आरोग्य व शिक्षण

प्रत्येकाने आपापल्या गावातील पर्यटन संधी शोधाव्यात-अमोल कोरडे

प्रत्येकाने आपापल्या गावातील पर्यटन संधी शोधाव्यात-अमोल कोरडे

राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे,समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग,बेल्हे व जुन्नर पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “वैभवशाली जुन्नरचे पर्यटन” या विषयावर आधारित विद्यापीठ स्तरीय तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बोरी बुद्रुक व बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथील ८ लाख वर्षापूर्वी इंडोनेशियातील ज्वालामुखीची राख (टेफ्रा) व अश्मयुगातील बोरी येथे उत्खननात सापडलेल्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयास भेट दिली असता उपस्थित विद्यार्थ्याना बोरी बुद्रुक पर्यटन व सांस्कृतीक वारसा समितीचे अमोल कोरडे यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी बोरी खुर्द चे उपसरपंच महेश काळे,रंजन जाधव,गोरक्ष शेटे,तंटामुक्ती समिती बोरी चे अध्यक्ष युवराज कोरडे,साळवाडी गावचे तंटामुक्ती समिती अध्यक्ष रोहन बेल्हेकर,मनसुख बांगर,डॉ.उत्तम काळे,अशोक डेरे,बाळासाहेब पाटोळे,विलास जाधव,स्वप्निल कोरडे,अर्जुन जाधव,संदीप जाधव,नारायण कोरडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी अमोल कोरडे म्हणाले की बोरी बुद्रुक व बोरी खुर्द येथील कुकडी नदी पात्रा लगत दहा ठिकाणी आढळणाऱ्या ज्वालामुखी राखेचा संबंध इंडोनेशियातील टोबा ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या राखेशी आहे.डेक्कन कॉलेज पुणे,पुरातत्त्व विभाग व पुणे विद्यापीठ भूगोल विभाग यांच्या संशोधनातून सदर राखेचे कालमापन करण्यात आले व त्यांना सदर राखेच्या खाली अश्मयुगीन हत्यारे सापडली यावरून या ठिकाणी आदिमानव राहत होते हे सिद्ध झाले.त्याचबरोबर या संशोधकांना उत्खननात सापडलेल्या लाखो वर्षांपूर्वीच्या जीवाश्मचे अवशेष त्यात २ मीटर लांबीचा हस्तीदंत व इतर अवशेष देखील सापडले.बोरी बुद्रुक ग्रामपंचायत ने त्याच्या संवर्धनाकरिता वाळू लिलावास स्थगिती आणून बोरी बुद्रुक व बोरी खुर्द अशा दोन्ही गावांची पर्यटन व सांस्कृतिक वारसा समिती स्थापन करून संवर्धनाचे प्रयत्न चालू केले.लोकसहभागातून नदीत सापडणाऱ्या व ग्रामस्थांकडे असणारे वस्तूंचे छोटे खाणी वस्तू संग्रहालय बोरी बुद्रुक गावात उभे करण्यात आले आहे.

गावात आढळणाऱ्या प्रागैतिहासिक पर्यटन,सांस्कृतिक पर्यटन,कृषी पर्यटन,निसर्ग पर्यटन यांच्यावर आधारित गावचा विकास आराखडा गावाने तयार केलेला असून याद्वारे दोन दिवसांचे पर्यटनाचे पॅकेज; एक दिवस बोरी पर्यटन व दुसऱ्या दिवशी जुन्नर पर्यटन उपलब्ध करून देणे बाबत प्रयत्न चालू आहे.गावातील बारा बलुतेदार पद्धतीचे लोकजीवन व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून समाजातील सर्व घटकांना पर्यटनाभिमुख ग्रामविकासाचा लाभ मिळवून देण्यासाठी विविध संस्था शासकीय विभाग यांच्यासोबत काम व नियोजन चालू केले आहे.डेक्कन कॉलेज,पुरातत्व विभाग यांच्यासोबत सामंजस्य करार केला असून पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शनाखाली बोरी बुद्रुक येथे वस्तू संग्रहालय व बोरी खुर्द येथे टेफ्रा संवर्धनाचा प्रस्ताव सरकार दरबारी सादर केला आहे.

पर्यटनाद्वारे जास्तीत जास्त लोकांना रोजगार व उत्पादनाचे साधन उपलब्ध होत असल्याने तरुणांनी आपल्या गावातील सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा जपण्याचा वसा घेतल्यास अर्थार्जनासोबतच ग्रामीण संस्कृती संवर्धनाचे काम होवून उत्पादन वाढीबरोबर रोजगार निर्मिती देखील होऊ शकते.
या शिबिरासाठी समर्थ कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप गाडेकर,रासेयो कार्यक्रम अधिकारी विपुल नवले,दिनेश जाधव,अमोल काळे,तेजश्री गुंजाळ,गौरी भोर व जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे योगदान व सहकार्य मिळाले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.