
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन !!
पंचनामा प्रतिनिधी – श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालय येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ व भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथालय विभाग, मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगल उनवणे यांनी केले, तर प्रा. नीलम गायकवाड यांनी प्रास्ताविकातून वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विशद केले.
वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा. अनिल पडवळ, प्रा. अमित मुलानी आणि प्रा. गवारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासातून विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा, नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी आणि पुस्तकांच्या माध्यमातून आपले ज्ञान समृद्ध करावे, असे आवाहन त्यांनी केले.
वाचन हे केवळ परीक्षेपुरते मर्यादित न ठेवता जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असेही त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. डॉ. कलाम यांचे जीवन हे जिद्द, मेहनत, ज्ञान आणि स्वप्नपूर्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन मोठी स्वप्ने पाहावीत, ज्ञानप्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत आणि वाचनाच्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.सुभाष घोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास दोन्ही महाविद्यालयांतील प्राचार्य, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, ज्ञानाची गोडी वाढवणे आणि वाचन संस्कृती अधिक समृद्ध करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.



