आरोग्य व शिक्षणसामाजिक

फुट ट्रॅप — वन्यजीवांचा मूक घातक शत्रू!!

साभार लेख – गायत्री अवधानी (वन्यजीव अभ्यासक)

पंचनामा विशेष -दौंड परिसरात गेल्या काही वर्षांत वन्यप्राण्यांसाठी लावले जाणारे फुट ट्रॅप म्हणजेच लोखंडी सापळे आढळून येत आहेत. ही समस्या केवळ या तालुक्यात मर्यादित नसून, जिल्ह्यातील अनेक भागांत हीच स्थिती पाहायला मिळते.

इको रेस्क्यू टीम मागील पाच वर्षांपासून दौंड भागात सक्रियपणे कार्यरत आहे. रेस्क्यू पथकाच्या कार्यक्षेत्रात मागील तीन वर्षांत दोन तरस आणि तीन बिबटे अशा पाच वन्यप्राण्यांच्या सापळ्यात अडकण्याच्या घटना समोर आल्या. यापैकी तीन प्राण्यांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले. अनेक वेळा फुट ट्रॅपमध्ये अडकलेले प्राणी, आपला जीव वाचवण्यासाठी पायाची बोटे किंवा पायाचा काही भाग तोडून पळ काढतात.यातून काही प्राणी वाचतात, तर काहींच्या खोल जखमांमध्ये इन्फेक्शन होऊन त्यांचा मृत्यू होतो.
या गंभीर जखमांच्या उपचारासाठी रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट (Wildlife TTC), पुणे येथे आधुनिक शस्त्रक्रिया, लेझर थेरपी यांसारख्या उपचारपद्धतींचा उपयोग केला जातो. या तंत्रज्ञानामुळे अनेक प्राण्यांचे जीव वाचवण्यात यश आले आहे.

फुट ट्रॅप म्हणजे काय?

फुट ट्रॅप हा प्राण्यांना पकडण्यासाठी लावला जाणारा एक प्रकारचा लोखंडी सापळा आहे. तो लावण्यामागील प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत —

  1. शेतपिकांचे संरक्षण — पिकांचे नुकसान करणारे प्राणी पकडण्यासाठी.
  2. स्वसंरक्षण — घर किंवा शेतीजवळ येणाऱ्या वन्यप्राण्यांपासून बचावासाठी.
  3. खाद्यासाठी शिकार — घोरपड, चिंकारा, ससे, विविध पक्षी व इतर प्राण्यांची बेकायदेशीर शिकार करून त्यांचा आहार म्हणून वापर.
  4. तस्करी — वन्यप्राण्यांच्या अवयवांची बेकायदेशीर विक्री व तस्करी.

कायदेशीर बाबी

वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत अनुसूची 1 व 2 मधील प्राण्यांसाठी फुट ट्रॅपचा वापर करणे, तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 कलम 11 नुसार कोणत्याही प्राण्याला पकडण्यासाठी किंवा इजा पोहोचवण्यासाठी सापळ्याचा वापर करणे, त्यांची निवासस्थाने नष्ट करणे, उपाशी किंवा तहानलेले ठेवणे, वेदना देणे — हा गंभीर गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास 3 ते 7 वर्षांपर्यंतची शिक्षा व ₹10,000 पर्यंतचा दंड होऊ शकतो.

नागरिकांची जबाबदारी

अशा प्रकारची घटना आढळल्यास —

  • प्राण्यांच्या जवळ जाऊ नये
  • सापळा किंवा इतर पुरावे हाताळू नयेत
  • तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा

उपाययोजना –

जनजागृती व कायदेशील धाक म्हणजेच योग्य व्यक्ती शोधून त्यावर कारवाई करणे ज्यामुळे अशा घटना निश्चितच कमी होतील.

– गायत्री अवधानी (वन्यजीव अभ्यासक)

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.