जारकरवाडी(ता.आंबेगाव) गावातील शेतकरी श्री.शिवाजीराव गेनभाऊ भोजने यांनी फुलवली शेवग्याची बाग!!

जारकरवाडी(ता.आंबेगाव) गावातील शेतकरी श्री. शिवाजी गेनभाऊ भोजने यांनी फुलवली शेवग्याची बाग!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावातील प्रगतशील शेतकरी श्री.शिवाजी गेनभाऊ भोजने यांनी आपल्या पंधरा गुंठे क्षेत्रामध्ये ओडिसी जातीच्या शेवग्याची 300 पेक्षा जास्त झाडांची लागवड केली आहे.
शेवगा या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव कमीत कमी होत असल्याने भांडवली खर्चही कमी लागत आहे. याशिवाय हे पीक बाराही महिने सुरू राहत असल्याने उत्पादन ही भरपूर मिळत आहे. खुल्या बाजारात 40 रुपये प्रति किलो दराने हा शेवगा विकला जातो. आरोग्याच्या दृष्टीने शेवगा हे पीक महत्त्वाचे असून शेवग्याचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात तसेच हे पीक मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी फलदायी ठरत असल्याचे समोर आले आहे.
श्री. शिवाजीराव गेनभाऊ भोजने हे नेहमीच आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात.जारकरवाडी परिसरात डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याचे पाणी फिरल्याने 90% पेक्षा जास्त क्षेत्र बागायती झाले आहे. शेवगा या पिकाला पाणीही कमी लागते.रोगराईचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने या पिकासाठी येणारा खर्च हा अत्यल्प असतो. शिवाय बाजारात शेवग्याला बाराही महिने मागणी असल्याने या पिकाची लागवड केल्याचे भोजने यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.
तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतीतून निश्चितच चांगले उत्पन्न मिळते. बाजारपेठेचा अभ्यास केल्यास ज्या पिकाला चांगली मागणी आहे आणि भांडवली खर्च कमी येतो अशा पिकाची लागवड केल्यास शेतीतून हमखास चांगले उत्पन्न मिळते हा माझा अनुभव असल्याचे भोजने यांनी आवर्जून सांगितले.