आरोग्य व शिक्षण

गावाचा सर्वोत्तम विकासाचा आराखडा करा- आनंद भंडारी

गावाचा सर्वोत्तम विकासाचा आराखडा करा- आनंद भंडारी

आंबेगाव – प्रतिनिधी

“जगभरातील १९३ देशांनी एकत्र येऊन पृथ्वीचे संवर्धन, मानवी जीवनमान उंचावणे, मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १७ ध्येय निश्चित करुन ती साध्य करण्यासाठी परिपूर्ण नियोजन केले आहे. प्रत्येक गावाने यात सक्रिय सहभागी होऊन उपलब्ध निधी, विविध योजनांची सांगड घालून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी सर्वोत्तम योगदान देण्याची वेळ आली आहे. सरपंच, सदस्यांनी गावाच्या गरजा ओळखून ग्रामनिधी, वित्त आयोग निधी, विविध योजनांची सांगड, श्रमदान, प्रसंगी लोक वर्गणी असा लोकसहभागातून सर्वोत्तम विकास आराखडा करावा”, असे आवाहन राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कक्षाचे राज्य संचालक आनंद भंडारी यांनी केले.

आंबेगाव तालुक्यातील पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत सदस्य, मोबिलाईझर, ग्राम स्तरावरील कर्मचारी, ग्रामसभा कोष सदस्यांचे भिमाशंकर कृषी पर्यटन केंद्र, घोडेगाव येथे प्रशिक्षण आयोजित केले आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत पुणे जिल्हा परिषद, आंबेगाव पंचायत समिती आणि रयत शिक्षण संस्थेचे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र वर्ये-सातारा यांनी संयुक्तपणे प्रशिक्षण घेतले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करताना आनंद भंडारी यांनी शाश्वत विकास ध्येय, वित्त आयोग, विविध योजनांची माहिती आणि अंमलबजावणी करण्यासाठी महत्वपूर्ण माहिती दिली.

यावेळी आंबेगाव पंचायत समितीच्या सहा गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव, विस्तार अधिकारी चंद्रशेखर हुजरे, रमेश मुठे, प्रविण प्रशिक्षक वामन बाजारे, दीपक बाचुरकर, युवराज लांडे,मयुर खळदे, चंद्रकांत माने आदी उपस्थित होते.
पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या सरपंच,सदस्य, मोबिलाईझर, ग्राम कोष सदस्य, ग्रामस्तरावरील कर्मचारी यांना उजळणी प्रशिक्षणात अधिनियम, अधिकार कर्तव्य, जबाबदारी,कामे, शासन निर्णय, रेकॉर्ड याबाबत विविध राज्य स्तरीय प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.या मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी उपस्थिती होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.