आपला जिल्हाराजकीय

शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न -मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या समवेत झालेल्या बैठकीतील निर्णयांचे अनुपालन व कामकाजाचा आढावा घेण्यासाठी तसेच शिरूर लोकसभेतील अन्य महत्त्वाच्या विषयांवर तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी काल दि.२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील, जुन्नरचे माजी आमदार, जिल्हाप्रमुख शरददादा सोनवणे, अप्पर जिल्हाधिकारी श्री देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे, सार्वजनिक विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता, आदिवासी प्रकल्प विभाग, पुरातत्व विभाग, जिल्हा परिषदेचे अधिकारी, चासकमान- भामा आसखेड प्रकल्पाचे अधिकारी, वनविभाग तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज विकास आराखड्याचे प्रकल्प सल्लागार आदि उपस्थित होते.

या बैठकीत वढू व तुळापूर येथील ग्रामस्थांच्या उपस्थितीत धर्मवीर संभाजी महाराज विकास आराखड्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण झाले. उपस्थित ग्रामस्थांनी महाराजांचे स्मारक हे पर्यटनक्षेत्र न वाटता ऐतिहासिक, शिवकालीन आठवण करून देणारे व भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या मनात जाज्वल्य राष्ट्रभक्ती जागवणारे असायला हवे यासह विविध सूचना या बैठकीत आढळराव पाटील यांनी केल्या. गावातील गायरान जमीन संपादित करताना ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे, तुळापूर-वढूला जोडणाऱ्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येऊन या ठिकाणी आपटी जवळील पुलाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणीही आढळराव पाटील यांनी यावेळी केली. सर्व सूचना ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात माझ्याकडे तसेच जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुढील आठ दिवसात द्याव्यात जेणेकरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पुढील सादरीकरणात या सर्व बाबी अंतर्भूत केल्या जातील असे ग्रामस्थांना यावेळी आढळराव पाटील यांनी सांगितले. ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले.

राजगुरुनगर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या पंचायत समिती इमारतीसाठी पूर्वीची पाच कोटी रुपयांची मान्यता सुधारित करून नव्याने १३.९० कोटी रकमेचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. अद्यावत करण्यात आलेल्या या इमारतीच्या रचनेविषयी संबंधित अधिकाऱ्यांकडून विस्तृत माहिती घेण्यात आली. ग्रामविकास मंत्री गिरीशजी महाजन यांची मी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे तात्काळ निधीची मागणी देखील केलेली आहे, त्यामुळे लवकरच या इमारतीचे पूर्वीच्या जागेत काम सुरू होणार असल्याचा निर्वाळा यावेळी आढळराव पाटील यांनी दिला.

खानापूर, ता.जुन्नर येथे आदिवासी हिरडा प्रक्रिया उद्योग सुरू करणे, आंबेगव्हाण येथे बिबट सफारी प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कार्यवाही करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बिबट सफारीसाठी आंबेगव्हाणची जागा शासनाकडून निश्चित झाल्याने या जागेचा सर्वे व इतर बाबी पूर्ण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून राज्य शासनाकडे निविदा मान्यतेसाठी सादर करण्यात आल्याचे संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाप्रमुख, मा.आमदार शरददादा सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पूर येथे आदिवासी समाजाचे दैवत असलेले कुकडेश्वर मंदिर जतन व संवर्धनाचे काम तात्काळ हाती घेण्याबाबत चर्चा झाली. याबाबतचा अहवाल येत्या दोन दिवसात संचालक, पुरातत्व विभाग, मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सदर कामी शासनाकडून निधी मंजूर असून आदिवासी बांधव गेले अनेक वर्षांपासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पुरातत्व विभागाने निविदेसाठी आवश्यक गोष्टी तात्काळ पार पाडण्याच्या सूचना केल्या.

खेड तालुक्यासाठी सर्व शासकीय कार्यालय एकाच छताखाली यावीत यासाठी भव्य स्वरूपाची प्रशस्त खेड तालुका प्रशासकीय इमारतीसाठी राजगुरुनगर शहरातील कृषी विभागाची कांदा-लसूण संशोधन केंद्र जवळची जागा अथवा सार्वजनिक बांधकाम विभाग रेस्ट हाऊस जवळील जागेचा सर्वे करण्यात येऊन त्या दृष्टीने सुमारे पाच एकर जागा इमारतीसाठी महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावी याबाबत चर्चा झाली. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांनी कृषी विभागाची जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांची सोय लक्षात घेता येथील जागेत चांगल्या प्रकारची इमारत होऊ शकेल असे मत आढळराव पाटील यांनी मांडले. या जागेचा तात्काळ सर्वे होऊन अहवाल सादर करण्यात यावा व जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव तयार करण्यात यावा अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या.

चाकण नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी चाकण शहरातील महसूल विभागाची गट नं.२४९३ क्षेत्र १.९२ हेक्टर.आर.पैकी चार एकर जागा महसूल विभागाने नगरपरिषदेस लवकरात लवकर हस्तांतरित करावी जेणेकरून या ठिकाणी दर्जेदार नगर परिषदेची इमारत बांधण्यात येईल असे यावेळी जिल्हाधिकारी यांना आढळराव पाटील यांनी सांगितले त्यांनी देखील यास संमती देत हा प्रस्ताव मंजूर करणार असल्याचे सांगितले. खेड तालुक्यात झपाट्याने होणारा विस्तार पाहता नागरिकांच्या सोयीसाठी तालुक्याचे महसूल विभाजन होऊन कामाचे सुसूत्रता यावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली. त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

यासह थिटेवाडी केंदूर येथील शेकडो एकर क्षेत्रावरील जादा राखीव पुनर्वसनाचे शिक्के कमी करावे, धानोरे पुनर्वसन गावठाण येथील पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावून भूखंड आराखडे मंजूर करावेत, भामा आसखेड व चासकमान प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा अथवा चुकीचे वाटप झालेल्या जमिनी मूळ मालकांना परत द्याव्यात याबाबत अपर जिल्हाधिकारी देशमुख यांच्याशी शेतकरी शिष्टमंडळाची सविस्तर चर्चा झाली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.