सुभाष (नेते) धामणीचे अस्सल लोकनेते!! 61 पूर्ती, आनंदू दे आनंद…
सुभाष (नेते) धामणीचे अस्सल लोकनेते!!
61 पूर्ती, आनंदू दे आनंद…
एखादी पदवी किंवा नाव समस्त समुदाय जेव्हा स्वयंस्फूर्तीने जाहीर करतो तेव्हा ती व्यक्ती खऱ्या अर्थाने लोकनेता असते. सुभाष गुलाबराव जाधव पाटील हे त्यामधील धामणी गावातील एकमेव नाव. ज्यांना आपण सुभाषनेते म्हणून पुकारतो. ‘सुभाषनेते’ हे नाव फक्त धामणीगावापुरतेच नाही तर, संपूर्ण आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक पुढारी मंडळींच्या सभापती, आमदार ,खासदार यांच्या तोंडी देखील कोरले गेले आहे.
धामणी गावातील आबाल वृद्ध, पोरीबाळी, तरुण, युवती असो की शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी सरकारी अधिकारी असो की कर्मचारी, सुभाषनेते ही ओळख हे नाते प्रत्येकाच्या हृदयात जुळले आहे. यामागे उघड गुपित आहे.
गावपुढारी अनेक असतात, परंतु नेतेपण कसं असावं हे शालेय जीवनापासून अंगे कारले नवे तर नेते पण हे मिळवण्यासाठी नाही, तर काम करण्यासाठी असते याचा पायंडा धामणी गावामध्ये सुभाष यांनी घालून दिला. म्हणून ते पुढे सुभाषनेते झाले. कट्टर शिवसैनिक कट्टर भाजप कार्यकर्ता म्हणून सुभाष नेते यांची राजकीय वाटचाल असली तरी प्रत्यक्षात राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन त्यांचे कार्य अखंडपणे सुरू आहे. अयोध्यातील श्रीराम जन्मभूमी न्यास आयोजित केलेल्या कारसेवेमध्ये पुढाकार घेणारे, भाजपाच्या 1995 मधील मुंबईतील रेसकोर्स वर झालेल्या अश्वमेघ या ऐतिहासिक राष्ट्रीय अधिवेशनातील प्रतिनिधी. 1996 मध्ये धामणी ग्रामपंचायतवर ऐतिहासिक भगवा फडकवणारे झुंजार कार्यकर्ते. यात्रा कमिटी, ग्रामपंचायत मध्ये सत्तास्थान असताना पदाधिकाऱ्यांवर अंकुश ठेवणारे, प्रसंगी आंदोलनाचे अस्र बाहेर करणारे सुभाष नेते हे जुन्या पिढीला माहित आहे.
धामणी गावातील टेलिफोन सुविधा बंद पडली. अधिकारी दुर्लक्ष करत होते.अशावेळी सुभाष नेते यांनी धामणी ग्रामपंचाय समोर अमरण उपोषण सुरू केले. काही विरोधकांनी त्यांच्या उपोषणाचे टिंगल करण्याचा प्रयत्न केला. परंतु जिद्दी आणि निर्णयाच्या बाबतीत कणखर असलेले सुभाषनेते यांनी उपोषण चालू ठेवले. दूरसंचार खाते हादरले अधिकाऱ्यांची पळापळ झाली. पोलीस दाखल झाले. अखेर पुण्यावरून भारत संचार निगमचे अधिकारी गावात आले.
अवघ्या काही तासात टेलिफोन सेवा दुरुस्त झाली. परंतु ती अगदी मोबाईल येईपर्यंत सुरू होती. एखाद्या खेडेगावामध्ये उपोषणाला बसून टेलिफोनच्या विरोधात आंदोलन करणारे आंबेगाव तालुक्यातील पहिले कार्यकर्ते म्हणून सुभाष नेते यांची नोंद झाली आहे.आपले धामणी गाव म्हणजे दुष्काळ, पाणीटंचाई ,टँकर ग्रस्त गाव अशी ओळख केवळ आंबेगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात झाली होती. अशावेळी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम गावात सुरू करण्याचा निर्णय झाला. सुभाष नेते यांनी पुढाकार घेत पाणलोट समितीच्या सचिवपद हाती घेतले. त्यानंतर तालुक्यातील कृषी खाते असो, की तहसीलदार कार्यालय प्रांताधिकारी असो, की लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी. प्रत्येक बंधाऱ्याचा प्रस्ताव आणि ग्रामपंचायतीचा ठराव देऊन सिमेंट बंधारे, सीसीटी, कंट्रो बंडिंग वनीकरण सारखे प्रयोग राबवले, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देखील पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमाची दखल घेतली. एवढेच नव्हे तर अनेकांनी आपल्या लग्नाच्या लग्न पत्रिकेवर देखील बंधाऱ्याचे फोटो टाकले. सुभाष नेते यांनी जलसंधारणामध्ये ठसा उमटवला. धामणी गावातील भूजल पातळी वाढवण्यात मोलाचे योगदान दिले. संपूर्ण गाव आणि युवकांची त्यांना साथ मिळाली. चरितार्थासाठी अनेक व्यवसाय केले, सगळेच यशस्वी झाले असे नाही परंतु नवीन व्यवसाय सुरू करून ते इतरांना मार्गदर्शक कसे ठरतील यासाठी सुभाष नेते झटले. मग ते मोटार रिवायडींग दुकान असो, की अगदी कालपर्यंतचा दुग्ध व्यवसाय, प्रत्येक व्यवसायावर सुभाष नेते यांनी आपली छाप उमटवली. पत्र प्रपंच हा सुभाषनेते यांचा मोठा ठेवा.
नेता होण्यासाठी खूप पैसा आणि श्रीमंती लागते असं नाही. हेतू शुद्ध असे आणि आपल्याला नेमके काय साध्य करायचे याबद्दल स्पष्टता असेल तर पैसे नसतानाही दिव्य कामे उभे राहतात.अनेक मित्र जमवले, गावातच नाही तर आंबेगाव तालुक्यातील मित्रमंडळीचा सुभाष नेते यांचा संग्रह मोठा आहे. उपक्रम आणि कार्यक्रम घेऊन समाजापुढे चांगला आदर्श ठेवण्यामध्ये त्यांनी मोठा कार्यकाल दिला. 30- 40 वर्षाची मैत्री आजही जपली. ही सुभाष नेत्यांची खरी संपत्ती आहे. म्हणून धामणीचे लोकनेते हे बीरुद सुभाष नेते यांच्यावर कोरले गेले आहे.
शिवतीर्थ पतसंस्था,सॅटर्डे क्लब, धामणी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक. अनेक संस्था संघटना गावातील समित्यांवर काम केले. धामणी गावाच्या जडणघडणीत आणि विकास कामांच्या उभारणीमध्ये सुभाष नेते यांचा मोलाचा वाटा आहे. कणखर भूमिका, आपल्या मतांवर आणि मुद्द्यांवर ठाम राहून देखील सुभाष नेते हे आजही सर्वांचे आजादशत्रू आहेत.याचा आनंद अधिक होतो.
आनंदू दे आनंद असा हा आजचा दिवस आहे. 2024 ला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करत असताना सुभाष नेते आज 61 मध्ये पदार्पण करत आहेत. त्यांचा भव्य सोहळा आपण स्वतंत्रपणे साजरा करू. परंतु आजच्या दिवसाचे औचित्य आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा या त्यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि भरभराटीचे तसेच मित्रांच्या प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत राहो.. ही मनोकामना..
आपल्या सुभाष नेत्यांचा सहृदयी…
विठ्ठल जाधव ,पत्रकार
९९२३०५९२९२