आजच्या पिढीने वाचन संस्कृती जपली पाहिजे – आढळराव पाटील!!
सुर्यकांत थोरात यांच्या काळीज कथा संग्रहाचे प्रकाशन मंचर येथे संपन्न!!

आजच्या पिढीने वाचन संस्कृती जपली पाहिजे – आढळराव पाटील!!
सुर्यकांत थोरात यांच्या काळीज कथा संग्रहाचे प्रकाशन मंचर येथे संपन्न!!
प्रतिनिधी- समीर गोरडे
दिवसेंदिवस आजची पिढी मोबाईल सारख्या गोष्टीत गुंतून पडली आहे. त्यांना यातून बाहेर काढायचे असेल तर चांगली पुस्तके, वर्तमानपत्रे, इतिहासाच्या गोष्टी वाचनास दिल्या पाहिजेत. अवांतर वेळात वाचनाची आवड माणसाला विवेकशील बनवते. विवेकशीलता व संस्कृती जपण्यासाठी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. असे मत शिरूर लोकसभा मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंचर येथे निवृत्त तहसीलदार व लेखक सुर्यकांत थोरात लिखीत काळीज या कथासंग्रहाचे प्रकाशन समयी केले.
यावेळी पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे माजी खासदार आढळराव पाटील, प्रसिद्ध बालसाहित्यिक, कवी, लेखक सचिन बेंडभर पाटील, भाजपा प्रवक्ते वसंतराव जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आढळराव पाटील म्हणाले की आंबेगाव हा साहित्यिकांचा वारसा असणारा तालुका असून पुढच्या पिढीने तो चालवला पाहिजे. अखिल भारतीय साहित्य संमेलन घेण्याबाबत शासन पातळीवर प्रयत्न करू असे आश्वासन आढळराव पाटील यांनी दिले.
यावेळी बालसाहित्यिक, कवी, लेखक सचिन बेंडभर पाटील म्हणाले की साहित्य मानवी जीवनाला प्रेरणा देणारे व चिरंतर असते. मंचर हे कवयित्री शांता शेळके, निसर्ग कवी ग. ह. पाटील, भीमसेन देठे, शं. का. थोरात, राजाराम पारधी या सारख्या महान विभूतींची कर्मभूमी आहे. त्यांच्या साहित्य प्रेरणेतून आंबेगाव तालुक्यात कवी, लेखक पिढी घडत आहे. परंतू अश्या साहित्य भूमीत अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले नाही. ते पुढील काळात व्हावे अशी खंत व आवाहन ही केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव जाधव म्हणाले की महसूल खात्यात काम करणारे साहित्यिक सुर्यकांत थोरात हे संवेदशील व्यक्तिमत्व असून काळीज हा कथासंग्रह प्रेरणा देणारा असून त्यात भावविश्व दिसून येते. तो वाचकांच्या पसंतीला निश्चित उतरेल.
सुर्यकांत थोरात यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा व त्यांच्या सुविध्य पत्नी निर्मला थोरात यांचा अमृतमहोत्सव सोहळा पार पडला. यावेळी लेखक सचिन बेंडभर पाटील यांच्या मामाच्या मळ्यात हा काव्यसंग्रह एम. ए. च्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमात आल्याने त्यांचा सत्कार आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रंथतुला करुन मंचर ग्राम पंचायत वाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमास निवृत्त उपविभागीय अधिकारी सुनंदा गायकवाड, निवृत्त तहसीलदार महादेव भवारी, निवृत्त गटविकास अधिकारी सखाराम भालेराव, जेष्ठ नागरिक संघ तालुका समन्वय समिती अध्यक्ष दशरथ भालेराव, उपाध्यक्ष आयुब इनामदार, जेष्ठ नागरिक संघ मंचर अध्यक्ष बाळासाहेब खानदेशी, अरुण लोंढे, बी. एल. शिंदे, भास्कर लोंढे, कामठे सर, शिवसेना तालुका अध्यक्ष सुनील बाणखेले, शिवाजी राजगुरू, प्रकाश जोशी, संतोष डोके, धर्मराज गवारी, मंचर माजी सरपंच दत्ता गांजाळे, सुरेश इंदोरे, विकास कोकाटे तसेच जेष्ठ नागरिक संघ व महाराष्ट्र साहित्य परिषद मंचर, महसूल खात्यातील माजी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन खडकी सरपंच संदीप वाबळे तर आभार अशोत थोरात यांनी मानले.