आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

१३ ऑगस्ट आज जागतिक लांडगा दिवस!! लांडगा प्राणी वाचला पाहिजे!!

लांडग्यांचा अस्तित्वासाठी लढा !!

लांडगा हा सस्तन प्राणी कँनिडी कुळातील असून लांडग्याला कँनिस ल्युपस या शास्रीय नावाने संबोधले जाते. या कुळात पाळीव कुत्री, जंगली कुत्री, लांडगे, कोल्हे, खोकड हे प्राणी येतात. जगात लांडग्यांच्या ३७ उपप्रजाती आढळतात. १३ आँगष्ट हा “जागतिक लांडगा दिवस” म्हणून पाळला जातो. भारतात महाराष्ट्रा बरोबर गुजरात, राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा, आंध्रप्रदेश, कर्नाटक या विविध राज्यांतही लांडग्यांचे अस्तित्व आढळून येते. लांडगा हा संकटग्रस्त प्रजातींमध्ये येत असल्याने वन्यजीव कायद्यानुसार लांडग्यांना संरक्षण दिले आहे. १९३४ मध्ये सर्वप्रथम जर्मनी या देशाने लांडग्यांना संरक्षण देणारा कायदा केला. भारतातही लांडगा संकटग्रस्त प्रजातींमध्ये मोडला जातो. संकटग्रस्त प्रजाती म्हणजे इतर प्राण्यांच्या तूलनेत अल्प प्रमाणात अस्तित्वात असलेले परंतु मानवाच्या बेजबाबदार वर्तनाने नष्ट होत असलेले प्राणी होय.
लांडगा हा टोळीने राहाणारा कुटुंब प्रिय प्राणी असून लांडग्याचे आयुर्मान सात ते पंधरा वर्षाचे असते. लांडग्याची एक जोडी आयुष्य भर सोबत रहाते. लांडग्यांचा गर्भधारणेचा काळ अंदाजे ६० ते ६३ दिवसांचा असून लांडगा एकावेळी दोन ते सहा पिलांना जन्म देतो. जून ते डिसेंबर दरम्यान त्यांची विण स्थानिक खाद्य उपलब्धेनुसार व ऋतुचक्र बदलांनुसार मागे पूढे होत असते. लांडगे विस्तीर्ण गवताळ, विरळ झुडूपी माळराने, छोट्या टेकड्या, घळी, विरळ झुडूपी जंगले अशा आधीवासाची निवड करतात. लांडगे मातीचे बांध, घळींमध्ये माती उकरून बिळे बनवतात व त्यात पिले देतात. खाद्याच्या शोधार्थ लांडगे दहा ते तिस कि.मि. अंतर कापू शकतात. लांडगा हा प्राणी बुद्धी, शक्ती व युक्ती यांनी परिपूर्ण असून एकेकटा अथवा समूहाने नियोजन बद्ध शिकार करतो. या प्राण्याच्या खाद्यात ससे, हरणे, चिंकारा, उंदीर, घूशी, घोरपडी, सरपटणारे प्राणी, पक्षी व त्यांची अंडी तसेच माळरानावर चरणार्या शेंळ्या, मेंढ्या, लहान जनावरे यांचा सामावेश असतो. खाद्य शोधताना भटकी पाळीव कुत्री, मेंढपाळ यांच्यासोबत लांडग्यांना संघर्षाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते. मानवाचे लांडग्यांच्या अधीवास क्षेत्रात शेतीसाठी, रस्तेबांधणी, घरे व इतर बांधकामांमूळे होणार्या अतिक्रमणांमूळे लांडग्यांच्या आधीवासात मोठा धोका निर्माण होत आहे. भटकी कुत्री, बिबट व माणसे ही लांडग्याच्या निवासस्थांनापर्यंत पोहचून त्याच्या पिलांना धोकादायक ठरत आहे. पिल्लांना या धोक्यांपासून दुर ठेवणे, पिलांचे संरक्षण हे लांडग्यांसाठी आव्हानात्मक असते. भटकी कुत्री त्याच्या खाद्यात वाटेकरी होतात. ह्या भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात आलेले खाद्य खाण्यात आल्याने लांडग्यांना रेबीज, कँनाईन डिस्टेंपर या सारख्या संसर्गजन्य जीवघेण्या असाध्य रोगांशी लढण्याची वेळ येते. एकदा लागण झाल्यावर त्यातून वाचणे अशक्य होते. भटकी कुत्री हेच वन्यप्राण्यांमध्ये रोग पसरवण्याचे केंद्र ठरतात. लांडग्यामुळे पाळीव प्राण्यांचे होत असलेले नुकसान आणि वाटत असलेल्या भितीपोटी माणसे ही लांडग्यांच्या निवासस्थानी दगड, माती, काटेरी फांद्या टाकून बिळे बूजवतात. बिळांमध्ये गवत, लाकडे भरुन पेटवतात व पिले गुदमरून मरतात. त्याची निवासस्थाने उध्वस्त केली जातात. बर्याच वेळा विषप्रयोग करून अथवा सापळ्यांत पकडूनही हत्या केली जाते. या संकटां बरोबर लांडग्यांच्या हद्दीवरून होणाऱ्या मारामाऱ्या , रस्त्यांवरील अपघात , खाद्याची चणचण , चोरट्या शिकारी , संसर्गजन्य जीवघेणे आजार, मानवी हस्तक्षेप या आणि अशा अनेक संकटांतून तरून संघर्ष करत थोड्या संख्येने तग धरून असलेला हा माळरानांवरचा राजा आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहे.
या संकटांबरोबर अजून एक डोकेदुखीचा विषय म्हणजे हौशी अनाधिकृत फोटोग्राफर. हे लोक फोटोग्राफ मिळवण्यासाठी कोणतेही नियम न पाळता त्यांच्या निवासस्थानासमोर, पिल्लांच्या बिळासमोर तासनतास थांबून बसून राहतात. गाड्यांमधून लांडग्यांचा पाठलाग करतात. अनेक जण गर्दी करतात. त्यामुळे लांडग्यांना पिलांना खाद्य भरवता येत नाही. पिलांना बिळातून बाहेर पडणेही मुश्किल होते. काही स्थानिक व्यक्ती बाहेरील फोटोग्राफरांना पैशाच्या लोभाने आमंत्रित करुन लांडग्यांच्या दैनंदीन हलचालींवर मर्यादा आणत आहेत. फारच थोडे आभ्यासक फोटोग्राफर हि परिस्थीती समजाऊन घेऊन पूरेश्या अंतरावरून लांडग्यांना धोकादायक ठरणार नाही अशा पद्धतीने अभ्यास व फोटोग्राफी करतात.
हि संकटे कमी म्हणुन की काय पूणे जिल्ह्यातील दौंन्ड तालुक्यात जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात लांडग्यामध्ये कँनाईन डिस्टेंपर या रोगाची लागण झाल्याने आठ ते नऊ लांडग्यांचा म्रुत्यु झाला. हा एक संसर्गजन्य आजार असून विविध प्रकारच्या पाळीव व वन्य प्राण्यांमध्ये आढळून येतो. या प्राण्यांमध्ये पाळीव व भटकी कुत्री, रानकुत्री, लांडगे, कोल्हे, खोकड, मुंगूस वर्गीय, बिबट, वाघ, सिंह, पांडा, अस्वल वर्गीय, माकड वर्गीय प्राण्यांमध्ये आढळून आला आहे.
कँनाईन डिस्टेंपर या रोगा विषयी थोडे जाणून घेऊयात. हा व्हायरस जर लागण झाल्या अगोदर लसीकरण केल्यास जीवघेणा ठरत नाही. हा व्हायरस शरिराच्या विविध कार्यावर परिणाम करतो. उदाहरणार्थ जठर, श्वसन नलिका, पाठीचा कणा, मेंदू यावर परिणाम करतो. त्याची विवीध बाह्यलक्षणे दिसून येतात. अतिशय ताप येणे, डोळ्यांची जळजळ, डोळ्यातून नाकातून पातळ स्राव, श्वसनास अडथळा, तोंडातून लाळ, वजन कमी होणे, कफ होणे, भूक न लागणे, पायाचे पंजे कडक होणे अशी लक्षणे दिसतात. रोगाची लागण झालेला कालावधी, त्याची तिव्रता, प्राण्याचे वय व रोग प्रतीकार शक्ती यावर विषाणू च्या संसर्गाची तिव्रता लक्षात येते. लागण झालेले प्राणी प्रकाश संवेदनशिल बनतात. स्वतःभोवती फिरतात. स्पर्श व वेदनेला संवेदन शिल बनतात. लकवा व क्वचित आंधळेपणा हि लक्षणे दिसतात. हा व्हायरस प्राण्यांच्या दातावरिल इनँमल कोटिंग कालांतराने नष्ट करु लागतो. लागण झाल्यावर व लसीकरण झाले नसल्यास प्राणी जगणे मुष्किल होते त्या साठी लागणपूर्व लसीकरण हा पर्याय आहे. लागण झालेल्या प्राण्यांना विलगीकरण हा पर्याय वापरावा लागतो. दररोज जंतुनाशकाने स्वच्छ ठेवावे लागते. तरच यातून प्राणी बरे होऊ शकतात. हा व्हायरस २० ते २५ डिग्री सेल्सिअस तापमानात काही तासांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. परंतु सावलीत कमी तापमानात ते काही आठवडे टिकू शकतात. या आजारावर लागण होण्यापुर्वी डॉक्टरांच्या सल्याने लसीकरण हाच पर्याय आहे. पिलांना सहा ते आठ आठवडे या वयापासून लसीकरण सूरू करावे. सोळा आठवडे पूर्ण होईपर्यत दर दोन चार आठवड्यांनी बुस्टर डोस देणे सूरू ठेवावे. तिन डोस पूर्ण झाल्या शिवाय ह्या व्हायरस पासून संरक्षण मिळत नाही. कँनाईन डिस्टेंपर या रोगासाठी कोणतीही विशिष्ट उपचार पद्धती ज्ञात नाही. या आजारात पिलांच्या म्रूत्यूचे प्रमाण जास्त आहे.
ह्या व्हायरस चा अहवाल प्रथम स्पेन मध्ये सन १७६१ साली आला. पहिली लस हि इटालियन ‘पुनटोनी’ या संशोधकाने सन १९२४ मध्ये शोधली. या रोगाचा प्रसार वन्यप्राण्यांमध्ये करण्यास भटकी कुत्री जबाबदार असल्याचे लक्षात येते.
वन्यजीव कायद्यानुसार लांडग्यांना संरक्षण असले तरी इतर जंगली मोठ्या प्राण्यांच्या तूलनेत उदाहरणार्थ वाघ, बिबट, सिंह, हत्ती, गवे, गेंडे, अस्वल यांच्या तूलनेत लांडग्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. ह्या दुर्मिळ नष्टप्राय होत चाललेल्या लांडग्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाही.
या सर्व नकारात्मक गोष्टींमधून एक आशेचा किरण समोर दिसतो आहे. लांडग्यांच्या जीवनशैलीचा शास्रीय अभ्यास, त्यांचं संवर्धन व संरक्षण तसेच लांडग्यांच्या अस्तित्वासाठी झगडणाऱ्या विविध संस्था कार्यरत आहेत त्यामध्ये ग्रासलँड ट्रस्ट आँफ इंडिया- पुणे, रेस्क्यू चारिटेबल ट्रस्ट- पुणे , भारतीय वन्यजीव संस्था- डेहराडून, अशोका ट्रस्ट फाँर रिसर्च इन इकाँलाँजी अँन्ड द एन्व्हायरमेंट आणि एनव्हायरमेंटल कन्झर्वेशन आँर्गनायझेशन- दौंड या संस्थांच्या माध्यमातून प्रयत्नपूर्वक लांडग्यांचे वन्यजीवांचे अभ्यासपूर्ण जीवनचक्र सर्वांसमोर मांडण्याचा, त्यांच्या संवर्धनाचा प्रयत्न केला जात आहे. वन्यजीवांचे अस्तित्व टिकवण्यासाठी ह्या संस्था कार्यरत आहेत. आपणही सर्वांनी या पर्यावरणाच्या सर्वच घटकांच्या रक्षणासाठी जाणीवपूर्वक साथ देणे गरजेचे आहे.
लेखन- गायत्री राजगुरव अवधानी
एम. एस. सी. एम. फिल (झूलॉजी)
उपाध्यक्ष- ईनव्हारमेंटल कंजर्वेशन ऑर्गनायझेशन, दौंड.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.