आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

कृषी दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांचा एल्गार, मरण आले तरी मागे हटणार नाही !!

कृषी दिनाच्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांचा एल्गार, मरण आले तरी मागे हटणार नाही !!

खेड, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील कोरडवाहू गावांना वरदान ठरणाऱ्या कळमोडी प्रकल्पाला गती मिळण्यासाठी व डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी थेट नगर जिल्ह्यात नेण्याचा घाट घालणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधव सहा दिवसांपासून उपोषण आंदोलन करत आहेत.

माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात येतो. आज त्यांच्या स्मृतींना आंदोलक शेतकऱ्यांनी अभिवादन केले तसेच सिंदखेडराजा, बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर दुर्दैवी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

आंदोलक शेतकरी यांची उपोषणाच्या सहाव्या दिवशी शिवसेना जिल्हाप्रमुख व किल्ले शिवनेरी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आझाद मैदान, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांच्या तीव्र प्रतिक्रिया जाणून घेतल्या. कळमोडी धरणाचे पाणी सातगाव पठारसह लोणी धामणी परिसरापर्यंत नेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निर्णय घेतल्यास या परिसरातील शेतकरी या सरकारला आयुष्यभर विसरणार नाहीत. जुन्नर – आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील बुडीत बंधाऱ्यांना पाण्याची कायमस्वरूपी तरतूद करण्यासाठी नव्याने सर्व्हे करण्यात यावा. जुन्नर तालुक्यातील कोपरे मांडवे येथे एम.आय. टँक, आणे पठाराचा कुकडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यात यावा तसेच डिंभे धरणाचे पाणी बोगद्याद्वारे नेत असताना संचयिय पाणी पातळीपेक्षा खाली खोदकाम केल्यास संपूर्ण धरण कोरडे पडण्याचा धोका आहे. परिणामी आदिवासी भाग व घोडनदी परिसरातील संपूर्ण गावे पिण्याच्या पाण्यापासून तसेच शेतीच्या पाण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण होणार आहे. त्यामुळे या सर्व बाबींवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांना सोबत घेऊन लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांना भेटणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले.

यावेळी युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर, युवासेना जिल्हाप्रमुख प्रविण थोरात पाटील, उपोषणकर्ते रविंद्र तोत्रे, आप्पा तोडकर, सूर्यकांत ढमाले, संकेत बढे, युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल पोखरकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल बांगर, श्रीकांत पोखरकर, खंडेराया ट्रान्सपोर्टचे राहुल पोखरकर, संतोष पोखरकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.