तमाशा टिकविण्यासाठी रसिकांनी वगनाट्यांची मागणी करून,वगनाट्य पाहिली पाहिजेत!! – कलासम्राट मुबारक बोरगावकर

तमाशा टिकविण्यासाठी रसिकांनी वगनाट्यांची मागणी करून,वगनाट्य पाहिली पाहिजेत!! – कलासम्राट मा. मुबारक बोरगावकर
विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर यांचे चिरंजीव कलासम्राट अभिनय सम्राट मा.मुबारक बोरगावकर यांची दिनांक २३/२/२०२५ रोजी गोपाळवाडी (ता.दौंड) येथे राजेंद्र मोरे यांनी मुलाखत घेतली. यात मुबारक बोरगावकर यांनी अनेक विषयांवर चर्चा केली.
आपल्या कला जीवनाचा प्रवास सांगा असे म्हटल्यावर मला मुबारकभाई बोरगावकर हे म्हणाले की,ते १९७६ पासून तमाशा कलेत कार्यरत आहेत.विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर सह वगसम्राट गणपत . व्ही .माने चिंचणीकर या तमाशाफडापासून काम करण्यास सुरूवात केलेली आहे.आज ५० वर्ष ते तमाशात काम करीत आहेत.
अनेक गाजलेल्या वगनाट्यात भूमिका मा.मुबारकभाईनी केलेल्या आहेत.असे पुढारी ठार करा, लग्नाआधी कुंकू पुसले, मानवत खून खटला,हि झुंज मुरारबाजींची,भिल्लांची टोळी, गवळ्याची रंभा, संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम ,आधी लगीन कोंढाण्याचे इत्यादी वगनाट्यात कामे केलेली आहेत.
तमाशासम्राट तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर मा. हरिभाऊ बडे नगरकर ,कुंदा पाटील पुणेकर,मा. रघुवीर खेडकर,अंजलीराजे नाशिककर, संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर व गुलाबराव बोरगावकर यांच्यासह अनेक दिग्गज कलावंतासोबत काम केलेले आहे.
मा.मुबारक बोरगावकर हे मुरब्बी , अभ्यासू कलावंत असून,वगनाट्यात अतिशय सफाईदारपणे काम करतात.वगनाट्यात काम करण्याचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. वगनाट्यावर प्रेम असणारे मा.मुबारकभाई ज्येष्ठ श्रेष्ठ,तमाशाकलावंत आहेत.तमाशा कलेवर त्यांचे मनापासून प्रेम आहे .
मा.मुबारकभाई यांचे कुटुंब हे तमाशा कलेसाठी सर्वस्व अर्पण करणारे कुटुंब आहे.अतिशय मानाने बोरगावकर कुटुंबाकडे पाहिले जाते.तमाशा कला ही मा.मुबारकभाई यांच्या जगण्याचा श्वास आहे. तमाशा कलेशिवाय ते जगू शकत नाहीत. घरात ते बसू शकत नाहीत.
शासनाने आमच्यासारख्या जुन्या जाणत्या कलावंताच्या योगदानाची पुरस्कारकारासाठी दखल घ्यावी अशी मा.मुबारकभाई यांची अपेक्षा आहे.
मा .मुबारकभाई यांचा स्वभाव अतिशय गोड व निर्मळ आहे .त्यांचे देहबोलीतून तमाशाकला प्रकट होत असते. मा.मुबारकभाई बोरगावकर हे तमाशा कलेचा जिवंत इतिहास आहे.
कलासम्राट मा.मुबारक बोरगावकर व समाजमित्र पापाभाई बोरगावकर व त्यांचेसह त्यांचे सर्व कुटुंबीय मला अतिशय जवळचे व त्यांच्या कुटुंबातील समजतात. माझेही बोरगावकर कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. हे कुटुंब माझ्या हृदयात आहे.
सद्यस्थितीत कलाभूषन मा.रघुवीर खेडकर सह तमाशासाम्राज्ञी कांताबाई सातारकर या तमाशाफडात कार्यरत असलेले मा .मुबारक भाई यांना
आजच्या तमाशाबद्दल विचारले असता मा.मुबारकभाई म्हणाले मनोरंजन करा पण तमाशा फडांमध्ये वगनाट्ये दाखविली पाहिजे.तमाशा रसिकांनी वगनाट्याची मागणी केली पाहिजे.रसिकांनी जुनी ,नविन वगनाट्ये पाहिली पाहिजेत. वगनाट्यातून प्रबोधन होत असते.समाज घडत असतो. तमाशा कलावंतांचे पहिले कर्तव्य आहे की त्यांनी तमाशाकलेतून समाज घडवला पाहिजे. तरच शासन व समाज दखल घेईल.
मा.मुबारकभाई पुढे म्हणाले की, तमाशा कलेत अनेक दिग्गज कलावंत होऊन गेलेत.वगनाट्यात अभिनय सम्राट माधवराव गायकवाड हे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका अप्रतिम करीत होते . रसिकांच्या डोळ्याचे पारणे फिटत.
पूर्वीच्या रसिकांना तमाशा कळत होता,वगनाट्ये मनापासून पहात.
आज रसिकांची आवड बदलली असली तरी ,आजच्या तमाशाफडांनी तमाशातले जुने वैभव दाखवावे.
तमाशाची परंपरा काय आहे? ते रसिकांनी जाणून घेतले पाहिजे.रसिकांना तमाशा माहीत नसेल तर रसिक तमाशा बघणार नाहीत.शेवटी मा.मुबारकभाई बोरगावकर म्हणाले जोपर्यंत श्वास आहे , तोपर्यंत तमाशा कलेवरचे प्रेम कमी होणार नाही. मा. मुबारकभाई म्हणाले आजही भूतकाळाच्या आठवणीत मन रमते डोळ्यासमोर असंख्य दिग्गज स्त्री पुरुष तमाशा कलावंतांच्या कला उभ्या राहतात. अभिमानाने छाती व
मन आनंदाने भरून,फुलून येते. तमाशा कलेतून रसिकांची सेवा केल्यामुळे आजही त्यांचे जीवन धन्य झालेले आहे.
राजेंद्र .डी .मोरे
कलारसिक