श्रीगोंदा शुगर शाळेत आजी-आजोबा दिवस आणि पालक मेळावा आयोजन!!

श्रीगोंदा शुगर शाळेत आजी-आजोबा दिवस आणि पालक मेळावा आयोजन!!
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदा शुगर येथे आजी-आजोबा दिवस आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबा आणि पालक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्रीगोंदा फॅक्टरी परिसरात राहणारे आणि भारतीय सैन्यात सेवा केलेले नबू जाधव मेजर हे होते. विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा म्हणून किसन कोकाटे, मधुकर जगताप, किसन घालमे, वंजारे असे अनेक ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सर्व आजी-आजोबांचे शाळेमध्ये ढोल -ताशाच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली व त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचे औक्षण करून पाद्यपुजा केली. यामुळे सर्व उपस्थित आजी -आजोबा भारावून गेले.
उपस्थित पालकांनी अनेक मेळाव्यात आपले विचार मांडले. अनेक पालकांनी शाळेच्या गुणवत्तेविषयी व प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले. काहींनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी काही सूचना मांडल्या. विद्यार्थ्यांना नियमित गृहपाठ देण्याची अपेक्षा व्यक्त केली. तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी शाळेत करून घेतली जाते व त्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे सर्वांनी आश्वासन दिले. त्याचप्रमाणे शाळेच्या भौतिक विकासाला सर्वोतोपरी हातभार लावण्याचे सर्वांनी मान्य केले. तसेच शाळेतील अनेक विदयार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबा यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे विचार मांडले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मेजर जाधव यांनी शाळेच्या वर्ग खोल्या दुरुस्त करण्यासाठी सर्वपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. सध्या समाजात सर्व बालके आजी-आजोबांच्या प्रेमापासून दुरावलेली आहेत, त्यामुळे कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली आहे असे विचार व्यक्त केले. शाळेच्या मुख्याध्यापिका पदमा शिर्के-पाचपुते मॅडम यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या सध्याच्या भौतिक गरजा कोणत्या आहेत हे सांगितले. तसेच आजी-आजोबांचे कुटुंब व्यवस्थेतील महत्त्व समजावून सांगितले.
यावेळी शाळेमध्ये पोषण आहार सप्ताहाच्या निमित्ताने पालकांची पाककृती स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये अनेक महिलांनी वेगवेगळे पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते. यावेळी लिंपणगाव केंद्राचे केंद्रप्रमुख विजय लंके यांनी बालकांच्या शारीरिक वाढीतील पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदीप कोकाटे, दत्तात्रय घालमे, सचिन गोंटे, निलेश जगताप आणि सर्वच शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी योगदान दिले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक संदीप हिरवे सर यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक रविंद्र होले सर यांनी सर्वच आजी-आजोबांच्या विविध मनोरंजन खेळाच्या स्पर्धा घेतल्या. यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आनंद लुटला. शाळेतील शिक्षिका पाचांगणे मॅडम, डोंगरे मॅडम, गवळी मॅडम, पऱ्हे मॅडम यांनी विविध धान्यांची सुंदर रांगोळी काढून पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच विविध खेळाच्या स्पर्धा व पाककृती स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मदत केली.