आरोग्य व शिक्षणसामाजिक
दातृत्व जपणारा तमाशा फडमालक,शाहीर दगडू साळी यांचे चिरंजीव,दत्तोबा तांबे शिरोलीकर !!


साभार लेख -बाबाजी कोरडे राजगुरुनगर, पुणे संस्थापक/अध्यक्ष लोककला व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
समाजाकडून जेवढे आपल्याला मिळते,त्याची यथासांग परतफेड समाजासाठीच करणाऱ्या अनेक महान व्यक्ती भारतभुमीत जन्माला आल्या आहेत. उद्योग घराण्यांची दात्रूत्वाची परंपरा टाटा, बिर्ला, विप्रोचे अझिम प्रेमजी, रिलायंसचे अंबानी व अनेकांनी सांभाळली आहे.
तमाशा क्षेत्र देखील याला अपवाद नाही.विठाबाई नारायणगांवकर, काळू-बाळू कवलापुरकर, दत्ता महाडिक पुणेकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, तूकाराम खेडकर, आनंद महाजन जळगांवकर, पांडुरंग मुळे तसेच सध्याच्या काळात रघूवीर खेडकर, मंगला बनसोडे व अनेकांनी दातृत्वाची ही परंपरा चालू ठेवली आहे.
१९६० ते १९८० या दोन दशकांमध्ये तमाशाच्या सुवर्णकाळाचा परमोच्च बिंदू असताना दातृत्वाची महान परंपरा सांभाळणारा तमाशा फडमालक म्हणून आजदेखील नांव समोर येते, ते म्हणजे,
दत्तोबा तांबे शिरोलीकर यांचेच !!
मऱ्हाठी स्वराज्य व साम्राज्याचा पाया घालणाऱ्या छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी….
याच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील तमाशापंढरी नारायणगांवपासून पुर्वेला विस किलोमीटर अंतरावर ‘शिरोली’ या छोट्याशा गावात दत्तोबा तांबे यांचा दि.२३ जुलै १९२१ रोजी जन्म झाला. पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड यांच्या काळात आपल्या शाहीरीने उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारे महान शाहीर दगडू साळी व त्यांची पत्नी ठकूबाई यांच्या पोटी महाराष्ट्राला हे पुत्ररत्न प्राप्त झाले.
कुटूंबात दत्त सांप्रदायाचे बिजारोपण असल्यामुळे त्याचे नांव ‘दत्ता’ असे ठेवले गेले !
पुढे आपल्या कर्तृत्वाने ‘दत्तोबादादा’ याच आदरार्थी नावाने तमाशा रसिकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले..!
वडीलांचा तमाशाचा वारसा दादांच्या अंगात लहानपणीच मुरला होता.
बैलगाडीबरोबर पायी प्रवास करून वडीलांबरोबर केवळ दहा वर्षे वय असतानाच दत्तोबा दादांनी तमाशात प्रवेश केला. वडील शाहीर दगडू साळी , यांचे अखंड महाराष्ट्रात नांव गाजत असतानाच दि.२८डिसेंबर१९५३ रोजी त्यांचे निधन झाले.आणि संपूर्ण फडाची जबाबदारी दत्तोबादादांवर आली.
जयराम, देवराम व दिगंबर या तीनही बंधूंना घेऊन दत्तोबा दादांनी मोठ्या धैर्याने तमाशा परंपरा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. वडीलांच्या नावाचा मोठा दबदबा असताना,तोच दर्जा सांभाळणे सोपे नव्हते !
परंतू त्यासाठी वैद्य मास्तर, सोपानराव पांगारकर, हरीभाऊ टोणपे, पुंडलिक देहरेकर,सैदोबा नायगावकर, घाडगे हालगीवाले तसेच सोंगाडे म्हणून विष्णू बांगर बेल्हेकर, मारूती भराठी नारायणगावकर व स्वतः दत्तोबा तांबे शिरोलीकर यांच्याबरोबर स्त्री कलावंत म्हणून चंद्राबाई पुणेकर, सोनाबाई केडगांवकर, हौसाबाई काळे पिंपळवंडीकर या गुणी कलावंतांनी तमाशा फड थोड्याच दिवसात नावारूपाला आणून ‘शिरोली’ गांवचे नांव गाजवून मोठा मान मिळवला. ह्या गोष्टीचा अभिमान म्हणून शिरोली ग्रामस्थांनी स्वतः लोकवर्गणीतून १९५५ साली दत्तोबा तांबे शिरोलीकर यांच्या तमाशाफडासाठी ट्रक खरेदी करून सप्रेम भेट दिला !!
त्यामुळे कलावंतांचे मनोधैर्य उंचावले व अजून दमदार कार्यक्रम सादर करण्यासाठी त्यांनी कंबर कसली ! त्यामुळे फडाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले.
दिवसा हजेरीचा कार्यक्रम रसिकांना उन्हात बसून पहावा लागू नये, म्हणून दत्तोबा दादांनी संगमनेर जवळील वडगांव पान येथील सर्कसच्या तंबूप्रमाणे नविन तंबू तयार करून घेतला.
तमाशा सृष्टीतील पहिला तंबू तयार करून घेणारा फडमालक म्हणून आजही त्यांच्याकडे पाहिले जाते !
तो काळ तमाशातील वगनाट्यांनी गाजवणारा होता. म्हणून भरघोस मानधन देऊन, वगनाट्य लेखक वैद्य मास्तर, सुरेश विरळीकर,नाथा मास्तर घोडेगांवकर अशा नामवंत लेखकांकडून अनेक वगनाट्ये बसवली गेली.
गोकूळचा चोर, सिताहरण,
अहिल्या उद्धार,पृथ्वीराज चव्हाण, झाशीची राणी अशा भारदस्त वगनाट्यांनी अवघा महाराष्ट्र गाजवला. उत्तमोत्तम ड्रेपरी व भारदस्त ट्रिकसिन सादरीकरणात कसूर होऊ नये, म्हणून फडाच्या सामानसुमानात खुप वाढ करण्यात आली. त्यामुळे एक ट्रक कमी पडू लागला, म्हणून १९५७ साली फक्त कलावंतांना आरामदायक प्रवासासाठी दुसरा नवीन मर्सिडीस ट्रक खरेदी केला गेला.
पंचक्रोशीतील पंधरा-वीस गावात पहिला मर्सिडीज ट्रक घेणारा तमाशाफड मालक म्हणून दत्तोबा दादांची प्रतिष्ठा खुपच वाढली !
कारण परीसरातील मोठमोठ्या व्यावसायिकांकडेही असा ट्रक त्याकाळी नव्हता !!
ही सर्व किमया ‘झाशीची राणी’ या वगनाट्याची !
या वगनाट्यामध्ये मध्यवर्ती भूमिका सोनाबाई केडगांवकर, यांनी अशा प्रकारे साकारली होती की, रंगमंचावरून खाली त्या उतरल्यावर कितीतरी स्त्रीरसिक त्यांना पहायला मागे राहूटीमध्ये येत असत. आणि त्यांच्याबरोबर सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या दत्तोबा दादांच्या द्वितीय पत्नी सौ.चंद्राबाई यांना हळदीकुंकू लावत असत !
हा बहुमान आतापर्यंत बहूधा फक्त चंद्राबाई यांच्याच वाट्याला आला आहे.
आपला तमाशाफड प्रसिद्धीच्या शिखरावर असताना दत्तोबा दादांनी सामाजिक कार्यासाठी नेहमीच आपला हात मोकळा सोडला. अनेकांना त्यांनी घरबांधणी व लग्नकार्यात आर्थिक बाबतीत मदत केली.
आपल्या गावाचे नाव मोठे केले म्हणून शिरोली ग्रामस्थांनी दादांना बिनविरोध सरपंचपदी विराजमान केले.पुढे सतत तब्बल पंधरा वर्षे त्यांनी ही जबाबदारी मोठ्या नेटाने सांभाळून, गावात शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू करून, ग्रामस्थांच्या सहकार्याने ते पुर्ण केले. त्यामुळे गोरगरीब जनतेला शिक्षणाची सोय झाली.
शाळाइमारतीच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी शिरोली सारख्या छोट्याशा गावात १६ आॅक्टोबर १९६१ रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन शिक्षणमंत्री नामदार बाळासाहेब देसाई यांनाच आमंत्रण देऊन प्रत्यक्ष आणले ! एव्हढी राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा दत्तोबा दादांनी मिळवली होती.
पुणे जिल्ह्यातील वडगांव पिर, महाळूंगे पडवळ, नाशिक जिल्ह्यातील विंचूर, मराठवाड्यातील अनेक गावांत व इतर ठिकाणी त्यांनी शाळांच्या इमारतीसाठी आर्थिक मदतीबरोबरच मोफत कार्यक्रम सादर केले आहेत.
सरपंच पदावर कार्यरत असताना, गावात त्यांनी सरकारी दवाखान्याची व्यवस्था केली.परंतू डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था नव्हती, म्हणून स्वखर्चाने आपल्या सागवानी दुमजली माडीशेजारीच स्वखर्चाने वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी भव्य सागवानी इमारत उभी केली !
असा दातृत्वाचा वसा त्यांनी पुढील पिढीला दाखवून दिला आहे.
१९६२साली चिनने भारतावर आक्रमण केले. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांना सिमेवर लढाऊ जवानांसाठी कार्यक्रम सादर करण्यासाठी विनंती केली होती.विठाबाईंनी तो सादर केलादेखील,
त्यानंतर दत्तोबा तांबे शिरोलीकर यांनीही नेफा आघाडीवर प्रत्यक्ष युद्धभूमीवर जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सतत पंधरा दिवस आपली सेवा सादर केली आहे.
या सर्व सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारने तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते
राष्ट्रपती पारीतोषीक देऊन दत्तोबा तांबे शिरोलीकर,यांचा गौरव केला आहे !
अत्यंत मोठा नावलौकिक व प्रसिद्धीच्या शिखरावर असताना १९८० साली बिड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात बाग पिंपळगाव या ठिकाणी फडाच्या गाडीला मोठा अपघात झाला.त्यातच दत्तोबादादांना पाय व मणक्याला मार लागून तो मोडला !
त्यामुळे सतत नऊ महीने ते पुण्यातील संचेती हॉस्पिटल मध्ये पडून होते. त्या काळात अनेक राजकीय नेते आणि सुधीर फडके,मधू कांबीकर असे कितीतरी प्रतिष्ठित कलावंत मंडळी त्यांना भेटायला येत असत.परंतू आजार पुर्ण बरा झालाच नाही.
आपल्या हयातीत अनेक व्यक्ती व संस्थांना भरघोस मदत करण्यासाठी सदैव तत्पर असणारा हा आधुनिक कर्ण
दि.१८जुलै१९८१ रोजी स्वतःचे सर्वसमावेशक कर्तृत्व गाजवून वयाच्या अवघ्या साठाव्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला,तो कायमचाच !!!
आयूष्यभरातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या शिरोली येथील ग्रामस्थांनी दत्तोबा दादांची स्मृती जपण्यासाठी लोकवर्गणीतून त्यांचा अर्धपुतळा व भव्य स्मारक उभारले आहे, तेही गावच्या वेशीवरच !!
तमाशा क्षेत्रात अशा प्रकारचे भाग्य विठाबाई भाऊ नारायणगांवकर आणि दत्तोबा तांबे शिरोलीकर यांच्याच वाट्याला आले आहे !
अशा सामाजिक भान असणाऱ्या अजरामर तमाशाफड मालकास शतशः अभिवादन….
बाबाजी कोरडे
मुलाखत-श्री. कैलासराव दत्तोबा तांबे शिरोलीकर
स्व.दत्तोबा तांबे शिरोलीकर यांचे चिरंजीव
बाबाजी कोरडे
राजगुरुनगर, पुणे
संपर्क : 9730730146
संस्थापक/अध्यक्ष लोककला व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.
मा.सदस्य, राज्य सांस्कृतिक धोरण समिती, सांस्कृतिक संचालनालय, महाराष्ट्र शासन.
स्व.दत्तोबादादा तांबे यांच्या पुण्यतिथीनिमित्त (१८जुलै)विनम्र अभिवादन