आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

एक जिगरबाज तमाशा फडमालकीन- छाया खिलारे बारामतीकर

साभार लेख - बाबाजी कोरडे

एक जिगरबाज तमाशा फडमालकीन- छाया खिलारे बारामतीकर
—————————–
एखादा कलावंत आपल्या कलेशी किती एकनिष्ठ राहू शकतो या गोष्टीचे मुर्तीमंत उदाहरण म्हणून जेष्ठ तमाशा कलावंतीन व‌ फडमालकीन म्हणून *श्रीमती छायाताई खिलारे बारामतीकर* यांच्याकडे पाहता येईल …!
आमच्या राजगुरुनगर शहराच्या भिमा नदीपलीकडे चांडोली गावच्या यात्रेनिमित्त छाया खिलारे यांच्या तमाशा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने एका तमाशा रसिकाने फोन करुन छायाताईंबरोबर बोलण्यासाठी त्यांच्याकडे फोन दिला.
अत्यंत थकलेल्या आवाजात त्या बोलत होत्या. आवर्जून त्यांनी भेटायला येण्याची विनंती केली.

जेव्हा मी‌ त्यांना भेटायला गेलो, तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. कामगार मंडळी रंगमंच,प्रकाश योजना यांची जुळवाजुळव करत होते.तर कलावंत मंडळी राहुटीमध्ये आराम करत होती.चौकशी करता छायाताई राहुटीतच असल्याचे समजले. तसाच आत गेलो व त्यांच्यापुढे ऊभा राहीलो तर त्यांना पाहुन अक्षरशः अवाक झालो.

छायाताई खिलारे, वय पन्नाशीच्या पुढे, गेल्या तिन पिढ्यांचा तमाशा फड चालवणाऱ्या एक जिगरबाज फडमालकीन…
स्वतः गायिका व वगनाट्य अभिनेत्री…
केवळ दिड-दोन महिन्यांपूर्वी चालू कार्यक्रमात हृदयविकाराचा झटका आला आणि हृदयाची बायपास शस्त्रक्रिया करावी लागली…!!छातीला आजही पट्टा लावून डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देऊनही आपला फड गावोगावी घेऊन जात शस्त्रक्रियेमुळे सुजलेले पाय व विकलांग झालेले शरीर घेऊन तमाशा रसिकांच्या साठी व कलावंतांच्या पोटापाण्यासाठी कार्यक्रम सादर करीत आहे !
त्याबद्दल त्यांना विचारले तर आपल्या कलेशी एकनिष्ठ असणारी ही जिगरबाज कलावंतीण उत्तर देते,
“मी घरात बसले,तर लवकर बरी होणार नाही. त्यापेक्षा फडाबरोबर राहीले तर लवकर बरे वाटेल !”_

केवळ आठ-दहा महिन्यांपूर्वी यजमान तुकाराम खिलारे यांचे चालू कार्यक्रमात ढोलकी वाजवताना हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. आणि दोनच महिन्यांपूर्वी स्वतःला चालू कार्यक्रमात गवळण म्हणताना हृदयविकाराचा झटका आला. ताबडतोब बायपास शस्त्रक्रिया करून अक्षरशः काही दिवसातच शस्त्रक्रिया ताजी असताना पुन्हा रंगमंचावर हजर राहणाऱ्या ह्या जिगरबाज कलावंतीणीकडे पाहून विठाबाई नारायणगांवकर यांची आठवण झाल्याशिवाय राहात नाही…!!

छायाताईंचे वडील स्व.फुलचंद पिंपरीकर यांचा स्वतःचा तमाशा फड होता. ते उत्कृष्ट ढोलकीपटू तर आई यल्लूबाई ह्या उत्तम नृत्यांगना…यांच्या पोटी आठ अपत्यांपैकी एक आपत्य म्हणजेच छायाताई…आईवडिलांचा कलेचा वारसा सांभाळताना त्या आजही थकत नाहीत. कोणतीही तक्रार करत नाहीत.

आज त्यांच्या घराण्यातील तब्बल चार फड महाराष्ट्रातील तमाशा रसिकांच्या सेवेत आहेत.त्यापैकी
1)ईश्वर बापु पिंपरीकर (बंधू)
2)सुनिता राणी बारामतीकर (बहीण)
3)बुवासाहेब पिंपरीकर (बंधू)
4)छाया खिलारे बारामतीकर सहा (चिरंजीव) दिपककुमार बारामतीकर

छायाताई यांच्याशी चर्चा करताना त्यांना शस्त्रक्रियेमुळे आलेला थकवा त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता.
तरीही त्या आपल्या घराण्याविषयी व कलेविषयी बोलताना उत्साहाने बोलत होत्या.जुना कलेचा बाज हा खानदानी होता, आता ते ऐकणारे खुप कमी झालेत.असे बोलून त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नैराश्य दिसत होते.कलावंतांविषयी बोलताना जुने व नवीन यांच्यातील भेद त्या सांगत होत्या.जुन्या कलावंतांच्या वागण्यातील प्रामाणिकपणा आताच्या पिढीत कमी झाल्याची खंत त्यांना सतावत होती.

त्यांच्याच फडातील दोन तरुण कलावंत प्रत्येकी तब्बल पंचेचाळीस हजार रुपये ऊचल घेऊन आठदहा दिवसात गायब झाले.
खाजगी सावकाराकडून कर्ज घेऊन कलावंताला ते ऊचल म्हणून दिले जातात,आणि अशा प्रकारे जर कलावंत पैसे घेऊन फसवणूक करत असतील,
तर फडमालकाने कोणाकडे दाद मागायची ?
दिवसेंदिवस फडमालक वाढत्या खर्चामुळे बेजार होऊन कर्जबाजारी होत चाललाय. आणि सध्याच्या कलावंताला या गोष्टीचे काहीच घेणं देणं नाही.या गोष्टी थांबल्या पाहीजेत…

सुमारे दिड एक तास आम्ही तमाशा विषयी चर्चा करत होतो.
चार मोठ्या ट्रक व सत्तर माणसांचा लवाजमा घेऊन हृदयाची शस्त्रक्रिया ताजी असताना आपल्या फडाबरोबर गावोगावी भटकंती करत कला सादर करणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे…याबद्दल जेंव्हा छायाताईंना आराम करण्याची गरज आहे असे म्हटले, तर त्यांनी उत्तर दिले,मी घरी बसले तर सत्तर माणसं घरी बसतील. त्यापेक्षा रंगमंचावर कला सादर करतांना मृत्यू आला तर माझ्या जीवनाचं सार्थक झाल्याचा आनंदच होईल मला…!! छायाताईंचे हे शब्द ऐकून अचंबित व्हायची आता माझी वेळ होती !शतशः सलाम अशा कलावंतांना, जे आपल्या हृदयातील दु:ख न दाखवता रसिकांना आपल्या कलेतून आनंद देत आहेत…

🙏🙏🙏🙏🙏
✍🏻
बाबाजी कोरडे
9730730146

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.