष्टीने प्रकल्पास मंजुरी मिळावी अशी मागणी यावेळी आढळराव पाटील यांनी केली.

खेड व हवेली तालुक्यातून जाणारा देहू-आळंदी – मरकळ – तूळापूर रामा११६ या ५४.२२ कोटी रस्ते कामाचा प्रस्ताव आढळराव पाटील यांच्या आग्रही मागणीवरून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी खास बाब म्हणून मंजूरीसाठी आपल्याकडे शिफारस केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारकास जोडणाऱ्या या रस्त्याला केंद्रीय मार्ग निधीतून मंजूरी मिळावी अशी मागणी यावेळी केली. याबाबत राज्य सरकारला सूचना करून विहित नमुन्यात प्रस्ताव मागवून घेऊन मंजुरीसाठी व्यक्तिशः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिरुर लोकसभा मतदार संघातील वाघोली, शिक्रापुर, रांजणगाव, शिरुर आदी शहरांतून जाणाऱ्या रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी असलेल्या पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापुर ते शिरुर रस्ता रूंदीकरणाचे कामही लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी मागणी केली.

माझे या भागावर बारीक लक्ष असून आपणही जागृत लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्षांपासून येथील प्रकल्पांसाठी पाठपुरावा करीत आला आहात. त्यामुळे पुढील किमान ३० वर्षांच्या वाहतूक कोंडीचा विचार करून येथील महामार्गांचे नजिकच्या काळात रूंदीकरणाचे काम प्रत्यक्षात सुरू केले जाईल अशी ग्वाही यावेळी नितीनजी गडकरी यांनी आढळराव पाटील यांना दिली.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.