तब्बल 24 वर्षांनी पुन्हा एकत्र आले शालेय जीवनातील वर्ग मित्र – मैत्रिणी!!
तब्बल 24 वर्षांनी पुन्हा एकत्र आले शालेय जीवनातील वर्ग मित्र - मैत्रिणी!!

तब्बल 24 वर्षांनी पुन्हा एकत्र आले शालेय जीवनातील वर्ग मित्र – मैत्रिणी!!
पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय निरगुडसर येथील दहावीच्या 1999 – 2000 सालच्या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न!!
आंबेगाव तालुक्यातील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय निरगुडसर येथील दहावीच्या 1999 – 2000 सालच्या बॅचचा स्नेह मेळावा मोरया गार्डन येथे उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वांनी आपली ओळख करून दिली. शाळेबद्दलच्या आपल्या आठवणी, आलेले गोड- कटू अनुभव, मोबाईल शिवाय अनुभवलेल जग आणि शाळा, शिक्षकांबद्दलची आपुलकी, शाळा आणि शालेय परिसराबद्दल असलेला जिव्हाळा, शाळेत संपन्न होणारे विविध कार्यक्रम त्यावेळी येणारी गंमत जंमत, हसत खेळत केलेला अभ्यास, कठीण प्रसंगात मिळालेली मित्रांची मैत्रिणींची सोबत असे अनेक प्रसंग या प्रसंगी सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.
आज आपण आपल्या आयुष्यात जे काही थोडेफार यश संपादित केले आहे याचे सर्व श्रेय आपल्या गुरुजनांचे आहे. त्यांनी आपल्यावर केलेले संस्कार, शिस्त,अभ्यासाबाबत असणारा काटेकोरपणा,समयसुचकता, वेळेचा सदुपयोग, जिद्द,चिकाटी,अपयशाला मागे सारून यशला गवसणी घालण्यासाठी करावी लागणारी कठोर मेहनत या गुरुजनांच्या संस्कारामुळेच आज आपण इथवर पोहोचलो असल्याचे मत उपस्थितांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी संगीत खुर्ची,गाण्यांच्या भेंड्या आदी कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून अखंड देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शाळेला सप्रेम भेट म्हणून देण्यात आली.
गोरगरीब विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न तसेच गरीब मुलांच्या शैक्षणिक कार्यपुढे नेण्यासाठी आर्थिक हातभार व शाळेच्या परिसरात वृक्षांची लागवड आदी संकल्प यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष थोरात ,शिल्पा लायगुडे,सुजाता टेमकर, मेघा थोरात यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन गणेश गवारी,परेश कटारिया,प्रसाद तापकिर, सागर तापकीर, महेंद्र गवारी यांनी केले. गणेश गवारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.