
तमाशा ही विनोदी आणि मनोरंजक सादरीकरणातून लोकांचे मनोरंजन करणारी महाराष्ट्राची एक जुनी व लोकप्रिय लोककला आहे. महाराष्ट्रातील लोकरंगभूमीवरील एक अतिशय लोकप्रिय कलाविष्कार असलेल्या तमाशा कलाप्रकारात लोकभाषेतून लोकरंजनाद्वारे लोकशिक्षण देण्याचे काम केले जाते. ‘सोंगाड्या’ हा तमाशाचा एक अविभाज्य आणि अतिशय महत्त्वाचा भाग आहे; किंबहुना, तमाशा कलेचा प्राणवायू म्हणजे सोंगाड्या, त्याच्याशिवाय तमाशा अपूर्णच असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. सोंगाड्या आपल्या विनोदबुद्धी चातुर्याने, हजरजबाबीपणाने आणि मिश्किल विनोदाने रसिकांना मनमुराद हसवतोच; परंतु प्रसंगावधान राखून आपल्या तीव्र विनोदबुद्धीने समाजातील विसंगतीवर मार्मिक टीका – टिप्पणी करतो. सोंगाड्या आपल्या हास्य विनोदाने रसिकांच्या मनात घर करतो आणि मनोरंजन व सामाजिक भाष्य करण्याचे दुहेरी कार्य करतो. अनेक दिग्गज कलावंतांनी सोंगाड्याच्या भूमिकेला अजरामर केले असून ‘विनोदसम्राट’ या बिरुदावलीसह रसिकांच्या ह्रदयात अढळस्थान प्राप्त केले आहे. परंतु या सर्व विनोदसम्राट सोंगाड्यांमध्येही ‘दगडोबा तांबे साळी शिरोलीकर’ हे एक असे सोंगाड्या होऊन गेले ज्यांचा उल्लेख आजही ‘सोंगाड्यांचा सम्राट’ असा केला जातो. दगडोबा साळी तांबे शिरोलीकर हे शिघ्रकवी होते, शाहीर होते; परंतु कवित्वापेक्षा ‘सोंगाड्या कलाकार’ म्हणून खेड्यापाड्यात अतिशय प्रसिद्ध होते. शाब्दिक कोट्या लढवण्याचे चातुर्य, चपखल हजरजबाबीपणा आणि निरनिराळी सोंगे हुबेहूब वठविण्याचे कसब दगडोबांजवळ एवढे होते की दगडोबा बोर्डावर चढले की टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. कोणाचीही नक्कल करण्यात पटाईत असलेल्या दगडोबा साळी तांबे शिरोलीकर यांचा सोंगाड्या म्हणून कला – अभिनय अतिशय उच्च आणि श्रेष्ठ प्रतीचा असल्याने त्यांना ‘सोंगाड्यांचा सम्राट’ म्हणत असत.
दगडोबा साळी तांबे शिरोलीकर यांचा जन्म जुन्नर तालुक्यातील बोरी जवळील शिरोली गावी दिनांक ८ सप्टेंबर १८८० रोजी झाला. संत एकनाथ महाराजांचे पैठण हे मूळ गाव असलेले दगडोबा साळी तांबे शिरोलीकर यांचे पूर्वज काही पिढ्या अगोदरच शिरोली गावी स्थायिक झाले होते आणि त्यांचा पिढीजात हातमागाचा व्यवसाय होता. कुकडी नदीच्या पलीकडे दगडोबांच्या वाडवडिलांचे घर होते; परंतु पुढे आई सईबाई आणि वडील कोंडाजी यांनी शिरोलीत कायमचे पाचखणी घर घेतले. या घरातच दगडोबांचे बालपण उनाडक्या करण्यात गेले. लहान असले तरी आपल्या मनाविरुद्ध घडणारी कोणतीही गोष्ट दगडोबांना आवडत नसे. घरातील किंवा बाहेरील कितीही मोठ्या व्यक्तीच्या अथवा जवळच्या नातेवाईकाच्या कोणत्याही प्रकारच्या दडपणाला त्यांनी कधीही जुमानले नाही. पहिलीतून दुसऱ्या इयत्तेत गेलेल्या दगडोबांचे मन शाळेत कधी रमलेच नाही. फक्त शरीराने ते शाळेत असत; परंतु मनाने मात्र ते इतरत्र कुठेतरी भटकत असत. अशा तऱ्हेवाईक वागण्यामुळे दप्तरातील पाटीवर सव्वीस अक्षरांचा खेळ दगडोबांना कधी जमलाच नाही आणि इतर काही गोष्टींकडेच त्यांच्या मनाचा कल असायचा. दगडोबांच्या अशा तऱ्हेवाईक वागण्यामुळे व आगळ्यावेगळ्या स्वभावामुळे दगडोबांच्या पुढील आयुष्याबाबत सतत चिंता वाटणाऱ्या वडील कोंडाजींनी वयाच्या नवव्या वर्षीच दगडोबांचे दोनाचे चार हात करून टाकले. शाळेला कंटाळलेल्या दगडोबांचे मन शाळेतील मित्रमंडळीत तर नाहीच; पण शिरोलीतही फारसे रमेनासे झाले.
शाळेचा काच लागलेल्या दगडोबांनी दुसऱ्या इयत्तेत असताना भलतेच विचित्र धाडस केले आणि घरच्या मंडळींना चांगलाच गुंगारा दिला. एके दिवशी शाळेत जायला निघालेल्या दगडोबांनी दप्तर कुठेतरी लपवून ठेवले आणि गावातील एका ओळखीच्या बाईंकडे,’भाऊंनी सांगड मागितली आहे’ असे वडिलांचे खोटे नाव सांगून मागून घेतली. लाकडाचे ओंडके आणि बांबूपासून बनवलेले पाण्यावर तरंगणारे एक होडीसारखे तात्पुरते साधन म्हणजे ‘सांगड’ दगडोबांनी मिळवली आणि कुकडी नदी गाठली. वयाच्या दहाव्या वर्षी कुकडी नदीला बऱ्यापैकी पूर आलेला असताना दगडोबांनी सांगड पाण्यात घालून पैलतीर गाठले आणि पलीकडेच असलेल्या बहिणीच्या घराचा आश्रय घेतला. बहिणीकडे रडत रडत आपले मन मोकळे केले, माझी इच्छा नसतानाही मला घरचे कसे जबरदस्तीने शाळेत पाठवतात याचा पाढा वाचला आणि ‘ताई तूच माझी यातून सुटका कर, मला काही आता शाळेत जायचे नाही’ अशी विनवणी केली. घरातून रूसून पुराच्या पाण्यातून आलेला छोटा भाऊ दगडोबांसाठी मायेचा पाझर फुटलेल्या बहिणीने, ‘आता तू माझ्याजवळच राहा, मी तुला सांभाळीन’ असा आधार दिला खरा; परंतु, ‘आपण घरातून पळून आलो, आपले वडील व भाऊ आपला शोध घेत येतील, आपल्याला परत ओढत घरी नेतील आणि परत सर्व पहिल्यासारखेच आपल्या मर्जी विरूद्ध घडत राहील’ या विचाराने घालमेल झालेल्या दगडोबांनी त्याच दिवशी अर्ध्या रात्री सगळे झोपलेले असताना हळूच बहिणीच्या घरातील टोपल्यातील उरलेल्या शिळ्या भाकरी एका फडक्यात बांधून घेत पोबारा केला.
रात्रीच्या काळोखात संगमनेरचा रस्ता धरलेल्या दगडोबांनी सकाळी घारगावची नदी सहज पार केली. परंतु, संगमनेरमध्ये प्रवेश करताना दुथडी भरून वाहणारी प्रवरा नदी पार करण्यासाठी दगडोबांना होडीने प्रवास करावा लागला आणि होडी अर्ध्या नदीपात्रात आली असताना नावाडी जेव्हा पैसे जमा करत करत दगडोबांकडे आला तेव्हा खिशात पैसे नसलेल्या दगडोबांनी क्षणार्धात प्रवराच्या वाहत्या धारेत उडी टाकली व किनारा गाठला. रस्त्यातील दोन गावांमध्ये ओळखीच्या नातेवाईकांकडे दोन मुक्काम करून दगडोबा एकदाचे नाशिकला पोहोचले. परंतु कडाडून भूक लागलेल्या दगडोबांना काय करावे सुचत नव्हते; आजूबाजूला कोणीही ओळखीचे नसल्याने चिंताग्रस्त दगडोबा पंचवटीतील राम मंदिराच्या दारात बसून रडू लागले. एका सद्गृहस्थाने रडणाऱ्या दगडोबांची आस्थापूर्वक विचारपूस केली असता आणि दगडोबांनी दिलेल्या माहितीनुसार ‘हा मुलगा हातमागावर काम करणाऱ्या आपल्या ओळखीच्या कोंडाजीचा मुलगा आहे’ अशी त्यांची खात्री झाली. सदर गृहस्थाने दगडोबांना आपल्या घरी नेऊन जेवू घातले, कपडे देऊन त्यांची राहण्याची सोय केली आणि ‘तुमचा मुलगा नाशिकला आपल्याकडे सुखरूप आहे’ अशी खबरही शिरोलीच्या कोंडाजीला दिली. यथावकाश नाशिकला जाऊन कोंडाजी दगडोबांना पुन्हा शिरोलीला घेऊन आले आणि येथूनच पुढे त्यांच्या शालेय जीवनाचा शेवट होऊन त्यांची व शाळेची कायमची ताटातूट झाली.
वयाच्या अकराव्या वर्षी शाळेला कायमचा रामराम करून दगडोबा आपल्या थकलेल्या वडिलांच्या हातमागावरील कामात लक्ष घालू लागले. परंतु हातमागाच्या कामापेक्षा पिढीजात असलेल्या घरातल्या शाहिरी – भेदिक गाण्यांकडे दगडोबा अधिक आकर्षित होऊ लागले. शाहिरी – भेदिक गाण्यात प्रसिद्ध असलेल्या दगडोंबाच्या घराण्यात शाहिरी – भेदिक गाण्याची अनेक पिढ्यांची वैभवशाली परंपरा होती. शाहिरी कवनात व भेदिक गाण्यात दगडोबाच्या वाड-वडिलांचा मोठा नावलौकिक होता. दिवसभर पिढीजात व्यवसाय विणकामाचा माग काढायचा आणि रात्री शाहिरी कवनाची किंवा भेदिक गाण्याची पानं अन् पानं चाळत बसून उभी रात्र जागून काढायची अशी या घराण्यात शाहिरी – भेदिक कलेची व शाहिरी संप्रदायाची आवड होती. एखाद्या शेतकऱ्याच्या घरी पिढ्यानपिढ्या धनधान्याची सधनता असावी त्याप्रमाणे या घराण्यात शाहिरी – भेदिक गाण्याची सधनता होती. कलगीवाले संप्रदायातील या एकाच घराण्यात पिढ्यानपिढ्या श्रेष्ठ शाहिर किंवा कलावंत जन्माला आले होते हा ईश्वरी योगायोगच म्हणावा लागेल. सातव्या पिढीतील दगडोबांच्या गळ्यातूनही भेदिक गाण्यांचे सूर बाहेर पडू लागले आणि हळूहळू ते भेदिक गाण्यात तरबेज होत गेले; शाहिरी त्यांच्या जिभेवर खेळू लागली व शाहिरी – भेदिक गाण्याचा नादच त्यांना जडला. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत घरच्या हातमागावरील कामापेक्षा शाहिरी – भेदिक गाण्यातच अधिक हुशार झालेल्या दगडोबाची प्रतिभा पाहून अचंबित झालेले वडील कोंडाजीनी समाधानाने अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनानंतर कौटुंबिक जबाबदारी पडलेल्या आणि हातमाग व्यवसायात फारसा रस नसलेल्या दगडोबांनी शाहिरी – भेदिक गाण्याच्या छंदापायी शिरोली गाव सोडले.
कोंडाजींच्या निधनानंतर काहीसे निराधार झालेल्या दगडोबांना वडिलांचा शिष्य असलेल्या दौला नाईक यांनी आधार दिला आणि दगडोबा शिरोली सोडून ओतूरजवळील उदापूर येथे राहायला आले. सुरूवातीला उदापूर येथे हातमागाचा व्यवसाय सुरू केलेले दगडोबा हळूहळू दौला नाईक यांच्या बरोबर गावोगावच्या यात्रा – जत्रांमधील शाहिरी – भेदिक गाण्याच्या फडात जाऊन गाऊ लागले. आजूबाजूच्या गावातील यात्रा – जत्रा – उरूसांच्या शाहिरी – भेदिक फडात दगडोबा मुद्दामहून जात आणि डफ तुणतुण्याच्या ठेक्यावर श्रोत्यांना रात्रभर गुंगवून टाकत. अशा शाहिरी फडांच्या कार्यक्रमात दगडोबांना आवर्जून बोलावणे होऊ लागले, कधी कधी जाणकार श्रोत्यांकडून दगडोबांना मानाचा मंदिल मिळू लागला आणि ओतूर – जुन्नर परिसरात कलगीवाला शाहिर म्हणून दगडोबांचा बोलबाला वाढतच राहिला. उदापूर गावात शाहिरी – भेदिक गाण्यातील कलावंत म्हणून दगडोबांची खाऱ्या अर्थाने जडणघडण होऊन त्यांना नावलौकिक मिळाला. परंतु यात्रा – जत्रांचा हंगाम सोडला तर हातमागाच्या धंद्यात दगडोबांना फारसा रस नव्हता आणि उदापूर सारख्या छोट्या गावात पोटापाण्यासाठी फार काही करण्यासारखे नसल्याने दोन अडीच वर्षातच त्यांनी उदापूर सोडले.
दगडोबा आपल्या जन्मगावी शिरोलीला न जाता संगमनेरला आले आणि पुन्हा हातमागाचा धंदा सुरू केला. कलगीवाले शाहीर म्हणून दगडोंबांचा नावलौकिक झाला होताच; त्यामुळे शाहिरी – भेदिक गाण्याचा चाहता वर्ग त्यांच्याभोवती जमायला वेळ लागला नाही. सुरूवातीला चारचौघात बसून शाहिरी – भेदिक गाणी गाणाऱ्या दगडोबांच्या अधूनमधून बैठकी होऊ लागल्या आणि शाहीर म्हणून दगडोबांच्या नावाचा चोहीकडे गाजावाजा होत राहिला. परंतु संगमनेरमध्ये दगडोबांना तंत्र – मंत्र विद्येचा भलताच नाद लागला आणि काही कालावधीतच तंत्र – मंत्र विद्या हस्तगत करून त्यामध्ये ते चांगलेच पारंगत झाले. या तंत्र – मंत्र विद्येचा माणसाच्या भल्यासाठी प्रयोग करण्याच्या स्वभावामुळे या विद्येचा फायदा घेण्यासाठी दगडोबांकडे चांगल्या – वाईट दोन्ही प्रकारच्या माणसांची वर्दळ वाढली. आपल्या दारात आलेल्या भल्याबुऱ्या माणसांची गरज ओळखून त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने तंत्र – मंत्र विद्येचे भारी भारी यशस्वी प्रयोग करण्याचा छंद दगडोबांना लागला होता आणि त्यामध्ये त्यांना आनंदही मिळत होता. संगमनेरमध्ये शाहिरी – भेदिक गाण्याचा आणि कलावंतांचा चाहता असलेला हमीद नावाचा एक मोठा दर्दी रसिक दगडोबांना भेटला. कलावंतांच्या बैठकी किंवा मैफली करण्याचा नाद असलेल्या हमीदखानच्या कानावर दगडोबांच्या शाहिरीचा नावलौकिक पोहचला आणि त्यांनी दगडोबांना एका मैफलीचे निमंत्रण दिले. दगडोबांचा सुरेल आवाज, ठेकेदार शाहिरी गाणे, शाहिरीचे ज्ञान व कला ऐकून त्यादिवशी संगमनेरमध्ये साक्षात् सरस्वती अवतरल्याचा अविस्मरणीय अनुभव रसिकांनी घेतला. त्या दिवशी मैफलीत तृप्त झालेल्या रसिकांनी दगडोबा साळी तांबे यांच्या रूपाने संगमनेरला एक आगळेवेगळे रत्न लाभले आहे असा डंका शहरभर पिटला.
हमीदखानच्या सहकार्याने मशिदीजवळच्या भव्य पटांगणात संगमनेरमधील प्रतिष्ठित व जाणकार रसिक प्रेक्षकांसमोर दगडोबांच्या मैफलींचे कार्यक्रम नियमितपणे होऊ लागले. कलेचा निस्सीम चाहता आणि सच्चा कला रत्नपारखी असलेल्या हमीदखानला दगडोबांचा सार्थ अभिमान वाटत होता आणि त्यामुळेच दगडोबा, हमीदखान आणि दगडोबांचा एक सहकारी कोंडाजी राऊळ यांच्या नियमितपणे भेटीगाठी होत होत्या. एकदा अशाच एका भेटीत, ‘तुमच्या अंगी असलेल्या कलागुणांच्या आणि शाहिरी – भेदिक गाण्याच्या सामर्थ्यावर तुम्ही स्वतःचा फड उभा केला तर मी सर्वोतोपरी मदत करायला तयार आहे’ असे हमीदखानने दगडोबांना सुचवले. हमीदखानच्या मदतीच्या आश्वासनाने आपले कलागुण दाखविण्याच्या चालून आलेल्या संधीमुळे दगडोबांनी स्वतःचा फड उभा करण्याचा निर्णय घेतला आणि चंदूशहा फकीर, सावळा निरगुडकर, रंगनाथ जातेगावकर, गुरव भराडीकर आदी सहकलावंतांना सांगावा धाडला. यामुळे दगडोबांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळून ‘शाहीर दगडु तांबे साळी शिरोलीकर’ हा तमाशा फड उभा राहिला आणि आतापर्यंत ‘कलगीवाले शाहीर’ म्हणून प्रसिद्ध असलेले दगडोबा पहिल्यांदा तमाशात उभे राहिले. शाहिरी – भेदिक गाण्याच्या नावलौकिकामुळे अल्पावधीतच ‘शाहीर दगडु तांबे साळी शिरोलीकर’ या तमाशा फडाची किर्तीही सर्वदूर पोहोचली आणि त्यांना चहूबाजूंनी निमंत्रणे येऊ लागली. त्याकाळात कलेला आणि कलावंतांना आश्रय देणाऱ्या कोल्हापूर, बडोदा, इंदोर, देवास, ग्वाल्हेर येथील संस्थानिकांच्या दरबारापर्यंत शाहीर दगडुदादा तांबे साळी शिरोलीकर यांच्या शाहिरी – भेदिक गाण्याचा आणि तमाशा फडाचा नावलौकिक पोहचला होता.
सन १९२० मध्ये दगडोबांच्या तमाशा फडाला इंदोरच्या राजदरबारात कला सादर करण्याचे निमंत्रण मिळाले. दगडोबा फक्त शाहीर नव्हते; तर एक कसलेले कलावंत, उत्कृष्ट अभिनय, शिघ्र कवी आणि उत्तम सोंगाड्या म्हणूनही त्यांची ओळख होती. इंदोर सरकारच्या राजदरबारात दगडोबांनी एका गरोदर बाईचे सोंग सादर करताना… तिचे चालणे, बोलणे, उठणे, बसणे एवढे हुबेहूब व उत्तम सादर केले की महाराणी सरकारांनी खूश होऊन दगडोबांना भरजरी कपड्यांचे बक्षिस देऊन त्यांचा गौरव तर केलाच; पण इंदोर सरकारकडून त्यांना तनखा सुरू करून त्यांच्या कलागुणांचा यथोचित सन्मानही केला. बडोदा सरकारच्या निमंत्रणावरून सयाजीराव गायकवाड महाराज आणि त्यांचे धाकटे युवराज यांच्या उपस्थितीतही दगडोबांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळाली आणि दरबारात त्यांचा सन्मानही करण्यात आला. धार आणि उज्जैन संस्थानांच्या दरबाराचे निमंत्रणही दगडोबांच्या तमाशा फडाला मिळाले आणि तिथेही दरबारात त्यांचा मानाचे शेला – पागोटे देऊन सन्मान झाला. दगडोबांचा संस्थानी राजदरबारी सन्मान आणि त्यांच्या कलागुणांचा असा गौरव झाल्याने या फडाची किर्ती यशोशिखरावर पोहचली आणि दगडु साळी तांबे शिरोलीकर हा तमाशा फड नव्या जोमाने तमाशा व्यवसाय क्षेत्रात उतरत मुंबई, पुणे येथील तमाशा थिएटरमध्ये दाखल झाला.
कौटुंबिक आयुष्यात किंवा वैवाहिक जीवनात आतापर्यंत फारसे सुख मिळाले नसल्याची खंत दगडोबांना होती. आपल्याला अवगत असलेल्या तंत्र – मंत्र विद्येचा फायदा व्हावा म्हणून आपण सर्वांना मदत केली. परंतु काही लोकांनी आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्या विद्येचा दुरूपयोग केला; त्यामुळे आपल्याला वैवाहिक जीवनात सुख मिळाले नाही अशी खंत त्यांना एकसारखी छळत होती. एकूण चार लग्नं होऊनही त्यांच्या एकाही पत्नीचे मूल जगले नाही आणि त्यामुळे त्यांचा संसार कधीच स्थिरावला नाही. आपल्याला मूल-बाळ नाही यामुळे आलेली खिन्नता व चिंता दगडोबांच्या मनावर खोलवर परिणाम करत होती. एकदा आळंदीला देवदर्शनासाठी आले असता एकाएकी आपण पाबळजवळच्या वडगाव पीर येथे दर्शनासाठी जावे असा विचार दगडोबांच्या मनात आला आणि वडगावला जाऊन मनोभावे दर्शन घेऊन त्यांनी पीराला ‘नवस’ केला. यानंतर काही दिवसातच दगडोबांच्या पत्नीला दिवस जाऊन दिनांक २३ जुलै १९२१ रोजी त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि मुलाचे नाव दत्तोबा ठेवण्यात आले. दत्तोबांच्या जन्मानंतर घरातील तंत्र – मंत्र विद्येची सर्व साधन-सामुग्री दगडोबांनी नदीत विसर्जित केली आणि तंत्र – मंत्र विद्या कायमची सोडली. यानंतर हळूहळू दगडोबांचा संसार स्थिरावत जाऊन मुलाबाळांच्या खेळण्या – बागडण्यामुळे घराचे गोकुळ झाले आणि खऱ्या अर्थाने दगडोबांना सुखा समाधानाचे दिवस पाहायला मिळाले. देव नवसाला पावला या श्रद्धेपोटी फाल्गुन वद्य नवमीला वडगाव पीर येथील उरूसाला दरवर्षी आवर्जून उपस्थित राहत दगडोबांनी आपल्या फडाची हजेरी देऊन दत्तोबांचा जन्मदिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्याची प्रथा सुरू केली.
आतापर्यंत शाहीर – भेदिक कलावंत अशी दगडोबांची ओळख होती पण आता फडाचे मालक, शिघ्र कवी, वग रचनाकार आणि तमाशातील उत्तम सोंगाड्या म्हणूनही ते नावारूपाला आले होते. कोणाचीही हुबेहूब नक्कल करण्यात पटाईत असलेल्या दगडोबांच्या अंगी कोणतेही सोंग जसेच्या तसे वठविण्याचे कौशल्य होते. बोर्डावर वगनाट्य सुरू असतानाच आतमध्ये जाऊन झटपट सोंग रंगवून ते दर्जेदार पद्धतीने वठविण्यात हातखंडा असलेल्या दगडोबांचे सोंगाड्याचे काम आवर्जून पाहण्यासाठी रसिक पंधरा पंधरा – वीस वीस किलोमीटर अंतर चालत येत असत असा त्यांचा बोलबाला होता. अंगी असलेल्या असामान्य विनोदबुद्धी चातुर्याच्या गुणांमुळे दगडोबांच्या सोंगाड्याला कधीही अकारण अश्लील विनोद करण्याची गरज पडली नाही. तरीसुद्धा, त्यांच्या विनोदाने सामान्य रसिकांना हसून हसून गडबडा लोळायला भाग पाडले. उच्च दर्जाच्या विनोदामुळे त्यांनी तमाशातील सोंगाड्याला व सोंगाड्याच्या विनोदाला चांगला दर्जा तर मिळवून दिलाच; परंतु अतिशय दर्जेदार कला अभिनयामुळे सोंगाड्या म्हणून रसिकांनी दगडोबांनाही ‘सोंगाड्यांचा सम्राट’ अशी बिरुदावली बहाल करून त्यांचा यथोचित गौरव केला. शाब्दिक कोट्या करून विनोद निर्माण करणे किंवा एका शब्दातून अनेक अर्थ काढत रसिकांना खळखळून हसविण्याचे दगडोबांचे कसब वाखाणण्याजोगे होते. राजा हरिश्चंद्र, गोरा कुंभार, राजा श्रीयाळ हे त्यांच्या तमाशा फडाचे गाजलेले वग होते. तमाशाच्या बोर्डावर उभे राहिले की विनोद निर्मितीचे सर्व प्रकार दगडोबा अगदी सहजपणे हाताळत असत आणि छोट्या छोट्या प्रसंगातून रसिकांना पोट धरून हसायला लावत. विनोदातील प्रासंगिक हजरजबाबीपणा आणि उपरोधिकपणा यामुळे दगडोबा बोर्डावर आले रे आले की टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत असे.
दगडोबांचे कलगीवाले संप्रदाय घराणे असल्यामुळे कलगी – तुऱ्याच्या सामन्यांचा त्यांना मोठा अनुभव होता. सुप्रसिद्ध तमाशा कलावंत व फडवाले पठ्ठे बापूराव, शिवा – संभा कौलापूरकर, शिवा तासगावकर यांच्याशी त्यांचा अनेकदा सामना झाला होता आणि प्रतिस्पर्ध्याला तोडीस तोड, सवालाला जबाब, उत्तराला प्रत्युत्तर दिले होते. पुण्यातील विजयानंद थिएटरमध्ये विठु पाटील सुरळीकर यांच्याशी दगडोबांच्या दीड महिना रंगलेल्या सवाल – जबाब सामन्याची दिर्घकाळ चर्चा होत राहिली होती. आबुशेठ नावाचे मुंबईतील एक तमाशा काॅन्ट्रॅक्टर पुण्यातील रविवार पेठेत चालवत असलेल्या तमाशा थिएटरमध्ये कलगीतुऱ्याचे सामने व्हायचे आणि रात्री नऊ वाजल्यापासून पहाटे चार साडेचार पर्यंत उत्तरोत्तर वाढत जाणारी कलगीतुरा सामन्याची रंगत पाहण्यासाठी त्यावेळी आसपासच्या खेड्यातील लोक मोठ्या संख्येने बैलगाड्या घेऊन यायचे. सन १९३५ मध्ये एके दिवशी थिएटरवर शाहीर पठ्ठे बापूराव यांचा तमाशा होणार असल्याचा बोर्ड झळकला आणि तिकीट बारीवर प्रचंड गर्दी होऊन तासाभरातच ‘हाऊसफुल्ल’ बोर्ड लावण्यात आला. सर्वांच्या नजरा रंगमंचाकडे खिळलेल्या असतानाच पडदा वर सरकला आणि गणगौळण झाल्यावर अंगात काळा कोट, करवतकाठी धोतर, गुलाबी बनारसी फेटा, गोरा वर्ण, रूबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले शाहीर पठ्ठे बापूराव हातात डफ घेऊन पुढे येताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
रसिकांच्या चरणी मानाचा मुजरा करून पठ्ठे बापूरावांनी डफावर थाप टाकत आपल्या खड्या आवाजात लावणी म्हणायला सुरुवात केली...’पठ्ठे बापूराव कवीचा घोडा, शामकर्णी आज सुटला खरा… तुरेवाल्याच्या चला पोरांनो, कुणीतरी येऊन बघू धरा..ऽ’ असे म्हणून शाहीर पठ्ठे बापूरावांनी रसिक मायबापांच्या साक्षीने तुरेवाले शाहीरांना, ‘माझा शामकर्णी घोडा आज चौफेर धावत असून त्याला अडविण्यासाठी तुरेवाले शाहीरांनी पुढे येऊन माझ्याशी सामना करावा’ असे जाहीर आव्हान दिले. पठ्ठे बापूरावांच्या आवाजाने सर्वत्र शांतता पसरलेल्या थिएटरमध्ये हे आव्हान स्वीकारण्यासाठी कोणी तुरेवाला शाहीर पुढे येतोय का? हे पाहण्यासाठी अनेकांच्या माना वळल्या होत्या. अशातच कडाडणाऱ्या ढोलकीच्या ठेक्यावर पठ्ठे बापूरावांनी सवाल टाकला, ‘नऊ एक नऊ नऊ दोनी अठरा, एक आणि आठ बघा नऊ कसे ? नऊ त्रिक सत्तावीस दोन आणि सात, नऊ बेरीज बघा पुन्हा दिसे…’ अशी नऊच्या पाढ्यातील प्रत्येक संख्येची बेरीज नऊ येते…तर तुरेवाले शाहीरांनी असाच दुसरा पाढा करून दाखवावा असे आव्हान पठ्ठे बापूरावांनी दिले. थिएटरमध्ये उपस्थित असलेल्या अनेक तुरेवाले शाहिरांसह सर्व रसिक स्तब्ध होऊन शांतपणे एकटक पठ्ठे बापूरावांकडे बघत होते आणि पठ्ठे बापूराव मोठ्या आत्मविश्वासाने, ‘माझ्या सवालाला जबाब द्यावा, अन्यथा सोळा हात लुगडं नेसून, हातभर बांगड्या भरून उपस्थित तुरेवाले शाहिरांनी फुंकणीने चूल फुंकीत बसावे’ असे थिएटरभर नजर फिरवीत सांगत होते. घड्याळाचा काटा उत्तररात्रीकडे सरकू लागला तरी पठ्ठे बापूरावांचे आव्हान स्वीकारण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. अखेरीस थिएटरवाले आबूशेठ यांनी हा तिढा सोडवण्यासाठी, ‘मी पुण्यातील शाहिरांना आणखी एक दिवसाची मुदत देतो, उद्या या सवालाचा जबाब द्यावा’ अशी सर्वांना विनंती केली. दुसऱ्या दिवशी संपूर्ण पुणे शहरात नाक्यानाक्यावर व चौकाचौकात पठ्ठे बापूरावांच्या सवालाची, नऊच्या पाढ्याची, बेरजेच्या नऊची उलटसुलट चर्चा रंगली होती, तर महात्मा फुले मंडईत कोणीतरी नऊच्या पाढ्याचा मला मोठा कापडी फलक लावला होता.
संध्याकाळ होताच थिएटरमध्ये घुसण्यासाठी दर्दी रसिकांनी एकच गर्दी केली आणि तासाभरातच हाऊसफुल्लचा बोर्ड लागला. थिएटर खचाखच भरून बाहेरही तेवढीच गर्दी उभी होती; दोन दिवसातील धंद्यामुळे आबुशेठ मात्र मनोमन खुश होता. रंगमंचावरील पडदा वर जाऊन ढोलकीवर थाप पडताच रसिकांच्या टाळ्या शिट्यांच्या गजरात पठ्ठे बापूरावांचे बोर्डावर आगमन झाले आणि रसिक मायबापांच्या चरणी मानाचा मुजरा करून त्यांनी गण म्हणायला सुरुवात केली. गण संपताच, ‘एक दिवसाची मुदत संपली आहे आणि अजून तरी एकही तुरेवाला शाहीर जबाब देण्यासाठी पुढे आलेला नाही, ही तुरेवाले शाहिरांची हार मानावी का?’ असे समोर बसलेल्या नामांकित तुरेवाले शाहिरांकडे एक तिरकस कटाक्ष टाकत पठ्ठे बापूराव म्हणाले. बोर्डासमोरच खाली मान घालून बसलेल्या भाऊ फक्कड, शिवा – संभा कौलापूरकर, शंकर अवसरीकर, भागू माळी अशा नावाजलेल्या तुरेवाले शाहिरांना पठ्ठे बापूरावांच्या बोलण्याने अंगावर वीज पडल्यासारखे वाटले. एकजण म्हणाला,’पठ्ठे बापूंची विद्वत्ता अफाट आहे’, दुसरा म्हणाला, ‘बापूंचे आव्हान कोणाला पेलेल असं वाटत नाही’, तिसरा म्हणाला,तुरेवाल्यांना हार मान्य करावीच लागेल’ अशी कुजबूज रसिकांमध्ये सुरू झाली आणि पठ्ठे बापूरावांनी पुढे होत, ‘तुम्ही बघत आहात की, तुरेवाले शाहिरांनी हार मानलीच आहे; पण थिएटरमध्ये बसलेल्या आमच्या कलगीवाले संप्रदायातील शाहिरांना सुद्धा माझे आव्हान आहे, आता त्यांनी तरी नऊ अंकी पाढ्यासारखा दुसरा पाढा करून दाखवावा’. पठ्ठे बापूरावांनी तुरेवाले शाहिरांना सोडून कलगीवाले शाहिरांचा समाचार घ्यायला सुरुवात केल्याने चेकाळलेल्या रसिकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून पठ्ठे बापूंच्या मागणीचे समर्थनच केले.
कलगीवाले शाहिरांचीही अवस्था तुरेवाले शाहिरांसारखीच झाल्याने रसिकांनी त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली. रसिकांनी खचाखच भरलेल्या थिएटरमधून उठून जावे तर रणांगणातून पळ काढणाऱ्या योद्ध्यासारखा पळपुटेपणा ठरेल अशा विचित्र कोंडीत तुरेवाले व कलगीवाले शाहीर सापडले होते आणि शाहीर पठ्ठे बापूराव मात्र अधिक आक्रमक होऊन, ‘कोणालाच जमत नसेल असा दुसरा नऊचा पाढा तर त्यांनी ढोलकी – तुणतुणं वाजवणे बंद करत तमाशा फडाला कायमचा राम राम करून आपल्या गावी निघून जावे’ असे जळजळीत आणि खोचकपणे बोलत होते. पठ्ठे बापूरावांच्या प्रत्येक शब्द अन् प्रत्येक वाक्याने कलगीवाले शाहिरांना अंगावर असूडाचे फटकारे मारल्यासारखे होऊन त्यांच्या अंगाची लाही लाही झाली होती. अशातच मागच्या बाजूने कोणीतरी खर्ड्या आवाजात गरजले, ‘थांबा’ तसे शिट्टया व टाळ्या वाजवून पठ्ठे बापूरावांना पाठींबा देणाऱ्या सर्वांच्या माना आवाजाच्या दिशेने वळल्या. क्षणभरात सर्वत्र स्तब्ध शांतता पसरली असताना रसिकांनी एवढ्या गर्दीतही आवाज देणाऱ्याला वाट मोकळी करून दिली. बोर्डाच्या समोर आल्यावर आवाज देणाऱ्याचा चेहरा दिसला तसे काहीजण ओरडले, ‘दगडुबाबा साळी… शाहीर दगडुबाबा साळी तांबे शिरोलीकर… सोंगाड्यांचा सम्राट… शाहिरी भेदिक कवनांचा बादशहा’ आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
टाळ्यांच्या कडकडाटातच दगडुबाबा रंगमंचावर चढले आणि रसिकांना हात जोडून नमस्कार करत म्हणाले, ‘मायबाप हो, कालपासून पठ्ठे बापूरावांनी शाहिरांना मोठं आव्हान दिलं, आज तर त्यांनी कलगीवाल्यांनाही सोडलं नाही, म्हणून या आखाड्यात उतरावं लागलं, पठ्ठे बापूराव अन् आम्ही काय वेगळं नाय, आम्ही त्यांच्या कलेचा आदरच करतो, ते आमचा अभिमान आहेत, मी पठ्ठे बापूरावांच्या सवालाला जबाब देणार नाय… फक्त सवालाचा तिढा उलगडून दाखवणार आहे, मला तुमचा आशीर्वाद द्या’ असं म्हणत दगडोबांनी रसिकांच्या चरणी वंदन केले. दगडोबांमुळे मरगळलेल्या वातावरणात अचानक चैतन्य संचारले आणि गणेशाला वंदन करून सवालाचा जबाब ऐकायला आतुर झालेल्या रसिकांसमोर अधिक जास्त गप्पा न मारता किंवा स्वतःचे शाहिरीपण न दाखवता दगडोबा गरजले, ‘मायबाप हो, नऊच्या पाढ्यातील शेवटचा अंक होता नव्वद… या नव्वदच्या अंकाची बेरीजही पठ्ठे बापूरावांनी नऊच केल्याची तुम्ही पाहिली. आता पठ्ठे बापूरावांनी उडवलेला शून्य पुन्हा एकदा बोकांडी बसवून मी तुम्हाला नऊ बेरीज येणारा नऊ अंकासारखाच दुसरा पाढा तुमच्यासमोर सादर करतो. रसिकांनी उस्फूर्तपणे वाजवलेल्या टाळ्यांच्या गजरात ढोलकीच्या तालावर दगडोबा, ‘नव्वद एके नव्वद, नव्वद दुणे एकशे ऐंशी! एक अधिक आठ… नऊ, नऊ अंकाला शून्य जोडी! या दगडु साळ्याचा हिशोब चुकता!… शून्य बसवला बोकांडी … हरे रामा रे…रामा ऽऽ’ असा लावणीचा तोडा गात गात दगडोबांनी…
९० – ९ + ० = ९०
१८० – १ + ८ + ० = ९०
२७० – २ + ७ + ० = ९०
आणि शेवटी ९०० शून्य उडाले = ९० असा नव्वदचा पाढाच भिंतीवर काढला. नव्वद अंक पाढा मोजिता, नव्वद बेरीज घडोघडी, या दगडु साळ्याचा हिशोब सरला, शून्य बसवला बोकांडी… हरे रामा रेऽऽ’ जबाब संपला तसा थिएटरमधून, ‘पटलं…पटलं’ असा आवाज उठता क्षणी एकच गलका झाला, शिट्टया – टाळ्यांच्या प्रचंड गदारोळात पठ्ठे बापूरावांनी दगडोबांना कडकडून मिठी मारली आणि रसिकांनी उभयतांवर चवल्या – पावल्यांची खैरात केली.
याक्षणी दगडोबा साळी तांबे शिरोलीकर यांनी हात जोडून निवेदन करताना, ‘रसिक मायबापहो, कला ही हारण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी नसते, तुमच्या मनोरंजनासाठी असते. पठ्ठे बापूराव आणि मी आमच्यामध्ये कोणी जिंकलं नाही अन् कोणी हरलं नाही, तुमचं मनोरंजन झालं यातच आम्हा कलावंतांची जीत आहे, अशीच तुमची सेवा घडावी असा आशिर्वाद आम्हाला द्या’ अशी दिलदार वृत्ती व मनाचा मोठेपणा दाखवला आणि सर्व कलावंतांनी रसिकांना मुजरा केला. अनेक सुप्रसिद्ध शाहिरांबरोबर दगडोबांचे रंगतदार सामने व्हायचे; परंतु सामना संपला की एकमेकांना आपुलकी व प्रेम भावनेने कडकडून मिठी मारणे, एकमेकांचा मान – सन्मान ठेवत एकमेकांचा आदर राखणे ही दगडोबांची खासियत होती. अशाच एका प्रसंगी, स्वतः उत्तम सोंगाड्या असूनही बोर्डावर कधीच न हसणाऱ्या दगडोबांनी आपला सहकलाकार सोंगाड्या विष्णू बांगर बेल्हेकर यांच्याशी, ‘मला हसवून दाखव, तरच तू खरा सोंगाड्या’ अशी पैंज लावली तेव्हा विष्णू बांगर बेल्हेकर यांनी एक दिवस दगडोबांना मंचावरच खळखळून हसायला भाग पाडले असता विष्णुबुवा बेल्हेकर यांचे कौतुक करून त्यांना, ‘तू खरा विनोदवल्ली आहेस’ अशी बिरुदावली देऊन दगडोबांनी त्यांचा सन्मान केला. दुसऱ्या एका प्रसंगात इगतपुरीजवळच्या एका गावातील मोठ्या यात्रेत दगडुदादा साळी तांबे शिरोलीकर यांनी कणातीमध्ये तिकीटावर एका विशेष खेळाचे आयोजन केले होते. परंतु आदिवासी भागात लोकप्रिय असलेल्या जुन्नरच्या निमगिरी येथील बहुरंगी कलावंत गोविंदा साबळे यांच्या उघड्या माळरानावरील तमाशामुळे दगडुदादांच्या तमाशाकडे रसिकांनी पूर्णपणे पाठ फिरवली. तरीसुद्धा, मोठ्या मनाचे दगडोबा दुसऱ्या दिवशी गोविंदा सबळेंना भेटायला गेले आणि त्याच्यासह सर्व कलाकरांचे अभिनंदन केले. शाहीर दगडुबाबा साळी तांबे शिरोलीकर यांच्याबद्दल नितांत प्रेम व आदर असलेल्या गोविंदाने त्यांना प्रेमाने अलिंगण दिले. गप्पांच्या ओघात नेहमी उघड्या माळरानावर तमाशा करणाऱ्या गोविंदाने, ‘एकदा कणातीत तमाशा करण्याची इच्छा आहे’ असे बोलताच दगडोबांनी त्या सर्व कलाकारांना त्याच दिवशी आपल्या स्वतःच्या कणातीत तमाशा करण्याची परवानगी तर दिलीच; परंतु हाऊसफुल्ल झालेल्या त्या दिवसाच्या खेळाची निम्मी कमाई गोविंदाला देऊन त्यांना तमाशाचे लायसन्सही काढून दिले हा मनाचा दिलदारपणा दगडोबांकडे होता.
उमा बापू चांडोलीकर, बाबू कवठेकर, सावळा औरंगाबादकर, दगडु मिरीकर, शंकर मगणीकर,अहमद बाबू नागापूरकर आदींसारखे तिनशेहून अधिक नामांकित तमाशा कलावंत दगडुबाबा साळी तांबे शिरोलीकर यांचे शिष्य होते. दगडुबाबांच्या अंगी असलेले शाहिरी – भेदिक गाण्याचे ज्ञान आणि जुन्या ग्रंथ वाङमयाचा अभ्यास यामुळे दगडुबाबांचा लौकिक झाला होताच; परंतु तमाशा फडामुळे त्यांच्या नावलौकिकाचा डंका चहूकडे झाला. दगडुबाबांनी शाहिरी – भेदिक गाणी व तमाशा फडाबरोबरच उत्तम संसारही केला. वाढत्या वयाबरोबर दगडुबाबांनी तमाशात काम करणे बंद केले आणि मुलगा दत्तोबाला मार्गदर्शन करण्याचे धोरण अवलंबिले. आपल्या जन्मगावी शिरोली येथे घर बांधले, शेतीही केली, पुण्यात महात्मा फुले मंडईत एक दुकानही चालवले आणि मुख्य म्हणजे मुलगा दत्तोबाला लहानपणापासूनच आपल्या घराण्याची परंपरा व तमाशा कलेत पारंगत केले. यामुळे आपल्या हयातीतच तमाशा कलेत प्रविण झालेले आणि तमाशा फडाचा कारभार समर्थपणे सांभाळणारे फडमालक म्हणून दत्तोबा तांबे यांना पाहण्याचे समाधान व सौभाग्य दगडुबाबा साळी तांबे यांना लाभले. उतारवयातील दगडुबाबांची तब्येत दिवसेंदिवस खालावत गेली आणि घरातील सर्वांकडे समाधानाने बघतच दिनांक २८ डिसेंबर १९५३ रोजी शाहीर दगडुबाबा साळी तांबे शिरोलीकर या एका महान श्रेष्ठ कलावंताची प्राणज्योत मालवली. कालांतराने या श्रेष्ठ कलावंताची आठवण म्हणून शिरोलीकर ग्रामस्थांनी शाहीर दगडुबाबा साळी तांबे शिरोलीकर यांचे कुकडी नदी तीरावर समाधी मंदिर बांधून कायमचे स्मारक उभे केले.
विशेष सहकार्य:-
कैलास दत्तोबा तांबे, शिरोलीकर
~ लेखक ~
संजय वसंतराव नलावडे
धोलवड, जुन्नर (मुंबई)
मोबाइल - ९१६७९३७०४०
‘निसर्गरम्य जुन्नर – भूमी गुणिजनांची’
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



