अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !!


पंचनामा प्रतिनिधी अकोले – अकोले तालुक्यातील कोतुळ येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफास केला असून या टोळीकडून गुटखाचा मोठा साठा व वाहनांसह तब्बल एक कोटी एक लाख ७४ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने हा छापा टाकला आहे.
दोन गुटखा तस्करांसह १० आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एकूण १२ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर याबाबत अकोले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधधंद्या विरोधातील ही मोठी कारवाई करण्यात आली.
पोलिसांना मिळालेला गुप्त बातमी नुसार प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने ही छापा कारवाई केली.या कारवाईत कोतूळ येथील नाचणठाव रोडवर असणाऱ्या एका पत्र्याच्या शेडमध्ये हिरा पान मसाला व रॉयल ७१७ तंबाखूचा मोठा अवैध साठा आढळून आला.पोलिसांनी या अवैध गुटखा व्यवसायाचे तस्कर सोहेब सावीद काजी, शाहिद हुसेन लतीफ पटेल या दोघा गुटखा तस्करांबरोबर इतर दहा आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या छापा कारवाईत हिरा पान मसाला ११० पोते, रॉयल ७१७ सुगंधी तंबाखु ५० पोते यासह वाहने व रोख रक्कम असा १ कोटी १ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार दि. १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
यामध्ये शोहेब शाबीद काझी (रा. कोतुळ, ता. अकोले), शाहीद हुसेन लतीफ पटेल (रा. कोतुळ, ता. अकोले), मतीन शबीर शेख (रा. कोतुळ, ता. अकोले), शहा नवाज जावेद काझी (रा. कोतुळ, ता. अकोले), परवेज युनूस शेख (रा. कोतुळ, ता. अकोले), साद अनवर तांबोळी (रा. अकोले), अतीक अनवर शेख (रा. समशेरपुर, ता. अकोले), शाहरुख जावेद काझी (रा. कोतुळ, ता. अकोले), सादिक पठाण (रा. अकोले), अमोल शरद जाधव (रा. अकोले), जुबेर युनुस शेख (रा. कोतुळ, ता. अकोले), इम्रान रौफ शेख (रा. कोतुळ, ता. अकोले) या आरोपी वर कारवाई करण्यात आली.
अवैध गुटखा व्यवसायावरील ही सर्वात मोठी कारवाई झाल्याने तालुक्यात हा दिवसभर चर्चेचा विषय होता.
वाळू तस्करी, गुटखा तस्करी यासारख्या अवैध धंद्यांवर यापुढेही अशीच कारवाई चालूच राहील अशी माहिती पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी माध्यमांना दिली.
गेल्या आठ दिवसांपूर्वी याच गुटखा तस्करावर स्थानिक पोलिसांनी छापा टाकला होता त्यावेळी देखील मोठा गुटखाचा साठा जप्त करण्यात आला होता. मात्र त्यावेळी कोणतीही कारवाई झाली नाही त्यावेळी कारवाई न करता मोठ्या रकमेची आर्थिक तडजोड झाली होती. या मोठ्या रकमेच्या तडजोडीनंतर पुन्हा ही कारवाई झाल्याने पोलिसांच्या या भूमिकेवर चांगलीच चर्चा दिवसभर रंगली होती. जिल्ह्यातून आलेल्या पथकाने या केलेल्या कारवाईचे स्वागत होत असले तरी स्थानिक पोलिसांच्या अर्थपूर्ण तडजोडीमुळे अकोले तालुक्यात अवैध धंदे सुसाट सुरू असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.