जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे उत्साहात संपन्न झाला बाल वारकऱ्यांचा दिंडी सोहळा !


पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या ढोबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांचा पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पायी दिंडी सोहळ्यात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभाग घेतला.तसेच जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोषात वारीचा आनंद लुटला.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी या शाळेत नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची ओळख व्हावी या हेतूने शाळेत आठवडे बाजार आयोजित केला जातो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूच्या परिसराची माहिती व्हावी यासाठी शिवार फेरीचे आयोजन केले जाते. या शिवाय दप्तर विनाशाळा, बोलक्या भिंती, विविध स्पर्धा परीक्षा,नवागत विद्यार्थ्यांचे अभिनव स्वागत, विविध महापुरुषांच्या जयंती, त्यानिमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या वकृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, हस्तकला स्पर्धा आदी उपक्रम शाळेने यशस्वीपणे राबवले आहेत.

हल्लीचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे. या स्पर्धेत आपला विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण दिले जाते. विज्ञान व अध्यात्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.दैनंदिन आयुष्य जगताना मुलांना नैतिक मूल्यांची जाणीव असावी याशिवाय माणूस हा समाजशील प्राणी असल्याने त्याला समाजातील सर्व घटकांची, समस्यांची जाणीव व्हावी म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक विजय थोरात यांनी पंचनामाशी बोलताना सांगितले.
गावचे ग्रामदैवत वडजादेवी मंदिर परिसरात भजन करून वारीची सांगता करण्यात आली. या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व पदाधिकारी,पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या सहशिक्षिका वैजयंता थोरात, अंगणवाडी सेविका लताश्री लबडे, मदतनीस निर्माला पाचपुते, गुजाआत्या ढोबळे यांनी हा उपक्रम राबवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.