शिरदाळे(ता.आंबेगाव) येथील गावतळ्यात मुबलक पाणी साठा!!

शिरदाळे(ता.आंबेगाव) येथील गावतळ्यात मुबलक पाणी साठा!!
गेल्या काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे शिरदाळे येथील गावतळे ७०% पेक्षा जास्त भरले असून परतीच्या पावसाने भविष्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शिरदाळे गाव तसे डोंगरावर वसलेले कोरडवाहू शेती असलेलं गाव. डोंगराळ भाग असल्याने फक्त पावसावर अवलंबून असणारी शेती या ठिकाणी केली जाते. त्यात शाश्वत उत्पन्न नाही. बटाटा आणि ज्वारी ही येथील मुख्य पिके परंतु पावसाचे कमी जास्त प्रमाण यामुळे त्यांची शाश्वती नसते. यावर्षी संपूर्ण पावसाळा कोरडा चालला होता तरी देखील बटाटा पीक यात टिकून होते परंतु गेल्या आठ दिवसात झालेल्या अतिपावसामुळे बटाटा पीक हातातून गेले आहे. तर तलावात चांगला पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे निसर्ग हा कशी कृपा करेल सांगता येत नाही.
या पावसाने तलाव भरल्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तसेच यामुळे नळपाणीपुरवठा करताना उन्हाळ्यात अडचण येणार नाही आणि सर्वांना मुबलक पाणी देता येईल असे सरपंच जयश्री तांबे,उपसरपंच बिपीन चौधरी यांनी सांगितले. तर या पावसामुळे बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पंचनामे करून त्वरित नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी मा.सरपंच मनोज तांबे,गणेश तांबे,मा.उपसरपंच मयुर सरडे यांनी केली आहे.
सरकारच्या नियमानुसार ३३% नुकसान झाले तर नुकसानभरपाई मिळते तसेच ६५मिली पेक्षा जास्त पाऊस झाला तर त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पाहणी केली जाते. परंतु पर्जन्यमापक हे पारगाव या ठिकाणी असून ते लोणी धामणी शिरदाळे परिसरपासून खूप लांब आहे. त्यामुळे पर्जन्यमान मोजताना प्रत्यक्ष पाऊस कमी जास्त असतो आणि पर्जन्यमान हे पारगाव या ठिकाणावरून मोजले जाते. त्यामुळे लोणी धामणी या ठिकाणी एखादे पर्जन्यमापक बसवावे ज्याचा फायदा या भागातील शेतकऱ्यांना होईल. असे मत मा. उपसरपंच श्री.मयुर सरडे यांनी व्यक्त केले.