आरोग्य व शिक्षणसामाजिक

जलपर्णीपासून परिवर्तनाची दिशा; रोजगार, स्वाभिमान आणि सशक्तीकरण !!

वीड टू वेल्थ’ प्रकल्पाची मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केली पाहणी

पंचनामा ठाणे जिल्हा प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (UMED) अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील वरप, ता. कल्याण येथे नाविन्यपूर्ण निरुपयोगी जलपर्णी पासून उपयुक्त हस्तकला प्रशिक्षण व रोजगार निर्मिती प्रकल्प ‘वीड टू वेल्थ’ अजय बहुउद्देशीय संस्था यांच्या मदतीने राबविण्यात येत आहे.

   या प्रकल्पास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि प्रकल्प संचालक, जि.ग्रा.वी.योजना  छायादेवी शिसोदे यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधण्यात आला व महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून त्यांचे कौतुक करण्यात आले.

    यावेळी बोलताना रोहन घुगे म्हणाले, "समाजोपयोगी व संसार उपयोगी वस्तू बनविण्याची कल्पना सुचली आणि आज, महिलांना हा जगण्याचा मार्ग मिळाला आहे. महिलांना स्वबळावर उभं करण्यासाठी हा रोजगार अत्यंत महत्त्वाचा आहे." ते पुढे म्हणाले, "आपण तयार करत असलेल्या वस्तूंना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आपल्याकडे जलपर्णीचा कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, आणि तुम्हीच पुढाकार घेऊन या कामाला उंचावर घेऊन जाणार आहात. त्यामुळे भविष्यात आपले जीवन सुखकर आणि संपन्न होईल याची खात्री आहे."

प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे म्हणाल्या, “हे सर्व जणू स्वप्नवत वाटते. याआधी जलपर्णीविषयी अनेक उच्चस्तरीय बैठकांचे आयोजन झाले, पण त्याचे पुढे काही घडले नाही. मात्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने व पुढाकारामुळे हा प्रश्न मार्गी लागला आणि आज आपण त्याचे यशस्वी रूप प्रत्यक्ष पाहत आहोत. महिलांचा वाढता सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद पाहून अत्यंत समाधान वाटते.”

गट विकास अधिकारी (पंचायत समिती, कल्याण) संजय भोये, गट विकास अधिकारी (पं. स. अंबरनाथ) पंडित राठोड, सहाय्यक गट विकास अधिकारी (पं. स. कल्याण) रघुनाथ गवारी, विस्तार अधिकारी (ग्रा.पं.), पं. स. कल्याण पराग भोसले, विस्तार अधिकारी, उमेद, जिल्हा अभियान व्यवस्थापक (DMM), ठाणे सारिका भोसले, तसेच BMM, BM, CC स्टाफ, कल्याण व अंबरनाथ व बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून त्यांच्यात उद्योजकता विकसित होण्यास मदत होत आहे. हा प्रकल्प केवळ उपजीविकेचा नव्हे, तर स्वाभिमानाचा आणि सशक्तीकरणाचा मार्ग बनला आहे असे मत जय शिवराय स्वयं सहायता समूहाचे (म्हारळ) वर्षां शिरसाठ यांनी व्यक्त केले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.