आरोग्य व शिक्षणसामाजिक

निफाड सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा संघर्ष सभेत एल्गार !!

निफाड प्रांत कार्यालयावर पुढील आठवड्यात मोर्चा धडकणार !!

पंचनामा नाशिक प्रतिनिधी – निफाड सहकारी साखर कारखाना विक्रीस काढून गिळंकृत करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी आज सभासद, कामगार तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघर्ष सभेत एल्गार पुकारला. जिल्हा बँकेला व शासनाला जाग आणण्यासाठी पुढील आठवड्यात निफाड तहसील व प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. निसाका प्रवेशद्वारावर झालेल्या या संघर्ष सभेला सर्वपक्षीय सभासद व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निसाकाची जमीन विक्री व निसाका वाचविण्यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून जनआंदोलनात सहभागी होण्याचा ठराव करण्यात आला.

निफाडचे मा.आमदार अनिल कदम यांनी या संघर्ष मेळाव्यात सहभागी होत आपण पूर्णपणे सभासद व कामगारांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. तसेच सत्तेच्या बळावर निसाका विक्री करून निसाकाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गिळंकृत करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात येईल असे सांगितले. यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र मोगल, शिवाजीराजे ढेपले, धोंडीराम आप्पा रायते, निसाका युनियनचे सरचिटणीस बी.जी.पाटील, कार्याध्यक्ष प्रमोद गडाख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील, दिलीप नाना मोरे, विजय रसाळ, शेतकरी संघटनेचे भगवान बोराडे, हर्षल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच या जनआंदोलनाच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.

निफाड कारखान्याची विक्री रद्द करा… निसाका आमच्या हक्काचा… नाही कुणाच्या बापाचा… निसाकाचे भंगार विकणाऱ्यावर गुन्हे दाखल करावे… सभासद व कामगार एकजुटीचा विजय असो… या घोषणांनी निसाका दुमदुमून गेला होता. निशाका संघर्ष सभेचे प्रस्ताविक सुभाष झोमन व प्रमोद गडाख यांनी केले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख खंडू बोडके पाटील यांनी सर्वांना निसाका बचावाची शपथ दिली व जनआंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली. त्यानंतर निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांना सर्वपक्षीय संघर्ष समिती व कामगार यांच्यातर्फे निसाकाचे भंगार व यंत्रसामग्री विक्री करणाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिंदे सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे उपस्थित होते.

पुढील आठवड्यात निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढणे , निसाका विक्रीला विरोध, भाडेपट्टा कराराचा पुनर्विचार करून पुनर्रचना करावी , देखभाल – दुरुस्तीच्या नावाखाली यंत्र सामुग्रीची झालेली विक्री याची चौकशी करून वसूली करावी , असे ठराव मंजूर झाले- निसाका वाचविण्यासाठी कायदेशीर न्यायालयीन लढाई केली जाणार असून त्याची जबाबदारी यावेळी सर्वानुमते राजेंद्र मोगल व हर्षल मोरे यांच्यावर सोपविण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन खंडू बोडके पाटील व प्रमोद गडाख यांनी केले.

निसाकाच्या संघर्ष सभेस मा. संचालक डी.बी आण्णा मोगल, भास्कर शिंदे, जि.प सदस्य दीपक शिरसाठ, दिगंबर गीते, गोकुळ गीते, जगनआप्पा कुटे, चांदोरी सरपंच विनायक खरात, संदीप टरले, दत्तू पाटील डुकरे, बाळासाहेब जाधव, बाजार समिती संचालक सोपान खालकर, शिवाजी मोरे, भूषण शिंदे, शेतकरी संघटनेचे अर्जुन तात्या बोराडे, रामराव मोरे, भगवान बोराडे, मनसेचे संजय मोरे, नामदेव शिंदे, प्रभाकर रायते, तानाजी पुरकर, पुंडलिक ताजने, विलास मत्सागर, दिनकर मत्सागर, रामराव मोरे, विलास गडाख, सदाशिव खेलूकर ,दत्तू भुसारे, मोतीराम मोगल, माधव सुरवाडे, विश्वास भंडारे, अशोक भंडारे, अरुण डांगळे, नानासाहेब दाते, किरण सूरवाडे, अनंत साळे, केशव भंडारे, सचिन मोगल, सचिन वाघ, अशपाक शेख, सुरेश डांगळे, सुनील कदम, अशोक मत्सागर, किरण वाघ, नितीन निकम यांच्यासह सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

निफाड साखर कारखाना प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी करताना सभासद, कामगार व सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते.

निसाका संघर्ष सभेत मार्गदर्शन करताना माजी आमदार अनिल कदम समोर उपस्थित सभासद व कर्मचारी

निसाका व रासाका हे दोन्ही कारखाने निफाडचे वैभव होते. दरवेळी कारखान्याच्या प्रश्नावर सर्वांनी राजकारण केले. मात्र आता निसाकाची विक्री सत्तेच्या बळावर केली जात आहे. यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या जनआंदोलनामध्ये मी सदैव सहभागी राहील. मात्र निसाकाची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गिळंकृत करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावण्यात येतील. निसाका आणि रासाका बाबत मी यापूर्वीही प्रत्येक पातळीवर सभासद आणि कामगाराच्या हितासाठी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. निसाका वाचावा याकरिता मी कार्यकर्ता आणि सभासद म्हणून लढ्यात सदैव अग्रभागी राहील.

अनिल साहेबराव कदम (माजी आमदार निफाड)

आज निसाका वाचविण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकजूट झाल्याने जिल्हा बँकेने निसाका विक्रीचा घातलेला घाट आम्ही उधळून लावू. पुढील आठवड्यात निफाड प्रांत कार्यालयावर सर्वपक्षीय भव्य मोर्चा सभासद व कामगारांचा काढण्यात येणार आहे. यात रस्त्यावरच्या लढाईत राजकारण सोडून सर्वांनी सामील व्हावे.

खंडू बोडके पाटील निफाड शिवसेना तालुकाप्रमुख

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.