धामणी (ता.आंबेगाव) गावचे वैभव – जयहिंद वाचनालय धामणी
धामणी (ता.आंबेगाव) गावचे वैभव – जयहिंद वाचनालय धामणी
————————————————————-
दि. १५ऑगस्ट १९४७ साली आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. त्या दिवशी संपूर्ण देश मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंदोत्सव साजरा करत होता, त्यांच स्वातंत्र्याच्या आनंदाचे औचित्य साधून आमच्या धामणी गावाने जयहिंद वाचनालयाची स्थापना करून गावात बौद्धिक स्वातंत्र्याची मुहूर्तमेड रोवली. त्या दिवशी अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरे करणारे आमचे धामणी हे देशातील एकमेव गाव असेल. या एका घटनेमुळे एक गोष्ट लक्षात येते की,बौद्धिक ज्ञानाचे महत्त्व आणि “वाचाल तर वाचाल!” या वाक्याचा अर्थ आमच्या गावातील त्या काळच्या पिढीला पारतंत्र्यात असताना कळला होता.
ज्या ठिकाणी राजकारणाचा उपयोग समाजकारण आणि समाजहितासाठी केला जातो तो गाव नेहमी प्रगती पथावर असतो. स्वातंत्र्य पुर्व काळानंतर त्यावळेचा गावाचा कारभार पाहाणारे कै. बाबुराव पाटील दादा, कै. जयंवत पाटील भाऊ, कै. भालचंद्र वामन बेरी गुरुजी हया त्रिमूर्तीनी आणि गावातील त्यांच्या सहकारी मित्रांनी, गावकऱ्यांनी, गावाचे, गावातील तरूणांचे भविष्यातील हित बघून गावामध्ये वाचनालय, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेची मुलांची, मुलीची प्राथमिक शाळा, रयत शिक्षण संस्थेची हायस्कूल शाळा, समाजकल्याणचे मुलांचे वसतीगृह, सरकारी दवाखाना, सरकारी गुरांचा दवाखाना, सरकारी बँक , पोस्ट ऑफिस, रेशनिंग दुकान, दूध डेअरी, सार्वजनिक पाणीपुरवठा, लाईट, दळणवळणासाठी एस.टी.बस. एका गावाचा विकास होण्यासाठी, गाव सुशिक्षित, स्वावलंबी होणासाठी लागणाऱ्या हया इतभुंत सुविधा विशेष प्रयत्न करून गावात आणल्या. वैशिष्ट्य म्हणजे या सर्व गोष्टी सन१९७५पूर्वी आमच्या धामणी गावामध्ये होत्या. यावरून एक गोष्ट स्पष्ट जाणवते की आमचा गाव आचार, विचार आणि कृतीने इतर गावांच्या तुलनेत दहा वर्षे पुढे होता. खऱ्याअर्थाने गावच्या प्रगतीची सुरवात दि.१५ऑगस्ट१९४७ साली स्थापन झालेल्या जयहिंद वाचनालयाच्या उभारणी पासून झाली. संपूर्ण गावालाच वाचनाची, ज्ञानाची आवड निर्माण झाली, त्यामुळे प्राथमिक गरजा पूर्ण करणाऱ्या संस्थाचे महत्त्व गावाला कळले. यांचीच परिणीती म्हणून सन१९६२साली शासनाने आमच्या धामणी गावाला आदर्श गाव पुरस्काराने सन्मानित केले.
स्वातंत्र्यापूर्वी धामणीतील बराच तरूण वर्ग उपजीविकेसाठी मुंबईत चाकरमानी होता. स्वत: बेरी गुरूजी त्या काळात मुंबई मध्ये शिक्षक होते. पारतंत्र्यात महात्मा गांधीनी खऱ्या भारताचे दर्शन खेड्यात होत असल्याने ‘खेड्याकडे चला’ अशी हाक दिली होती. ज्यात गावखेडयाचे सक्षमीकरण हा महत्त्वपूर्ण हेतू होता. भारताला स्वातंत्र्य मिळण्याची चिन्हे दिसू लागताच धामणीतील, मुंबई मधील त्या तरूणांनी धामणी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई मध्ये धामणी ग्राम शिक्षण आणि आरोग्य प्रसारक मंडळाची स्थापना केली. पुढे भारतीय स्वातंत्र्याचा दिवस ठरला. तेव्हा त्या मंडळाने तो दिवस धामणी मध्ये वाचनालयाची स्थापना करून साजरा करायचे ठरवले. जयहिंद वाचनालयाची स्थापना दि.१५ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्रदिनी, सध्या जिथे पोस्ट ऑफिस आहे त्या ठिकाणी झाली. कै. बेरी गुरूजी यांनी आपल्या मालकीची असलेली ती जागा विनामूल्य वाचनालयाला दिली. सुरवातीला वाचनालयासाठी लागणारी बरीचशी पुस्तके त्यांनी मुंबईतील त्यांच्या ओळखीतून देणगी म्हणून मिळवली. त्यावेळी व्यवस्थापक म्हणून कै. रामभाऊ बाळाजी आळेकर आणि कार्यवाहक म्हणून स्वतः बेरी गुरूजी, वाचनालयाची जबाबदारी पार पाडत होते.
आळेकरांनी आपला मुबंई मधील चांगला तेजीत चालणाऱ्या व्यवसायाला तिलांजली देऊन गावाच्या सेवेसाठी धामणीतील वाचनालयाची सेवा स्वीकारली. आळेकर हे स्वतः सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत होते म्हणूनचं सुभाष बाबूचा स्वातंत्र्यासाठी असलेला “जयहिंद” हा नारा वाचनालयाच्या नामकरणासाठी दिला गेला. हळूहळू पुस्तके आणि वाचकही वाढले, जुनी जागा लहान पडू लागली तेंव्हा ग्रामपंचायतीच्या वतीने सध्याची धामणी गावचे वैभव असणारी सुसज्ज नवीन वास्तू बाजारपेठेत बरोबर गावांच्या मध्यभागी बांधण्यात आली. या नवीन वास्तूचे उद्घाटन दि.२९जानेवारी १९६० रोजी तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या शुभहस्ते व कै गंगाधर बोऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी वाचनालयाचे कै. हरी तात्याजी भुते हे उपाध्यक्ष व कै. रामभाऊ बाळाजी आळेकर सेक्रेटरी होते. कै. केशवराव जेधे (खासदार ) , कै. अण्णासाहेब आवटे (आमदार ) , कै. बाबुराव जाधव पाटील दादा, कै. जयवंतराव जाधव पाटील भाऊ, कै. भालचंद्र वामन बेरी गुरुजी आणि सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते. सन१९६० साली जयहिंद वाचनालय नवीन प्रशस्त जागेत आले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आमच्या जयहिंद वाचनालयाचे उद्घाटन झाले त्यांना स्वतःला सुध्दा वाचनाचा छंद होता. पुढे चालून त्यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय’ ही संकल्पना मांडली. महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन त्यांनी १९६७ साली ‘महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम’ हा कायदा विधिमंडळात अमलात आणला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालयाना ग्रंथालय संचालनालयामार्फत अनुदान देण्यात येते. शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत. आमचे जयहिंद वाचनालय हे सुद्धा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असून त्याला ७७वर्ष पुर्ण झाली आहेत. तसेच त्यास शासनाचा ‘अ’ दर्जा प्राप्त आहे.
आमच्या गावचे जयहिंद वाचनालय हे आंबेगाव तालुक्यातील पहिले सार्वजनिक वाचनालय आहे. वाचनालयातील हजारो ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, मासिके, आत्मचरित्र असा अमूल्य ठेवा आमच्या धामणी गावचे वैभव आहे. आज आमच्या वाचनालयात ४०,००० हून अधिक पुस्तके आहेत, सर्व मासिके, दिवाळी अंक तसेच सर्व वर्तमान पत्रे नियमितपणे रोज येत आहेत. आज संपूर्ण धामणी गाव, आंबेगाव तालुका आणि तालुक्या बाहेरच्या वाचकांना आमच्या वाचनालयाचा उपयोग होतो. सन १९८६ साली महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श ग्रंथालय पुरस्कार देवून आमच्या धामणी गावचे वैभव असलेल्या जयहिंद वाचनालयाचा सन्मान केला आहे.
माझा जन्म सन.१९७६चा. त्याकाळात जयहिंद वाचनालयाला, वाचनालय कोणीच म्हणत नव्हते गावातील सर्वजण लायब्ररी म्हणायचे. आम्हाला लायब्ररी म्हणजे काय हे कळायचे! मात्र वाचनालय म्हणजे काय? हे मात्र कळत नव्हते. लायब्ररीचा आणि आमचा सर्वात पहिल्यांदा संबंध आला तो मराठी शाळेत असताना. आमची जीवन शिक्षण मंदिर मराठी शाळा पहिली ते चौथी पर्यंत. शाळेत रोज प्रार्थना झाल्यावर वर्तमान पत्रातून लिहून आणलेल्या बातम्या वाचून दाखवायचा कार्यक्रम असायचा. मोठ्या वर्गातील मुले वर्तमान पत्रातून लिहून आणलेल्या ठळक बातम्या मोठ्या आवाजात आज, दिनांक, शके, एकोणीसशे असे म्हणून वाचून दाखवत. त्यावेळी बातमी ऐकण्यापेक्षा बातमी सांगण्यासाठी मुलांची जास्त झुंबड असायची. जी मुले बातम्या लिहून आणून सांगायची, ती मुले खूप हुशार वाटायची. पुढे चालून दुसरी नंतर मलाही वाचायला यायला लागले आणि आपणही शाळेत बातम्या सांगावे असे वाटू लागले. त्यासाठी आम्हीही प्रयत्न केले. पेपर घेऊन येणारी राजगुरुनगर, शिरूर एस.टी. बस बरोबर पाऊणे नऊ वाजता वरच्या वेशीच्या स्टॅण्डवर यायची.
त्यामुळे पेपर घेऊन येणारी गाडी कधी येते! याकडे आम्हा वर्गमित्राचे लक्ष असायचे. गाडी आली की पेपरचा गठ्ठा हातात घेतलेले आळेकर बाबा दिसले की आम्ही खूष व्हायचो. एक वही आणि पेन्सिल हातात घेऊन बातम्या लिहिण्याच्या तयारीत आम्हीही त्यांच्या मागे येत असत. त्यावेळी आळेकर बाबांचा एक नियम होता जो पर्यंत पेपरवर लायब्ररीचे शिक्के मारत नाहीत तो पर्यंत ते कुणालाही पेपर देत नसत. त्यावेळी वर्तमानपत्रे मात्र मोजकीच होती आणि पेपर वाचणाराची संख्या मोठी होती. तसेच बरीच मंडळीही पेपर वाचण्यासाठी थांबलेली असत. तेव्हा मोठ्यांनाच पेपर पुरत नसे, त्यामुळे आमच्या सारख्या छोट्यांनी लगेच पेपरला हात लावणे तसं अवघडच! मग पेपरच्या पानांचे वाटप होई. ज्याने पान घेतलेले असेल त्याच्यामागून डोकावत, घूसत आपली बातमी शोधावी लागे. मग ती वहीत लिहिण्याची कसरत करायची. त्याच दरम्यान त्या वाचकांकडून पान पलटले जाई किंवा त्याची दुसरी कडे देवाणघेवाणही होई. तरीही आम्ही आमची बातमी लिहिण्याची हौस पूर्ण करुन घेई. तेव्हा पासून आपली बातमी इतरांपेक्षा वेगळी असावी या नादात पेपर चाळायची गोडी लागली ती आतापर्यंत.
लायब्ररीची व्यवस्था पाहाणारे कै. रामभाऊ बाळाजी आळेकर हे आमच्या आळीत राहात असल्याने आम्ही सर्व मुले त्यांना बाबा म्हणायचो. खादीचे धोतर, खादीचा पांढरा नेहरू, डोक्यावर गांधी टोपी, चष्मा असा त्यांचा पेहराव असायचा. त्यातल्या त्यात ते स्वातंत्र्य सैनिक असल्याने त्यांना सुभाषचंद्र बोस, त्यांची आझाद हिंद सेना, महात्मा गांधी, पंडित नेहरू तसेच स्वातंत्र्य सैनिक काळातील गोष्टी सांगायला खूप आवडायचे. ते कुठेही दिसले की आम्ही मुले त्यांना “जयहिंद” बाबा म्हणायचो आणि गोष्टी सांगण्याचा आग्रह धरायचो. तेही “जयहिंद” म्हणून तेवढ्याचं आनंदाने त्याला प्रतिसाद देयाचे आणि गोष्ट सांगायचे. पुढे पुढे आम्ही मुले त्यांना आळेकर बाबा म्हण्यापेक्षा लायब्ररीचे जयहिंद बाबा म्हणूनच ओळखायचो. त्यांची एक खासियत होती ते लायब्ररीत येणाऱ्या कुठल्याही लहान मुलाला अहो, जाहो घालून बोलायचे. त्यांचे ओ डोके! या! हे शब्द मी बऱ्याच वेळा ऐकलेत. त्यांच्या काळात मोठ्या अक्षरात लिहिलेली आणि चित्र असलेली चतुर बिरबल, लाकूड तोंडया, बासरीवाला ही पुस्तके वाचलेलं आजही स्मरणात आहे. यांच जयहिंद बाबांना आमच्या धामणी गावाने आपल्या भारतीय स्वातंत्र्याला जेव्हा पन्नास वर्षे पूर्ण झाली तेव्हा गावातील जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणून ग्रामपंचायतीच्या पारावर झेंडा फडकवण्याचा मान दिला होता. आळेकर बाबांच्या नंतर लायब्ररीची व्यवस्था त्यांचे चिरंजीव श्री. दिलीप आळेकर हे आजतागायत पाहात आहेत. आम्ही त्यांना आळेकर मामा म्हणायचो.
त्यावेळीची वाचनालयाची रचना आणि सध्याची रचना यात बराच फरक पडला आहे. आता वाचनालय बऱ्यापैकी बंदिस्त झाले आहे. वाचनालयाची इमारत ही मजबूत दगडी बांधकाम असलेली कौलारू इमारत. पुढे तीस फुट लांबीची ओसरी, खाली शहाबादी फरशी, ओसरीमध्ये दोन्ही बाजूला बसण्यासाठी कट्टे, ओसरीच्या बरोबर मध्यभागी वाचनालयालाचा मुख्य दरवाजा. त्याच्या एका बाजूला नोटीस बोर्ड, त्यावर रोज दिनविशेष किंवा अर्थपूर्ण सुविचार किंवा काही वेळा ग्रामस्थांसाठी सूचना, माहितीही लिहिलेली असायची. तर दुसऱ्या बाजूला एक पेपर ठेवण्यासाठी साठी कप्पे असलेली पेटी. पेपर वाचून झाल्यावर त्यात ठेवले जायचे. त्यांच्याच वरच्या बाजूला माजी मुख्यमंत्री मा.यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते वाचनालयालाचे उद्घाटन झालेली कौन्सिला.
जयहिंद वाचनालयात आत गेल्यावर, भिंतीवर संत ज्ञानेश्वर, भगवान विठ्ठल, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, माजी आमदार अण्णासाहेब आवटे, माजी खासदार केशवराव जेधे, बाबुराव जाधव पाटील दादा व जयवंतराव जाधव पाटील भाऊ यांचे फोटो. नंतरच्या काळात वाचनालयाचे कार्याध्यक्ष आणि वाचनालयासाठी भरीव योगदान देणारे. कै. गंगाधर बोऱ्हाडे, कै.भुत्ते अण्णा, कै.बेरी गुरुजी यांच्या फोटोफ्रेम लावल्या आहेत. ते पाहिल्यावर आपल्याला आपोआप वाचनालयाचा इतिहास आणि त्यांनी गाव सुधारण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे महत्त्व कळते.
आतमध्ये दोन भाग, एका भागात पुस्तकाची कपाटे व दुसऱ्या मोठ्या भागाच्या, निम्म्या भागात कथा, कांदबरी, ललित साहित्य, ऐतिहासिक, पौराणिक, चरित्र, धार्मिक, बालसाहित्य, राजकीय अशी नावे लिहिलेली पुस्तकांची लाकडी कपाटे. या कपाटातील तोंडे आतल्या बाजूला वळलेली. त्या कपाटाचा उपयोग पार्टिशन म्हणून केलेला. त्यांच्या शेजारी लायब्ररीची व्यवस्था पाहाणारे आळेकर बाबा याचा टेबल. पुढच्या भागात वाचकांसाठी खूप मोठे दोन टेबल आणि बाकडे. येथेचं एका बाजूला जुन्या मासिकाचे संच लाऊन ठेवलेले एक स्टॅण्ड. त्यात लोकराज्य, बळीराजा, संतकृपा, धनुर्धारी, किर्लोस्कर, स्री, मेनका, माहेर, मोहिनी, नवल, हंस, श्री व सौ, प्रसाद, साधना ही मासिके. पुढे चालून ती जागा लोकप्रभा, मार्मिक, चित्रलेखा, गृहशोभिका, इंडिया टुडे, साप्ताहिक सकाळ,
षटकार, मायापुरी, नोकरी संदर्भ या मासिकांनी घेतली. ज्या काळात आम्हाला वाचलेलं कळत नसायचे त्या काळात आम्ही प्रत्येक मासिक संचाची पाने उलटत फक्त चित्रे पाहायचो. वाचन म्हणजे नक्की काय हे समजण्या आधी चित्र बघण्यात पण वेगळीच मजा होती.
याठिकाणी बसून पुस्तके, मासिके, पेपर वाचण्यासाठी कुठलीही मेंबर्स शीप लागत नाही तुम्ही वाचनालयाच्या वेळेत कितीही वेळ बसू शकता तुम्हाला वेळेचे बंधन नाही. मात्र पुस्तके, मासिके वाचनासाठी घरी घेऊन जाण्यासाठी वाचनालयाची वार्षिक वर्गणी भरून सभासद होणे आवश्यक आहे. त्या काळात वार्षिक वर्गणी फक्त वीस रुपये होती. अमानत रक्कम नव्हती. आता वाचनालयाची सभासद फी शंभर रुपये आहे आणि अमानत रक्कम फक्त पाचशे रुपये आहे.
आम्ही मराठी शाळेत असताना शाळेच्या दरवाजा आणि खिडक्यांच्या तावदानावर बऱ्याच म्हणी आणि सुविचार लिहिलेले होते त्यापैकी एक होता “वाचाल तर वाचाल”! या वाक्याचा अर्थ आमच्या संपूर्ण शालेय जीवनात आम्हाला कधीच कळला नाही. आम्हाला वाटायचे आपण कशातून वाचल्यावर ! कशातून वाचू! तसेही आम्हाला वाटायचे की वाचनालयाची पुस्तके ही फक्त शिक्षकांच्या मुलांसाठी असतात. कारण ती हुशार असतात आणि त्यांच्याकडे पुस्तके वाचायला भरपूर वेळ असतो. दुसरे म्हणजे आमच्या लेखी आमची शाळेतलीचं पुस्तके वाचून होत नाही, तेव्हा आम्ही वाचनालयाची पुस्तके कधी वाचणार? पुस्तक वाचायला घेतले की आम्हाला कंटाळा येतो! झोप येते! आणि पुस्तक हातातून कधी पडले याचेही भान राहत नाही. तसाही बाराही महिने खेळ आमच्या पाटीला पुजलेला. सकाळ, संध्याकाळ मित्रमंडळी जमवून चिंचूके, गोटया, विटीदांडू, क्रिकेट तसेच त्यावेळी जो खेळ असेल तो नियमितपणे खेळणे हे आमचे नित्याचे होते. तरीही मी लायब्ररीचा एक, दोन वेळा सभासद झालो होतो त्या काळात फास्टर फेणे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सागरा प्राण तळमळला, आणि आनंद यादव यांची झोंबी संपूर्ण वाचलेली आठवते. पण त्यापेक्षा जास्त पुस्तके वाचण्याचा योग कधी आला नाही. मात्र दर महिन्याला क्रिकेटवर येणारे षटकार मासिक, किशोर आणि चांदोबा आवडीने वाचायचो. षटकार मासिकाचे संपादक संदीप पाटील आणि द्वारकानाथ संझगिरी होते. चांदोबा मासिकातील रुबाबदार विक्रम, त्याची टोकदार तलवार, तो मोठा वृक्ष, त्याच्या आजूबाजूला असलेल्या कवट्या, विक्रमाच्या पाठीवर बसलेला पांढरे शुभ्र केस मोकळे सोडलेला खतरनाक वेताळ आणि त्यातल्या बोध कथा. सगळं कसं वेगळ्या विश्वात घेऊन जाणारे होते.
टी.व्ही.वरचा क्रिकेट जेव्हा पासून आम्हाला कळायला लागला तेव्हा पासून वाचनालयाच्या वर्तमान पेपरांचे आम्ही नियमित वाचक झालो. त्यातही पेपरची शेवटची खेळाची पुरवणी आम्हाला खूप आवडायची. आमचं पहिल्या पानावरील राजकारणाच्या बातम्याकडे विशेष कधी लक्ष्य गेलं नाही. पुढे चालून हायस्कूल शाळेमध्ये गेल्यावर रोज सकाळी पेपर वाचूनच शाळेला जायचे हा आमचा नित्यक्रम झाला होता. बऱ्याच वेळा संध्याकाळी सुध्दा पेपर वाचण्यासाठी आम्ही लायब्ररी मध्ये जायचो.
त्याकाळात सकाळ, केसरी, तरूण भारत, लोकसत्ता, नवाकाळ, नवयुग, सामना,प्रभात हे पेपर होते. महाराष्ट्र टाइम्स आणि नवशक्ती हे पेपर दोन तीन दिवसांनी मुंबईहून पोस्टाने यायचे. पुढील काळात लोकमत, पुढारी, पुण्यनगरी हे नवीन पेपर आले. त्यातही परूळेकरांचा सकाळ आम्हाला विशेष आवडायचा कारण त्यात क्रिकेटच्या बातम्या सविस्तर प्रमाणात असायच्या. त्या क्रिकेटच्या बातम्यांनी एवढं वेड लावली की प्रमोद देखणे यांच्या किराणा दुकानात गेल्यावर तेथील रद्दीतील खेळाची पुरवणी काढून फक्त क्रिकेटच्या बातम्या वाचायचा छंद लागला. त्यांच्या परिणाम असा झाला की जगभरातील क्रिकेटर आणि त्यांचे रेकाॅर्ड आम्हाला कळायला लागले. त्या काळात वेस्ट इंडिजची टीम जबरदस्त फॉर्मात होती. डेस्मंड हेन्स, ग्रार्डन ग्रीनिज, व्हिव्हियन रिचर्ड्स, रिचर्ड रिचर्डसन, मायकेल व्होल्डींग, माल्कम मार्शल, अब्रोज, पॅट्रिक पॅटरसन, वाॅल्श असे एकापेक्षा एक वरचढ क्रिकेटर होते. त्यातही भारताच्या नरेंद्र हिरवानीने वेस्ट इंडीज विरूद्ध हॅट्ट्रिक सह घेतलेल्या सोळा विकेट्सची वर्ल्ड रेकॉर्ड बातमी आम्हाला विशेष आनंद देऊन गेली होती. न्यूज पेपरच्या त्या खेळाच्या पुरवणी ने आम्हाला क्रिकेट बरोबरच इतर खेळांची ही गोडी लावली. आम्हाला टेनिसचा विम्बल्डन, अमेरिकेन ओपन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन कळायला लागला. स्टिफन एडबर्ग, बोरीस बेकर, जॉन मॅकएन्रो, पीट सॅम्प्रास, आंद्रे आगामी, मार्टिना नवरातिलोवा, स्टेफी ग्राफ, गॅब्रिएला सबातिनी, मोनिका सेलेस यांचा खेळ समजायला लागला. फुटबॉलचा पेले, अर्जेन्टिनाचा दिएगो मॅराडोना कळला. फुटबॉलचा वर्ल्डकप, फ्रान्सचा झिदान, ब्राझीलचा रोनाल्डो, रोनाल्डीनो, इटलीचा रॉबर्ट बॅजियो आवडायला लागला. हॉकीचा परमजितसिंग, धनराज पिल्ले ओळखायला यायला लागला. मिल्खासिंग, पी.टी.उषा, शायरी विल्सन कळायला लागली. एशियन गेम्स, ऑलिंपिक गेम आवडायला लागल्या. पोलव्हॉटचा सर्जी बुक्का, अमेरिकेचा धावपटू जेसी ओवेन्स, कार्ल लुईस,फ्लॉरेन्स ग्रिफिथ-जॉयनर, मरियन जोन्स, मायकेल जॉन्सन. इंग्लंडचा लॅनफोर्ड ख्रिस्ती, इथोपियाचा हेले गेब्रसेलासी. एवढंच काय? बिलियर्ड्सचा माईक रसेल, गीत सेठीही आम्हाला कळायला लागला. पेपर मध्ये येणारा असा कुठल्याच खेळ नव्हता जो आम्हाला कळत नव्हता.जयहिंद वाचनालयाच्या वर्तमान पत्रातील खेळाच्या पुरवणीने आम्हाला प्रत्येक खेळाची गोडी लावली. नंतर आम्हाला पेपरामधील इतर पुरवण्याची ही भुरळ पडली. त्यात दिनविशेष, राशी भविष्य, व्यक्ती विशेष आमच्याकडून आवर्जून वाचलं जाई. तसेच सकाळचा चिंटू, नवशक्तीचा स्प्राडर मॅन, जेम्स बाँड कथा वाचण्यात ही वेगळी मजा होती. थोडं मोठ झाल्यावर प्रभात मध्ये येणाऱ्या चित्रपटाच्या पुरवणीनेही आमच्यावर मोह माया केली. कधीही पुणे शहर न पाहताही! पुण्यात कुठल्या थिएटरला कुठला पिक्चर लागला आहे हे लायब्ररीत बसून आम्हाला कळायचे. त्यात येणाऱ्या पिक्चर्सच्या फोटोंनी अमिताभ बच्चन बद्दल आम्हाला कायम विशेष ओढ राहिली. दर शुक्रवारी नवीन पिक्चर यायचा आणि त्यांची संपूर्ण स्टोरी बहुतेक सकाळ, केसरी पेपरमध्ये यायची. ती वाचून त्या चित्रपटात काय आहे? हे समजायचं, तसेच नवीन चित्रपट पाहायल्या सारख वाटायचं आणि तो चांगला आहे की नाही हे आमचं आम्हीच ठरवायचो. तसेच पुढे चालून पेपर मधील कोढी सोडवायचा नादही बऱ्यापैकी लागला. कधी कधी पेपर मधील खून, बलात्कार, चोऱ्या, दरोडा, अपघाताच्या बातम्या वाचून मन खिन्नही व्हायचं. त्या काळात जगाशी जोडणारी रेडिओ आणि टि.व्ही एवढी फक्त दोनच माध्यमं होती. त्यातही रेडिओवर सकाळी सातच्या बातम्या आणि टी.व्ही.वर संध्याकाळी साडेसातच्या बातम्या. मात्र हे खूप तुटपुंजे होते. मात्र बाहेरच्या जगाशी खऱ्याअर्थाने ओळख आम्हाला जयहिंद वाचनालय आणि जयहिंद वाचनालयातील वर्तमान पेपरांनी करून दिली. जयहिंद वाचनालयात मोफत पेपर वाचायला मिळायचे. पुढे चालून शालेय शिक्षणानंतर सन १९९४ला गाव सुटला त्यामुळे पेपर वाचायचा छंदही सुटला.
खूप अलिकडच्या काळात सन-२०१८च्या आसपास आमचा मित्र धामणीतील नवोदित कवी, लेखक श्री.देवानंद जाधव याने नबाबची सायकल, आंधळा तुकाराम, गंगुबाई, पुरी बाबा, बाबभाई पानवाला, नंदू दिवटे, आप्पा देखणे, दत्तू टेलर, रामदास सांऊन्ड , डॉ.विलास पिंगट असे किती तरी एका पेक्षा एक सुंदर धामणीची महती सांगणारे आणि वाचणाऱ्या प्रत्येकाला आपल्या भुतकाळात धामणीत घेऊन जाणारे लेख त्यांने लिहिले. ते आवडलेले लेख वाचता वाचता, वाचायचा छंद लागला. त्याच्या लेखावर आपणही आपले मनोगत व्यक्त करावे म्हणून थोडाफार लिखाणाचा नाद लागला. पुढे चालून धामणी शाळेतील कर्णेसरांवर आधारित केशवायनमः या पुस्तकाच्या निमित्ताने ते लिहिणाऱ्या विद्यार्थी ग्रुपशी संबंध आला आणि त्या ठिकाणी लिहिण्याचा आणि वाचनाचा नाद बहरला.
माझ्या मनात असलेली सर्व पुस्तके मी वाचली.
दया पवार यांची बलुतं, शरणकुमार लिंबाळे यांची अक्करमाशी, लक्ष्मण माने यांची उपरा, लक्ष्मण गायकवाड यांची उचल्या, डॉ. किशोर शांताबाई काळे यांची कोल्हाट्याच पोरं, भालचंद्र नेमाडे यांची कोसला, आनंद यादव यांची झोंबी, वीना गवाणकर यांची एक होता कार्व्हर, दादा कोंडके यांचे एकटा जीव सदाशिव, चित्रतपस्वी व्ही. शांताराम, व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी, अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा, वारणेचा वाघ, शरद तांदळे लिखित रावण, प्रा. लक्ष्मण वाळुंज यांची काहूर, श्री. स्वप्नील कोलते लिखित मुकद्दर – कथा औरंगजेबाची, श्री. बाळासाहेब माने लिखित “अद्वितीय सेनानी- सेनापती संताजी घोरपडे , चेतन भगत यांची हाफ गर्लफ्रेंड , man v/s wild चा बेयर ग्रिल्सच आत्मचरित्र चिखल, घाम, अश्रू , साने गुरुजीची श्यामची आई, डॉ. अब्दुल कलाम यांचे अग्निपंख आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे माझी जन्मठेप ही सर्व पुस्तके मी संग्रही करून वाचली आणि विशेष म्हणजे ही सर्व पुस्तके पुन्हा पुन्हा वाचूशी वाटतात. या पुस्तका बरोबरच ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गुरूचरित्र, नवनाथ कथासार हे आध्यात्मिक ग्रंथही वाचण्यात आले.
एक काळ असा होता की पुस्तक वाचायला घेतले की ते हातातून कधी गळून पडले हे कळत नव्हते. आज मात्र वाचनाची आवड चांगली आहे. कुठलेही पुस्तक घेतले आणि ते कितीही मोठे असले तरी दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस वाचायचे राहात नाही. विशेष म्हणजे वाचलेले सर्व लक्ष्यात ही राहाते.
श्री. भालचंद्र वामन बेरी गुरूजी हे त्यांच्या हयातीत आमच्या श्री.शिवाजी विद्यालय धामणी शाळेच्या शिक्षण कमिटीचे अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांचा शाळेशी खूप जवळचा संबंध होता. दर वर्षी आमच्या शाळेमध्ये बावीस सप्टेंबर कर्मवीर जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जायची. त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे, अध्यक्ष आणण्यासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष गुरूजींचा खूप मोठा सहभाग असायचा. बावीस सप्टेंबरच्या त्या कार्यक्रमात खूप मोठी मोठी माणसे, व्याख्याते म्हणून बोलवली जायची. नव्वदच्या दशकात माझ्या शालेय जीवनात त्या मंचकावर ऐकलेले प्राचार्य राम शेवाळकर, प्राचार्य श्री. शिवाजीराव भोसले, प्राचार्य शंकरराव खरात, प्रा. राम ताकवले हे व्याख्याते आजही आठवतात. त्याकाळात त्यांची भाषणं ऐकताना एवढी समज नव्हती. पण पुढे चालून हे सर्वच तत्वव्यक्ते नावाजलेल्या विद्यापीठाचे कुलगुरू तसेच प्रसिद्ध व्याख्याते म्हणून नावारूपाला आले. आज वाचना बरोबर ऐकण्याचीही गोडी आहे. आजच्या मोबाईल जमान्यात वरील प्रसिद्ध व्यक्तींची युट्यूबवर असणारी स्वामी विवेकानंद, स्वामी अरविंद, स्वामी दयानंद सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, कर्मवीर अण्णा, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी, महात्मा गांधी ही भाषणे मी ऐकली आहेत. दोन,अडीच तासांची ती भाषणे ऐकताना कुठेही कंटाळा येत नाही. हे सर्वच व्याख्याते वक्ता दशसहस्त्रेषू अशी ख्याती प्राप्त झालेले होते. नव्वदच्या दशकात वरील विचारवंतांना प्रत्यक्षपणे ऐकण्याचे भाग्य मला शालेय जीवनात लाभले. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की या नावाजलेल्या विचारवंतांना आमच्या शाळेत बोलवण्याची बेरी गुरूजींची दूरदृष्टी किती वैचारिक आणि महान होती यांची कल्पना येते. ऐकण्याच्या हया गोडी मुळे मला वरील विचारवंत बरोबरच नरहर कुरुंदकर, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे याचं प्रत्येकाचं स्वतःच एक वेगळेपण आहे, हे विचारवंत ही आवडायला लागले.
बेरी गुरूजीं म्हणजे जयहिंद वाचनालय आणि जयहिंद वाचनालय म्हणजेच बेरी गुरूजीं. ही गावात प्रत्येकाच्या लेखी सर्वमान्य अटळ कल्पना. आमच्या शाळेच्या कर्मवीर जयंतीच्या कार्यक्रमात जयहिंद वाचनालयाचाही सहभाग असायचा. सलग दोन वर्षे त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेऊन त्यांचे हस्तलिखित मासिक बनवले होते. तसेच त्यातील सर्वात उत्कृष्ट निंबधला आणि चित्राला वाचनालया तर्फे प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले होते. त्या हस्तलिखितात माझाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील निंबध आणि कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णांचे चित्र होते. कर्मवीर अण्णांच्या चित्रासाठी मलाही वाचनालयाचे रोख बक्षीस मिळाले होते.
सध्या मोबाईलच्या जमान्यात सर्वत्र बोंबाबोंब केली जाते की वाचन संस्कृती लयाला चालली आहे ! वाचक कमी झाले आहेत! वाचन कला बंद व्हायला आली आहे! विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात, फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर दि.१४ ते दि.२२ डिसेंबर२०२४ या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. फक्त नऊ दिवसांत या पुस्तक महोत्सवात २५ लाखांहून अधिक पुस्तकांची विक्री आणि ४० कोटी रुपयांहून अधिक पैशाची उलाढाल झाली. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की लोकांना आजही वाचायला आवडते! पण जे त्यांना हवे ते! सध्या वाचनालयाची संख्या बरीच आहे, मात्र ती फक्त शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी. त्या ठिकाणी मासिक वर्गणी आणि अमानत रक्कमही खूप आहे आणि विशेष म्हणजे वाचकांना हवी आहेत ती पुस्तके त्या ठिकाणी मिळत नाही. त्यामुळेच मला आमच्या जयहिंद वाचनालयाचा खूप अभिमान वाटतो की त्या ठिकाणी वार्षिक वर्गणी नाममात्र असूनही तुम्हाला हवी आहेत ती पुस्तके वर्षभर उपलब्ध असतात.
खरंतर आज आमच्याकडे जी काही शब्दांची श्रीमंती आहे? जे काही ज्ञान आहे? जनरल नॉलेज आहे? ते शाळेत वाचलेल्या पुस्तकांतील नसून! आम्ही जयहिंद वाचनालय धामणी येथे वाचलेल्या वर्तमान पत्रातील आहे. आमच्या धामणी गावचे वैभव असलेले जयहिंद वाचनालय या ज्ञानरूपी वृक्षाची वाटचाल शतकमहोत्सवाकडे चालू आहे.
हा ज्ञान वृक्ष खऱ्या अर्थाने जगवला तो कै.भालचंद्र वामन बेरी गुरुजी, कै. रामभाऊ आळेकर, त्यांचे सहकारी मित्र आणि गावकऱ्यांनी तसेच ती ज्ञान परंपरा पुढे चालवत असलेले सध्याचे ग्रामस्थ सर्वांना माझे शतशः प्रणाम!….. खरंतर आगामी युग हे स्पर्धेचे आहे आणि या स्पर्धेच्या युगात आपल्या धामणी गावचे वैभव असलेली ही संस्था टिकून राहाण्यासाठी, काळाबरोबर चालण्यासाठी, नवनवीन पुस्तके खरेदीसाठी आर्थिक मदतीची आणि सभासद संख्या वाढण्याची खूप गरज आहे. आपल्या वाचनालयाची सभासद वर्गणी नाममात्र असूनही त्यासाठी गावातून शहरांत गेलेल्या तरूणांनी आणि गावातील वेगवेगळ्या व्हॉट्स ॲप ग्रुपनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. मी आमच्या कर्णेसर स्मरणिका ग्रुपला नक्की आव्हान करेल की आपण सभासद वाढीसाठी आणि आर्थिक मदतीसाठी नक्की प्रयत्न करू शकतो……
धामणी (ता. आंबेगाव) गावचे वैभव – जयहिंद वाचनालय धामणी