लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथील शिवसंकुलात रंगला शिवमल्हार २०२५ चा दिमाखदार उद्घाटन सोहळा!!

लांडेवाडी (ता.आंबेगाव) येथील शिवसंकुलात रंगला शिवमल्हार २०२५ चा दिमाखदार उद्घाटन सोहळा!!
श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडी या शिक्षण संस्थेच्या प्रेक्षागृहामध्ये शिवमल्हार २०२५ चा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर-हवेली विधानसभेचे आमदार पै.ज्ञानेश्वर उर्फ माऊली(आबा) कटके, डायनलॉग इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अक्षय आढळराव पाटील यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असलेली सुप्रसिद्ध मराठी गायिका अंशिका चोनकर हिने आपल्या तडफदार आवाजाने मराठमोळ्या गाण्यांवर रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी येथील शिक्षकवृंद मोठी मेहनत घेत आहेत. प्रत्येक वर्षी या शिक्षण संकुलामध्ये काही ना काही विद्यार्थ्यांना नवीन देता येईल या संकल्पनेतून इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचा आपल्या संस्थेचा मानस पूर्ण करीत आलो आहे. याच दृष्टिकोनातून इयत्ता नववी व दहावी करिता स्वतंत्र इमारत संस्थेने यंदाच्या वर्षी उभारली आहे.
सर्व शिक्षकांसमवेत मीटिंग घेऊन विद्यार्थी संख्या वाढविण्यापेक्षा दर्जेदार व अत्याधुनिक शिक्षण पध्दतीचा अवलंब करून विद्यार्थी घडवावेत अशी अपेक्षा माझ्या शिक्षकांकडून व्यक्त केली. माझी नातवंडे मुंबईत इंटरनॅशनल शाळेत शिक्षण घेतात. तेथील शिक्षण पद्धती व इतर सोयी सुविधांची मी माहिती घेत असतो. तिथल्या शिक्षणातल्या काही चांगल्या गोष्टी आपल्या शाळेत सुरू करण्यासाठी मी व्यक्तिशः लक्ष देऊन धडपड करत असतो. यामागे संस्कारक्षम विद्यार्थ्यांची आत्मविश्वासाने पाऊल टाकणारी कार्यकुशल पिढी घडविणे हाच माझा एकमेव उद्देश असतो असे प्रतिपादन पुणे म्हाडाचे अध्यक्ष(राज्यमंत्री दर्जा) मा.खा.शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील यांनी केले.तसेच या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी शाळेचे विद्यार्थी तसेच डेक्कन मराठा ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी यांनी विविध बहारदार गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करून सर्वांची मने जिंकली. चालू शैक्षणिक वर्षांमध्ये विविध क्षेत्रात पुण्यपूर्ण कामगिरी करणारे विद्यार्थ्यांचा विविध बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.