जारकरवाडी येथील ढोबळे कुटुंबाने अभिनव पद्धतीने साजरा केला मकर संक्रांतीचा सण!!

जारकरवाडी येथील ढोबळे कुटुंबाने अभिनव पद्धतीने साजरा केला मकर संक्रांतीचा सण!!
संस्काराची शिदोरी ही नेहमीच आपणाला आपल्या थोरा मोठ्यांकडून अनुभवांतून मिळत असते.आपली हिंदू संस्कृती ही किती समृद्ध आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण साजरे करत असलेले सण उत्सव!!
तिळगुळाचे लाडू,पतंग,हळदी कुंकू आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात होणारे खास पदार्थ अशा सर्व बाजूंनी आपली संस्कृती,खाद्यसंस्कृती आणि सामाजिक आपुलकी जपणारा सण म्हणजे मकर संक्रांत!!
आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी गावच्या ढोबळेवाडी येथे राहणाऱ्या निवृत्त फॉरेस्ट अधिकारी श्री.सोपानराव भाऊ ढोबळे यांनी व यांच्या कुटुंबीयांनी हिंदू संस्कृतीत साजरे केले जाणारे विविध सण,रूढी,परंपरा यांचे जतन करण्याचा वसा हाती घेतलेला आहे.समाजात आपुलकीची, बंधूभावाची,आत्मीयतेची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी हे कुटुंब नेहमीच अग्रेसर असते. नुकताच संपूर्ण देशात संपन्न झालेला मकर संक्रांतीचा सण हा या कुटुंबाने अभिनव पद्धतीने साजरा केला आहे.
या सणाचे औचित्य साधून ढोबळे कुटुंबीयांनी ढोबळेवाडीतील सर्व महिला भगिनींसाठी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यादरम्यान उपस्थित सर्व महिलांसाठी संगीत खुर्चीचा खेळ देखील आयोजित करण्यात आला होता. याशिवाय महिला भगिनींसाठी सौभाग्याचं लेणं म्हणून ओळख असणाऱ्या सौभाग्य वाणाचे वाटप करण्यात आले. तसेच संगीत खुर्चीत सहभागी महिलांसाठी व विजेत्या महिलांसाठी विविध स्वरूपाची आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात आली.
आपली हिंदू संस्कृती इतकी प्रगल्भ आणि सर्वसमावेशक आहे की त्यातून सर्वांनाच काही ना काही शिकण्याची उमेद मिळत असल्याची भावना निवृत्त फॉरेस्ट अधिकारी सोपानराव ढोबळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
या कार्यक्रमात महिला भगिनींनी घेतलेले उखाणे उपस्थित सर्वांची दाद घेऊन गेले.हे कुटुंब गावातील सर्वांना सोबत घेऊन दरवर्षी रथसप्तमी,तुळशीचे लग्न आधी सण उत्सव देखील मोठ्या उत्साहाने साजरे करत असतात.
यापुढील काळातही हे परंपरा अशीच सुरू ठेवून या रूढी परंपरा जपण्याचे कार्य सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने व महिला भगिनींच्या पुढाकाराने केले जाणार असल्याची प्रतिक्रिया नितीन ढोबळे यांनी पंचनामाशी बोलताना व्यक्त केली.