आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पौराणिक मंदिरे व धार्मिक वास्तूचे जतन करा,मंदिराचा पौराणिक महात्म्य व नैसर्गिक समतोल जपा-ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर

पौराणिक मंदिरे व धार्मिक वास्तूचे जतन करा,मंदिराचा पौराणिक महात्म्य व नैसर्गिक समतोल जपा-ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर

धामणी (ता.आंबेगाव) येथील पुरातन म्हाळसाकांत खंडोबा मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम लोकवर्गणीतून हाती घेऊन पौराणिक मंदिर संस्कृतीचे व धार्मिक वास्तूचे जतन करुन देवस्थानाचा व परिसराचा चेहरामोहरा बदलल्याने धामणीचे खंडोबा देवस्थान महाराष्ट्रात प्रेक्षणीय झाले असल्याचे गौरवोदगार सखाराम महाराज संस्थान अंमळनेरचे प्रमुख ह.भ.प. प्रसाद महाराज अंमळनेरकर यांनी काढले.

श्रीक्षेत्र आळंदीहून अमळनेरला जाताना अंमळनेरकर पायी दिंडी धामणी येथे गुरुवारी आलेली असताना त्यांनी येथील पुरातन म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात जाऊन कुलस्वामी खंडेरायाचे दर्शन घेतल्यानंतर खंडोबा मंदिराची व परिसराची व मंदिरात चालू असलेल्या जिर्णोध्दाराच्या कामाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले.

यावेळी लोकवर्गणीतून जिर्णोध्दार करण्यात आलेल्या देवमळ्यातील विहीरीवरील सोमवती ओट्याचे व पवित्र संगमावरील पुरातन महादेव मंदिराचे व सभामंडपाचे लोकार्पण व कोनशिलेचे अनावरण अमळनेरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

१३ नोव्हेबर १९९८ ला येथील पुरातन खंडोबा मंदिराच्या जिर्णोध्दाराचा शुभारंभ अमळनेरकर महाराज यांच्याच हस्ते झालेला होता. मंदिरातील दर्शन बारी,जागरण देवकार्य सभामंडप,शिखराचे नूतनीकरण,रंगभरणी,हेगडे प्रधान,गायवासरु,हत्ती,सिंह,घोडे,वाघ ची ,द्बारपालाची संगमरवरी आकर्षक शिल्पे,मंगलकार्यासाठी बांधण्यात आलेला कुलस्वामी हाॅल इत्यादी कामे करुन मंदिर व परीसर प्रेक्षणीय झाला असून यापुढे विकासाची कामे करताना मंदिर परिसरात सिमेंटची जंगले होऊन देऊ नका,मंदिराचा पौराणिक महात्म्य व नैसर्गिक समतोल जपा असे त्यांनी यावेळी सांगितले.

खंडोबा मंदिरात सोमवतीला दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी सुरु करण्यात आलेल्या महाप्रसादाचा (अन्नदान)सुंदर उपक्रम देवस्थान राबवत असून या छोट्या रोपट्याचा लवकरच वटवृक्ष होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.येथे दर्शनासाठी व महाप्रसादासाठी भाविकांची संख्या वाढत असून सवंग प्रसिध्दीचा मोह टाळून अन्नदानाच्या महायज्ञात सर्वानी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आध्यात्मिक वारकरी सांप्रदाय हा परोपकारी पंथ असून झोपी गेलेल्यांना साधूसंत जागे करण्याचे काम करत आहेत. माणसे संसारात चिंता करतात, त्यांनी चिंता न करता कुलदैवताचे नामस्मरण करत राहावे सुखसमाधान आपोआप मिळेल असे त्यांनी सांगितले.यावेळी ह.भ. प. प्रसाद अंमळनेरकर यांचा पुरातन खंडोबा मंदिरात ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी धामणीच्या लोकनियुक्त सरपंच सौ रेश्मा बोर्‍हाडे,दादाभाऊ भगत,प्रभाकर भगत,प्रमोद देखणे,सुभाष तांबे,सुभाष सोनवणे,राजेश भगत,मिलींद शेळके,मच्छिंद्र आमाप,सुरेश जाधव,रमेश जाधव,प्रज्ञेश सासवडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

मार्गशीर्ष शीतपक्ष षष्ठी तिथी शततारा रविवारी!!
मल्हारि त्या पुरी प्रगटला भक्तांचा कैवारी!!
मणीमल्लांशी मार्तंड भैरवाचे युध्द मार्गशिर्ष शुध्द प्रतिपदेपासून सुरु झाले. मणीमल्ल दैत्यांच्या सर्व सैन्याचा पाडाव झालेला होता. देवदिपावलीच्या प्रतिपदेपासून सुरु झालेला युध्दाचा संग्राम शुध्द षष्ठीपर्यत टिकला व मार्तंड भैरवाने विजय मिळवला.म्हणून मार्गशिर्ष शुध्द प्रतिपदा ते षष्ठीपर्यत खंडोबाचा उत्सव साजरा करतात. मार्तड भैरवाने मणीमल्लाचे मर्दन केले,तेव्हा मार्गशीर्ष शुध्द षष्ठीबरोबर रविवार आणि शततारका नक्षत्रही होते.मणीमल्लांशी मार्तंड भैरवाचे युध्द सुरु असताना वाघ,सिंह,बैल,गायवासरु,कुत्रा, घोडा या प्राण्यांनी मार्तंड भैरवाला खंबीरपणे साथ दिलेली होती.

मणीमल्लांची कथा घडल्यानंतर शेकडो वर्षानी मार्तंड भैरवाने पुन्हा मानव रुप धारण केले.यावेळी देवाने बेलभंडार,घोडा,कुत्रा वाघ,सिंह आणि बैलाला आपल्या बरोबर आणले व त्या मानवरुपात भंडाराचे अनेक चमत्कार करुन महती वाढवली. खंडोबाच्या ठिकठिकाणच्या मंदिरात बैल,गायवासरु,घोडा,वाघ,सिंह व कुत्रा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आल्याचे पाहायला मिळते.षष्ठीच्या दिवशी युध्दात विजय मिळाल्यानंतर सर्व ॠषी—मुनीनी मार्तंड भैरवावर चाफ्याची फुले उधळल्याने मार्गशिर्ष शुध्द षष्ठीला “चंपाषष्ठी “म्हणून ओळखली जाऊ लागली असल्याचे मल्हारीमाहात्म्य,मार्तंड विजय ग्रंथात नमूद केले असल्याचे यावेळी प्रसाद महाराज अंमळनेरकर यांनी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.