
पंचनामा प्रतिनिधी प्रतिनिधी – तेजस वाळुंज
राजगुरुनगर – खेड तालुक्यातील कनेरसर-पाबळ रस्त्याच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाने ११ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असून, अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
कनेरसर-पाबळ रस्ता खराब झाल्यामुळे परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान होत होते, तसेच अपघातांचा धोकाही वाढला होता. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती.
या प्रश्नासाठी आमदार बाबाजी काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर काम सुरू होणार
पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कनेरसर-पाबळ रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितल्याची माहिती अशोक टाव्हरे यांनी दिली.
अनेक दिवसांपासून खराब रस्त्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना या निर्णयामुळे दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आता आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


