सामाजिक

अतिवृष्टीमुळे जुन्नर-आंबेगावमधील १३ रस्ते तात्पुरते वाहतुकीसाठी बंद !!नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचे आदेश; परिस्थितीनुसार रस्ते सुरू करण्याचा निर्णय घेणार तहसीलदार

1010105849
1010105849

पंचनामा प्रतिनिधी – जुन्नर व आंबेगाव तालुक्यांत गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही तालुक्यांतील एकूण १३ रस्ते तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी यांनी हा आदेश जारी केला आहे.

सततच्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी, ओढे व बंधाऱ्यांवरील अनेक पुलांवरून पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत वाहतूक सुरू ठेवल्यास अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

जुन्नर तालुक्यातील बंद रस्ते : जुन्नर–बेळेआळी ते लेण्याद्री पूल, बस्ती–सावरगाव पूल, निमगाव–निमदरी पूल, जुन्नर–वडज पूल, नारायणगाव–वारुळवाडी (नेवकर) पूल, नारायणगाव–वारुळवाडी (मेहेर) पूल, खोडद–रांजणी पूल तसेच हिवरे तर्फे नारायणगाव येथील बंधाऱ्यावरील पूल.

आंबेगाव तालुक्यातील बंद रस्ते : लाखणगाव येथील घोडनदीवरील पूल (बेल्हा–जेजुरी महामार्ग), भराडी येथील बंधारा रस्ता, डिंभे–बोरघर रस्ता, डिंभे–भीमाशंकर रस्ता तसेच अडिवरे–अहुपे रस्ता. स्थानिक पातळीवरील पूरस्थितीचा आढावा घेऊन संबंधित तहसीलदार परिस्थिती सामान्य झाल्यानंतर संबंधित रस्ते वाहतुकीसाठी सुरू करण्याबाबत निर्णय घेतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रशासनाने नागरिकांना बंद करण्यात आलेल्या रस्त्यांचा वापर टाळण्याचे, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Related posts

बेल्हा जेजुरी राज्यमार्गावर अपघातांची मालिका सुरूच !!

Chief Editor

जिल्हास्तरीय दिव्यांग शालेय क्रीडा स्पर्धेत पाबळ शाळेचे उल्लेखनीय यश !!

Chief Editor

शिंगवे (पारगाव) येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ गाव बंद; जनआक्रोश मोर्चा

Chief Editor

Leave a Comment