माजी विद्यार्थी हीच शाळेची संपत्ती- प्रा.दिलीप फडके
उंटवाडी विद्यालयात रंगला आम्ही शाळकरी स्नेहमेळावा!!

माजी विद्यार्थी हीच शाळेची संपत्ती- प्रा. दिलीप फडके
उंटवाडी विद्यालयात रंगला आम्ही शाळकरी स्नेहमेळावा!!
नाशिक :- कोणतीही शाळा आपल्या गुणवंत-ज्ञानवंत-प्रज्ञावंत विद्यार्थ्यांनी ओळखली जाते. शाळेचा नावलौकिक वाढवण्यात आजी-माजी विद्यार्थ्यांसह संस्था, शाळा, समाज यांचा सिंहाचा वाटा असतो. अशा उपक्रमशील शाळेचे माजी विद्यार्थी हीच संपत्ती असतात, असे गौरवोदगार नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.दिलीप फडके यांनी काढले.
सिडको येथील उंटवाडी माध्यमिक विद्यालयाच्या १९९५-९६ बॅचच्या ‘आम्ही शाळकरी’ या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात प्रा.फडके बोलत होते. मंचावर नाशिक एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंढे, कार्यवाह राजेंद्र निकम, माजी कार्यवाह शशांक मदाने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील सबनीस, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कृष्णा राऊत, पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास पाटील, शिक्षक मंडळ अध्यक्ष दिलीप अहिरे, सदस्य विजय मापारी, उंटवाडी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नंदिनी कहांडळ, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका कल्पना उदावंत आदी उपस्थित होते.
२७ वर्षांनंतर भेटलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींच्या गप्पा रंगल्या. एकमेकांच्या सुखदुःखाच्या आणि शाळेत असतानाच्या आठवणी जाग्या झाल्या. गुरुजनांनी केलेलं सहकार्य, दिलेली उभारी आणि अध्यापनासह जीवनसंस्कारांचे दिलेले धडे याबद्दल भावना मांडत आपल्या विचारांना विद्यार्थ्यांनी मोकळी वाट करून दिली. निरोप घेताना सर्वांचेच डोळे पाणावले. ‘दरवर्षी असेच भेटत राहू,’ अशा आणाभाका सर्वांनी घेतल्या. मंचावरील मान्यवरांसह ज्येष्ठ शिक्षक डी.डी.पवार, मधुकर पगारे, ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा कुलकर्णी, बाळासाहेब आहेर, प्रवीण जाधव, अश्विनी पाटील, अंकुल देवरे, प्रशांत केंदळे यांचा सन्मान माजी विद्यार्थ्यांनी विशेष स्नेहभेट देत केला. विद्यार्थ्यांनी माध्यमिक विद्यालयाला २५ अत्याधुनिक पंखे आणि प्राथमिक विद्यालयाला साऊंडसिस्टिम अशी पंच्याहत्तर हजारांपेक्षा अधिक रकमेची देणगी देत आपले ऋण जपले.
सर्व पाहुण्यांनी स्नेहमेळाव्याचे भरभरून कौतुक करत सर्वांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ बासरीवादक सुनील बच्छाव यांचे बासरीवादन आणि युवाकवी प्रशांत केंदळे यांच्या ‘शाळा माझी सुंदर आहे’ या कवितेसह त्यांनी सादर केलेल्या अनंत राऊत यांच्या ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’ या कवितांनी मैत्रीचे बंध अधिक घट्ट केले. मेळाव्याच्या दिवशी वाढदिवस असणाऱ्या प्रसिद्ध गायिका दीपाली वरुडे यांच्या सुमधुर गीताने वातावरण मंत्रमुग्ध केले. योगेश पाटील, अतुल खैरनार, नरेंद्र वाघ, सुधाकर लासूरकर, उमेश पाटील, रूपाली सूर्यवंशी, प्रतिभा कऱ्हे, नयना कुलकर्णी, ज्योती रत्नपारखी, गोपाळ बडगुजर, मुस्तफा शेख, प्रदीप माने, सचिन आवारे, अविनाश बच्छाव, दौलत शिंदे अशा सर्व माजी विद्यार्थ्यांसह विद्यालयाच्या कर्मचारी वर्गाने उत्तम संयोजन केले. योगेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. ज्योती रत्नपारखी आणि रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.
उंटवाडी माध्यमिक विद्यालयात १९९५-९६च्या बॅचचे ‘आम्ही शाळकरी’ या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी जमलेले माजी विद्यार्थी आणि शिक्षक.