आरोग्य व शिक्षणसामाजिक

सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात धामणी (ता.आंबेगाव) येथे म्हाळसाकांत खंडोबा यात्रा सुरु!!

सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात धामणी (ता.आंबेगाव) येथे म्हाळसाकांत खंडोबा यात्रा सुरु!!

सदानंदाचा येळकोटच्या जयघोषात भंडारा,खोबरे उधळून हजारो भाविकांनी धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले.

पुणे,नाशिक व नगर जिल्ह्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या येथील म्हाळसाकांत खंडोबाच्या यात्रेला बुधवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली.

बुधवारी माघ शुध्द पौर्णिमेला भल्या पहाटे चार वाजता श्री खंडोबाच्या भव्य मूर्तीसमोरील खालच्या भागात असलेल्या स्वयंभू सप्तशिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक परंपरागत सेवेकरी तांबे व भगत यांंनी केल्यानंतर पहाटे साडेचार वाजता स्वयंभू सप्तशिवलिंगावर साधारण दोन फूट उंच व दिड फूट रुंद व्यासाची सर्वांगसुंदर पंचधातूच्या खंडोबाच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.खंडोबाच्या मुखवट्याला आणि पूर्वमुखी श्री म्हाळसाकांत खंडोबा,म्हाळसाई,बाणाई व उत्तरमुखी असलेल्या खंडोबाच्या मानलेल्या बहिणीच्या जोगेश्वरीच्या विशाल देखण्या मूर्तीना वस्रालंकार घालण्यात आले.त्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत खंडोबाची महाआरती करण्यात आली व भाविकांना देवाच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

खंडोबाला वाघाळे (ता.शिरुर) येथील वाल्मिकराव गावडे पाटील यांनी चांदीचा आकर्षक फेटा तर धामणीचे भाविक विक्रम पाटील जाधव यांनी चांदीचे खडग (तलवार) यावेळी अर्पण केले.देवस्थानांच्या तांबे,भगत सेवेकरी मंडळीनी आणलेल्या पुरणपोळी,साजूक तूप,दूध व खसखशीची खीर,सार,भात कुरडई व पापडी या पंचपक्वानांचा नैवेद्य सप्तशिवलिंगाला अर्पण करण्यात आला.यावेळी देवस्थानाचे सेवेकरी भगत,तांबे मंडळी उपस्थित होती.

पहाटे दर्शनासाठी महिला भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.देवस्थानातील पारंपारिक धार्मिक विधी पार पडल्यानंतर यात्रोत्सवाला सुरुवात झाली.सकाळी नऊ वाजता गावातील पेठेतून पारंपारिक वाद्याच्या गजरात वाजत,गाजत मिरवणूकीने देवाचे हारतुरे व मांडवडहाळे मंदिरात आणण्यात येऊन ते देवाला अर्पण करण्यात आले.

पुणे,मुंबई,भोसरी,पिंपरी चिंचवड शहरातील व परिसरातील भाविक सकाळपासून दर्शनाला येत होते.पेठेतून नवसाच्या बैलगाड्याची व गाडी बगाडाची डफडे,ढोलकी,ताशा संबळ,सनई,तुतारीच्या पारंपारिक वाद्यात व बँजो व डीजेच्या तालात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर बैलगाड्याच्या घाटामध्ये नवसाच्या बैलगाड्याच्या शर्यती सुरु झाल्या.

घाटात नवसाचे बैलगाडे पळवण्यासाठी पडवळ,सैद,आवटे,(महाळूंगे पडवळ) जाधव,ढगे,(नांदूर) थोरात (बेल्हा,पाडळी) गावडे (गावडेवाडी) याशिवाय गाडकवाडी, पारगाव,भराडी,फाकटे,टाकळी हाजी,गावडे (गावडेवाडी) यांचे बैलगाडे आलेले होते.बैलगाड्याच्या शर्यती पाहाण्यासाठी बैलगाडा शौकीनानी मोठी गर्दी केलेली दिसत होती.

मंदिर परिसरात भंडारा,खोबरे व पेढे विक्रीची व फुलाची दुकाने दिसत होती.मंदिराच्या शिखरावर व महाद्बारावर पारनेर तालुक्यातील आळे पाडळीच्या थोरात कुटुंबियाच्या वतीने विनामूल्य आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. सन २०२३ पासून सलग पाच वर्षे यात्रेत विनामूल्य विद्युत रोषणाई थोरात कुटुंबिय करत असल्याचे सांगण्यात आले.

मंदिराची व गाभार्‍याची झेंडूच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.मंदिराच्या आवारात भाविकांची पाचनामाची जागरणे सुरु होती. वाघेमंडळी,वीर मंडळी जागरणाचे घटापुढे खंडोबाचा पाचनामाचा गजर करताना दिसत होते.पंचक्रोशीच्या गावांमधील भाविक सहकुटुंब देवघरातील टाकाचे देव,ताम्हणात आणून खंडोबाचा भंडारा व खोबरे उधळून भक्तिभावाने सदानंदाचा येळकोट करुन तळीभंडार करत होती.

यात्रेनिमित्त निरनिराळ्या ठिकाणाहून हाँटेल,आईस्क्रीम पार्लर,जनरल कटलरी खेळणीची दुकाने सौदर्य प्रसाधने,गृहोपयोगी वस्तू,कृषी उपयोगी लाकडी व लोखडी अवजारे,निरनिराळे फॅशनेबल कपडे,बेडशीटची दुकाने थाटलेली दिसत होती.

दुपारी बारा नंतर देवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या.दुचाकी व चारचाकी वाहनाने येणार्‍याची संख्या मोठी दिसत होती.रात्री आठ वाजता माही पुनवेच्या पालखीची ढोल लेझीमच्या निनादात व फटाक्याच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली.पालखीला भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती. यात्रेची व्यवस्था देवस्थान,यात्राकमेटी,ग्रामपंचायत,गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते व पोलीस चोखपणे बजावताना दिसत होते.

पूर्वापार भाविक भक्त कुलस्वामी खंडेरायाला त्यांच्या काही अडीअडचणी दूर करण्यासाठी नवस बोलले जायचे.जोपर्यत माझ्या दारात बैल असतील तोपर्यत तुझ्या घाटात माझा नवसाचा बैलगाडा उधळणार त्यानंतर ज्यांच्या अडीअडचणी दूर झाल्या त्या भाविक भक्तांनी नवसाची पूर्तता करण्यासाठी घाटात नवसाचे बैलगाडे उधळणे ही परंपरा सुरु झाली असल्याचे सांगण्यात आले.

त्यानंतर त्या विविध आडनावांच्या कुळांच्या वारसांनी ही परंपरा आजतागायत जतन करुन ठेवलेली आहे.म्हणून धामणीचा खंडोबा हे जागृत देवस्थान मानले जाते.या घाटात बैलगाड्याच्या शर्यतीसाठी कोणत्याही प्रकारचा इनाम दिला जात नाही आणि स्विकारलाही जात नाही असे बैलगाडा मालकांनी सांगितले.

निस्सीम सेवाभक्ती करणार्‍या तांबेबाबा भक्ताच्या प्रेमाखातर कुनाडीच्या डोंगरावरुन माघ शुध्द पौर्णिमेला पहाटेच्या सुमारास आता जे मंदिर उभे आहे त्या ठिकाणच्या काळ्या पाषाणाच्या कपारीतील निवडुंगाच्या बेटात खंडोबा वाघाच्या रूपात बसून दृष्ट्रान्त देऊन लुप्त झाल्यानंतर त्याठिकाणी सप्तशिवलिंगे आढळली.ती सप्तशिवलिंग म्हणजे खंडोबाचा परिवार समजला जातो.त्यामध्ये प्रामुख्याने म्हाळसाई,बाणाई,हेगडी प्रधान,घोडा,कुत्रा,काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी हे असल्याचे मानले जाते.त्यामुळे माही पुनवेला खंडोबाची यात्रेसाठी भाविक श्रध्देने आवर्जुन येतात असे सेवेकरी मंडळीनी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.