धामणी (ता.आंबेगाव) येथील खंडोबा मंदिरात सप्तशिवलिंगावर चंदनऊटी सोहळा!!

चैत्री पौर्णिमेला दर्शनासाठी भाविकांची गर्दी!!
धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात सहाणेवर उगाळलेल्या चंदनाच्या उटीने सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यावर करण्यात आलेला सुवासिक केशरमिश्रित चंदनाचा लेप, स्वयंभू सप्तशिवलिंगाच्या पाठीमागे असलेल्या म्हाळसाकांत खंडोबा,म्हाळसाई,बाणाईच्या सजवलेल्या विलोभनीय सर्वांगसुंदर मूर्ती,मोगर्याच्या व अत्तराच्या सुंगधाने दरवळून गेलेला धामणीच्या कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिर परिसर!!

मंदिराच्या आवारात ढोलकी,डफडे,ताशा,संबळ,सनई तुतारीच्या पारंपारिक वाद्याचा सुरु असलेला गजर!!कपाळभर उटी व भंडारा लावून “सदानंदाचा येळकोटचा जयघोष करणारे खंडेरायाचे भाविक आणि आबालवृध्द महिलांचा उस्फूर्त सहभाग हे सारे भक्तिमय वातावरण वासंतिक चंदनउटीच्या सोहळ्याच्या निमित्ताने धामणी (ता.आंबेगाव) येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात शनिवारी चैत्र पौर्णिमेला (दि.१२ एप्रिल २०२५ ) रोजी भल्या पहाटे पाहावयास मिळाले.

चैत्र महिण्यात उष्णतेचा दाह वाढू लागलेला असल्यामुळे तिव्र उन्हापासून देवाला शीतलता मिळावी यासाठी चैत्री पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यत चंदनउटी घालण्याची परंपरा आहे.ठिकठिकाणच्या प्रमुख तिर्थक्षेत्राच्या देवस्थान मंदिरामधून देवाच्या मूर्तीला चंदन उटी भक्तिमय वातावरणात केली जाते.यंदाही सगळीकडे उटीचंदनाचा व उटीच्या भजनाचा गुडीपाडव्यापासून प्रारंभ झालेला आहे.चंदनउटीच्या सोहळ्याच्या दिवशी धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात पंचरास मंडळीच्या पारंपारिक वाद्याच्या गजराने व जय मल्हारच्या जयघोषाने मंदिर व परिसरात आनंदी वातावरण दिसून आले.

धामणी येथील खंडोबा देवस्थान मंदिरात चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पहाटे पाच वाजता सूर्यकांत जाधव,सौ.शंकुतला जाधव,संदीप भुमकर,सौ. चित्रा भुमकर,कैलास वाघ,सौ.विठाबाई वाघ,बाळासाहेब लालजी बढेकर,सौ.दिपाली बढेकर,मनोज तांबे,सौ.सुप्रिया तांबे,शांताराम रोडे,सौ,सुरेखा रोडे,सुरेश बढेकर, सौ.भारती बढेकर,बाळासाहेब महादू बढेकर,सौ.उषा बढेकर,गणपत भांडारकर,सौ.रुपाली भांडारकर या नऊ जोडप्यांच्या हस्ते सप्तशिवलिंगाचा अभिषेक व वसंतपूजा करण्यात आली.

त्यानंतर खंडोबा,म्हाळसाई,बाणाई व उत्तरमुखी असलेल्या खंडोबाच्या बहिणीच्या जोगेश्वरीचे विशाल,देखण्या मूर्तीना वस्रालंकार घालण्यात आले. त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत खंडोबाची महाआरती झाल्यानंतर सेवेकर्यांनी व मानकर्यांन आणलेल्या पुरणपोळी,साजूक तूप,दूध व खसखशीची खीर,सार व भात,कुरडई पापडी या पंचपक्वानांचा चैत्रीपौर्णिमेचा नैवेद्य सप्तशिवलिंगाला अर्पण करण्यात आला.

त्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,शांताराम भगत,पांडुरंग भगत,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत,राजेश भगत,प्रमोद देखणे,गणेश पंचरास यांनी सप्तशिवलिंगावर चंदनउटी घालण्यास सुरुवात केली.सुवासिक चंदनाचा लेप देत असताना मंदिराच्या आवारात पारंपारिक वाद्याच्या सनईमधून मंगलमय स्वरात भक्तिमय भैरवी गायल्या जात होत्या.उष्म्याची दाहकता कमी करण्यासाठी मंदिराच्या गाभार्यात व सभामंडपात मोगर्याचे हार तसेच झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली होती.

मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली दिसून आली.मंदीराचे आवारात व सभोवताली पहाटेच्या सुमारास महेश्वरी आळेकर,प्रतिक्षा जाधव,गायत्री भगत,सारिका भगत,ॠतुजा भगत,स्वराली आळेकर,स्पृहा भगत यांनी आकर्षक रांगोळ्या काढल्या.सप्तशिवलिंगाची षोडशोपचार पूजा झाल्यानंतर उपस्थित सेवेकरी ग्रामस्थ व भाविकांच्या कपाळाला चंदनउटी लावण्यात आली.

चंदनउटीचे मानकरी नऊ जोडप्यांचा मानाची शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्यानंतर अल्पोपहार होऊन वासंतिक चंदनउटीच्या भक्तीमय रसाळपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी महाळूंगे पडवळ,गावडेवाडी,अवसरी,खुर्द, लोणी,तळेगाव ढमढेरे येथील भाविक आलेले होते.ज्या भाविकांना माघ पोर्णिमेला तळीभंडारासाठी व दर्शनासाठी येणे शक्य होत नाही ते भाविक चैत्री पौर्णिमेला आवर्जुन येतात असे सेवेकरी भगत वाघे मंडळीनी सांगितले.

मंदिराचे जागरण मंडपात पाच नामाची जागरणाचे घट मांडून वाघेवीर मंडळी जागरणे करताना दिसत होते.घटाभोवती महिला भाविकांची गर्दी होती.मंदिराचे बाहेर तळीभंडार व फुलाचे पेढे विक्रीची दुकाने थाटलेली होती.खंडोबाच्या मानाच्या काठीचे मानकरी राजगुरु (अवसरी खुर्द) नरके (तळेगाव ढमढेरे) पंचरास मंडळी (संविदणे व कवठे) कांदळकर व घोडे मंडळी (कवठे) वाळूंज पाटील (वाळूंजनगर)आगरकर (पाबळ) आल्हाट (येडगांव) या मंडळीचा देवस्थानाच्या वतीने मानाचे श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

दुपारनंतर उन्हामुळे भाविकांची तुरळक ये—जा सुरु होती.दुचाकी चारचाकी वाहानाने येणार्या भाविकांची संख्या लक्षणीय होती.महिला भाविक भर उन्हात दर्शनासाठी पायी येताना दिसत होत्या.