लोकसहभागातून साकारली एस.टी. सेवा ; लोणी-धामणीकरांच्या श्रमदानाचा ऐतिहासिक ठेवा!

पंचनामा प्रतिनिधी – आजच्या काळात विकासकामांसाठी शासनाकडे अपेक्षेने पाहिले जाते. मात्र, तब्बल सहा दशकांपूर्वी लोणी-धामणी परिसरातील नागरिकांनी एकजुटीच्या बळावर लोकसहभागातून विकासाचा आदर्श निर्माण केला होता. १६ जून १९५८ हा दिवस या परिसराच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. याच दिवशी मंचरहून पहिली एस.टी. बस धामणी, लोणी आणि वडगाव पीर येथे पोहोचली आणि ग्रामीण भागाच्या प्रवासाला विकासाची नवी दिशा मिळाली.
विशेष म्हणजे, या एस.टी. सेवेसाठी आवश्यक असलेला रस्ता तत्कालीन लोणी-धामणी परिसरातील नागरिकांनी स्वतः श्रमदान करून तयार केला होता. शासनाची भूमिका स्पष्ट होती, ‘एस.टी. सेवा हवी असेल, तर आधी रस्ता तयार करा!’ शासनाच्या या अटीपुढे हात टेकण्याऐवजी नागरिकांनी एकजुटीने पुढाकार घेतला. स्वतःच्या श्रमातून रस्ता तयार करून दाखविला आणि गावात एस.टी. सेवा आणण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले.

त्या काळात वाहतुकीची साधने मर्यादित होती. गावागावांत एस.टी. पोहोचणे ही मोठी उपलब्धी मानली जात होती. शिक्षण, शेती, व्यापार, आरोग्य आणि दैनंदिन कामांसाठी प्रवास करणे ग्रामीण नागरिकांसाठी सुलभ व्हावे, या दृष्टीने ही सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली.
आजच्या पिढीने या इतिहासातून लोकसहभाग, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श घेण्याची गरज आहे. केवळ शासनावर अवलंबून न राहता गावाच्या विकासासाठी नागरिकांनी एकत्र आल्यास किती मोठे परिवर्तन घडू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे १९५८ मध्ये सुरू झालेली ही एस.टी. सेवा होय.

आज भविष्यात ही एस.टी. सेवा किती काळ टिकेल, याबाबत प्रश्नचिन्ह असले तरी या सेवेसाठी स्वतःचा घाम गाळणाऱ्या तत्कालीन लोणी-धामणी परिसरातील नागरिकांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.

लोकसहभागातून विकासाचा मार्ग निर्माण करणाऱ्या त्या दूरदृष्टीच्या नागरिकांना आणि तत्कालीन कार्यकर्त्यांना मानाचा मुजरा!

