जिल्हा बँकेच्या जमीन लिलाव स्थगितीसाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांचे साकडे!!
खंडू बोडके-पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा!!

जिल्हा बँकेच्या जमीन लिलाव स्थगितीसाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांचे साकडे!!
खंडू बोडके-पाटील यांच्यासह शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा!!
निफाड (वार्ताहर) :- निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचा लिलाव व जप्ती प्रक्रिया जिल्हा बँकेने सुरू केली आहे. या लिलाव प्रक्रियेला तत्काळ स्थगिती द्यावी यासाठी शेतकऱ्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना साकडे घातले आहे. शासनाच्या राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शिष्टमंडळाने आज म्हाळसाकोरे येथे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेवून व्यथा मांडल्या. निफाड तालुक्यातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटामुळे कर्जबाजारी झाले असून जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहे. शासनाने जिल्हा बँकेला विशेष पॅकेज देवून राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे शेतकऱ्यांना एकरकमी परतफेडीसाठी सवलत द्यावी अशी मागणी यावेळी खंडू बोडके पाटील यांनी कृषीमंत्री कोकाटे यांचेकडे केली.
जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीबाबत आपण लवकरच सहकारमंत्री यांच्याकडे मंत्रालयात बैठक घेणार असून जप्ती व लिलाव प्रक्रियेला स्थगती देण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शिष्टमंडळाला दिले. गोदाकाठवासियांच्यावतीने खंडू बोडके पाटील यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सत्कार केला. त्यांचे स्विय सहायक शिवाभाऊ वाणी यांचाही वाढदिवसानिमित्त यावेळी सत्कार करण्यात आला. म्हाळसाकोरे ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतीषबाजीत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे स्वागत करत सत्कार केला. करंजगाव शेतकरी शिष्टमंडळाने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना शेतकऱ्यांच्या दुरावस्थेची कल्पना देत जिल्हा बँकेची लिलाव प्रक्रिया स्थगित न केल्यास सरकारने आम्हाला सामूहिक आत्मदहनाची परवानगी द्यावी, अशी विनंती केली.
जिल्हा बँकेच्या बड्या थकबाकीदारावर कारवाई करण्याची मागणी करत खंडू बोडके पाटील यांनी जनआंदोलन छेडन्याचा इशारा यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दिला. शिष्टमंडळात करंजगावचे शेतकरी बाळकृष्ण राजोळे, भीमराज भगुरे, कैलास राजोळे, संपत राजोळे, रवी पाटील राजोळे, सूरज पाटील राजोळे, गोपाळ राजोळे यांच्यासह म्हाळसाकोरेचे शिवनाथ बाजारे, तुळशीराम बाजारे, गणेश शिंदे, चेतन मुरकुटे, संतोष ढोबळे, गणेश शिंदे, निलेश पानगव्हाणे, ऋषिकेश पडोळ, समीर शेख, गौरव ढोबळे, निवृत्ती मुरकुटे, भाऊसाहेब बाजारे, सौरभ आगळे, निलेश खोलमकर, कृष्णा मुरकुटे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्हा बँकेची जप्ती व लिलाव प्रकिया स्थगित करावी या मागणीचे निवेदन देताना राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके पाटील समवेत करंजगाव व म्हाळसाकोरे येथील शेतकरी शिष्टमंडळ.!
संवेदनशिल कृषीमंत्री…
जिल्हा बँकेच्या जप्ती प्रक्रिया स्थगितीबाबत शेतकरी शिष्टमंडळाला भेट घेण्यासाठी राज्य बियाणे उपसमितीचे सदस्य खंडू बोडके पाटील यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दुरध्वनी केला असता शेतकऱ्यांना सिन्नरला घेवून येण्यापेक्षा मी नंदूरबारला कार्यक्रमासाठी जाणार असल्याने म्हाळसाकोरे येथे तुमची भेट घेतो असे सांगितले. व लागलीच म्हाळसाकोरे येथे म्हाळसामाता मंदिरासमोर रस्त्यावरच शेतकरी शिष्टमंडळाची कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भेट घेवून त्यांच्या व्यथा जाणून घेत सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांप्रती संवेदनशिल मनाचा कृषीमंत्री राज्याला लाभला असल्याचे गौरवोद्गार उपस्थित शेतकऱ्यांनी काढले.