धामणी(ता.आंबेगाव) येथे शनैश्वर जयंतीला खंडोबाची अष्टगंधउटी व फळ पूजा संपन्न!!

धामणी(ता.आंबेगाव) येथे शनैश्वर जयंतीला खंडोबाची अष्टगंधउटी व फळ पूजा संपन्न!!
धामणी (ता.आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरामध्ये गुरुवार (६ जून २०२४) रोजी भावुका अमावस्या अर्थातच शनैश्वर जयंतीला अष्टगंधउटी व फळ पूजा उत्सव करण्यात आला.
वैशाखी अमावस्येला हा अष्टगंधउटी व फळ उत्सव साजरा केला जातो.पहाटे सुवासिक अष्टगंधाच्या उटीने सजवलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यावर करण्यात आलेला सुवासिक अष्टगंधाचा लेप स्वयंभू सप्तशिवलिंगाच्या पाठीमागे असलेल्या म्हाळसाकांत खंडोबा,म्हाळसाई,बाणाईच्या सजवलेल्या विलोभनीय सर्वांग सुंदर मूर्ती,मोगर्याच्या सुंगधाने दरवळून गेलेला धामणीच्या कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिर परिसर!!!टाळ,मृदंगाचा गजर,कपाळभर अष्टगंध उटी व भंडारा लावून हरिनामाचा जयघोष करणारे वारकरी आणि आबालवृध्द भाविक महिलाचा सहभाग हे सारे भक्तिमय वातावरण वासंतिक अष्टगंधउटी व फळ पूजा सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने धामणी (ता.आंबेगाव)येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात भल्या पहाटेला दिसून आले.
चैत्र महिण्यात उन्हाचा दाह वाढू लागलेला असल्यामुळे तिव्र उन्हापासून देवाला शीतलता मिळावी यासाठी चैत्री पाडव्यापासून मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होईपर्यत चंदनउटी,अष्टगंधउटी,फळ पूजा घालण्याची परंपरा आहे.महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्राच्या ठिकाणच्या देवस्थान मंदिरामधून देवाच्या मूर्तीला चंदन उटी,अष्टगंधउटी,फळपूजा भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते.यंदाही उटीचंदनाचा व उटीच्या भजनाचा गुडीपाडव्यापासून प्रारंभ झालेला आहे.अष्टगंधउटी व फळ पुजा सोहळ्याच्या दिवशी धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात टाळमृदंगाच्या गजराने व हरी नामाच्या जयघोषाने मंदिर व परिसरात आनंदी वातावरण दिसून आले.
चैत्र शुध्द प्रतिपदा ते जेष्ठ शुध्द दशमी या कालावधीत चंदनउटी,अष्टगंधउटी व फळ पूजेचे कार्यक्रम ग्रामीण व शहरी भागात केले जातात.धामणी येथील खंडोबा देवस्थान मंदिरात भावुका अमावस्याच्या दिवशी पहाटे पाच वाजता जारकरवाडीच्या सरपंच प्रतिक्षा बढेकरव कल्पेश बढेकर,जारकरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य शामराव बढेकर व सारिका बढेकर,संतोष बढेकर व उज्वला बढेकर,सागर बढेकर व सोनाली बढेकर,वैभव बढेकर व अश्विनी बढेकर, या पाच जोडप्याच्या हस्ते सप्तशिवलिंगाला दुग्धाभिषेक त्यानंतर पंचामृताने रुद्राभिषेक वसंतपूजा करून अष्टगंधउटी व फळपूजा उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर महाआरती झाल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत,सुभाष तांबे,शांताराम भगत,पांडुरंग भगत,प्रभाकर भगत,धोंडीबा भगत,राहूल भगत,राजेश भगत,प्रमोद देखणे यांनी सप्तशिवलिंगावर अष्टगंधउटी घालण्यास सुरुवात केली.
सुवासिक अष्टगंधाचा लेप देत असताना मंदिराच्या सभामंडपात टाळमृदुंगाच्या भक्तिमय स्वरात उटीभजनाचा जयघोषाची सुरुवात होऊन या भजनात पंचपदी रुपाचा अभंग तसेच देवाच्या उटीचे अभंग भक्तिमय वातावरणात गायले जात होते.
उष्म्याची दाहकता कमी करण्यासाठी मंदिराच्या गाभार्यात व सभामंडपात मोगर्याचे हार तसेच झेंडूच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली होती.मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आलेली दिसून आली.मंदीराचे आवारात व सभोवताली पहाटेच्या सुमारास सडा— रांगोळी करुन आकर्षक रांगोळ्या काढल्याचे दिसून आले.
सप्तशिवलिंगाची षोडशोपचार पूजा करुन झाल्यानंतर पहाटेच्या चांदण्याच्या साक्षीने उटीभजन गायला सुरुवात झाली.या उटीभजनातून केलेल्या निर्मळ भक्तीला वासंतिक उटी म्हटले जाते असे जारकरवाडी येथील भजनी मंडळीनी सांगितले.
पहाटे मंदिरात सप्तशिवलिंगाचा अभिषेक पूजा झाल्यानंतर उपस्थित वारकरी सेवेकरी ग्रामस्थ व भाविकांच्या कपाळाला अष्टगंधउटी लावण्यात आली.भजनानंतर अल्पोपहार होऊन वासंतिक अष्टगंधउटी व फळ पुजा या भक्तीमय रसाळपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
अष्टगंधउटी,फळ पूजा व उटीभजनामुळे देवस्थान व परिसरातील वातावरण आपोआप आध्यात्मिक उर्जेने ढवळून निघाल्याचे दिसून आले.अष्टगंधाच्या उटीने उन्हाचा दाह आणि हरीनामाच्या भजनाने आत्मीक शीतलता निर्माण होण्यास मदत होते असे यावेळी सेवेकरी मंडळीनी सांगितले.
वैशाख महिण्यातील भावुका आमावस्याच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी महाळूंगे पडवळ,गावडेवाडी,अवसरी,खुर्द,तळेगाव,लोणी,खडकवाडी,संविदणे,कवठे,पाबळ येथील भाविक आलेले होते.
भावुक अमावस्येला अष्टगंधउटीची सार्थकता!!
गुरूवारी आलेली भावुका अमावस्या अर्थात शनैश्वर जयंती होती.माणसाच्या पत्रिकेतील गुरु आणि शनि हे ग्रह हे जणू एकमेकांशी जणू विचारविनिमय करुन माणसाला आहे त्या परिस्थितीत संभाळून नेण्याचा प्रयत्न करत असतात.शनि हे कर्म आहे आणि गुरु ही श्रध्दा आहे. त्यामुळेच या दोहोंचा मेळ घालत माणसाने जीवनात वाटचाल करावी असं या यंदाच्या भावुक अमावस्येचे गर्भित आहे.त्यामुळेच या भावुक अमावस्याच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व असल्यानेच या दिवशी धामणीच्या स्वयंभू सप्तशिवलिंगाला अष्टगंधऊटी व फळपूजा घालण्यात येते असे सेवेकरी मंडळीनी सांगितले.