खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे बिबट्याचा वावर, वनविभागाने लावला पिंजरा!!

खडकवाडी (ता.आंबेगाव) येथे बिबट्याचा वावर, वनविभागाने लावला पिंजरा!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या खडकवाडी परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढल्याने खडकवाडी येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या परिसरात अनेक वेळा नागरिकांना बिबट्या दिसल्याचे स्थानिकांनी सांगितले.
सोमवारी रात्री आठ वाजता भैरवनाथ मंदिराजवळ रामदास गोविंद सुक्रे हे मोटरसायकल वरून मंदिराकडे जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात सुक्रे जखमी झाले.
नेमके याच वेळेस धामणी वन परिमंडळ अधिकारी सोनल भालेराव या खडकवाडी परिसरात गस्तीवर होत्या. खडकवाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष एकनाथ सुक्रे यांनी त्यांना संपर्क केला त्वरित त्या घटनास्थळी दाखल झाल्या.त्यांच्याच गाडीने सुक्रे यांना मंचर येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.
गेल्या एका महिन्यात भैरवनाथ मंदिर,स्मशानभूमी या परीसरात बिबट्याचे बहुतांशी नागरिकांना दर्शन झाले आहे.बिबट्या संदर्भात मा. सरपंच अनिल डोके यांनी वनविभागाशी तातडीने संपर्क केला व या परिसरात पिंजरा बसवण्याची मागणी केली.वन विभागाने त्याची दखल घेत वडाजी बुवा मंदिर,स्मशानभूमी आणि खुडवस्ती असे तीन पिंजरे लावले आहेत. यावेळी वनरक्षक योगेश निघोट वनसेवक दिलीप वाघ,निवृत्ती सुक्रे,सुनील सुक्रे उपस्थित होते.
मा.सरपंच अनिल डोके,तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ सुक्रे व ग्रामस्थांनी वनविभागाचे आभार मानले.या संदर्भात वन परिमंडळ अधिकारी सोनल भालेराव म्हणाल्या की,धामणी खिंड,खडकवाडी व इतर ठिकाणी बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितले.ग्रामस्थांनी शेती,शिवारामध्ये कामाला जाताना एकटे जाऊ नये तसेच दुचाकीवर सायंकाळी सहा नंतर प्रवास करताना शक्यतो एकट्याने प्रवास करू नये कोणालातरी सोबत बरोबर ठेवावे.