वन्य प्राण्यांसाठी लोणी,वडगावपीर परिसरात उभारले तीन पाणवठे!!

वन्य प्राण्यांसाठी लोणी,वडगावपीर परिसरात उभारले तीन पाणवठे!!
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी,वडगावपीर परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्याचा फटका वन्य प्राण्यांना बसत आहे, ही बाब लक्षात घेऊन धामणीच्या वनपाल सोनल भालेराव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तीन ठिकाणी पाणवठे तयार करून त्यात पाणी सोडले. त्यामुळे वन्य प्राण्यांची तहान भागण्यास मदत झाली आहे.
लोणी,वडगावपीर भागातील वन हद्दीत ससे,रानडुक्कर,कोल्हे,तरस,हरीण बिबट्यासह अनेक पक्षांचे वास्तव्य आहे. कडक उन्हामुळे परिसरातील ओढे,नाले,तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याच्या शोधात वन्य प्राणी मानव वस्तीकडे येत आहेत. यात अनेक प्राणी विहिरीत पडून, रस्ते ओलांडताना, वाहनांना धडकून मृत्यू पावत आहेत.काही प्राण्यांकडून नागरिकांवर देखील हल्ले होत आहेत.या अडचणी विचारात घेता वनपाल भालेराव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वडगावपीर येथील पोखरकर मळा नंबर दोन या ठिकाणी एक व लोणी येथे दोन असे एकूण तीन पाणवठे बांधले.त्यात नुकतेच पाणी सोडण्यात आले. त्यामुळे प्राण्यांची व पक्षांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली.
सध्या दोन गावांमध्ये तीन पानवठे तयार केले आहेत.जर गरज भासली तर ही संख्या वाढवली जाईल. तसेच लोणी येथील वन कर्मचारी बाळासाहेब आदक या ठिकाणी देखरेख करतील. जसे पाणी लागेल तसे त्या पाणवठ्यात सोडले जाईल जेणेकरून पशु पक्षांना पाणी कमी पडणार नाही.अशी माहिती धामणी वनविभागाच्या वनपाल सोनल भालेराव यांनी पंचनामाशी बोलताना दिली.