परीक्षा पास करणे हेच शिक्षणाचे ध्येय नसून,मिळालेल्या ज्ञानाचा योग्य वापर हेच खरे शिक्षण – मा.मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन!!


पंचनामा मंचर प्रतिनिधी – शिक्षणाकडे बघण्याचा प्रयत्न फक्त परीक्षा पास करणे एवढ्या पुरता नाही. तर ज्ञानाचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता आला पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजी जशी फायदेशीर आहे तशीच धोकादायक असून त्याची पूर्ण माहिती घेऊन वापर केल्यास धोका राहणार नाही असे प्रतिपादन मा.मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र, तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात करण्यात आला त्यावेळी वळसे पाटील बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.खा.म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील होते.वळसे पाटील पुढे म्हणाले की,शाळांचा निकाल शंभर टक्के लागला म्हणजे आनंद होतो. मात्र त्या शाळांमधून किती विद्यार्थी भविष्यात चांगल्या पद्धतीने घडवू शकतो तसेच शिक्षणाचा विद्यार्थ्यांना झालेला फायदा हे महत्त्वाचे आहे.नवीन टेक्नॉलॉजी जशी फायदेशीर आहे तशीच धोकादायक असल्याचे सांगून एका विद्यमान आमदाराचा निधी ए.आय.चा वापर करून पळविण्याचे उदाहरण त्यांनी दिले. या संदर्भात पूर्ण माहिती घेऊन वापर केला तर धोका राहणार नाही असे सांगून ते म्हणाले शिक्षकांचा संच मान्यतेचा प्रश्न सुटलेला नाही. या प्रश्नासंदर्भात राज्य शासन स्तरावर पाठपुरावा करून विधानसभेत प्रश्न उपस्थित करू शिक्षकांच्या अडचणी सोडवण्याची ग्वाही वळसे पाटील यांनी दिली.

म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की,आंबेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये चांगली गुणवत्ता असून कष्ट करण्याची तयारी आहे. येथील विद्यार्थी अमेरिका, युरोप तसेच इतर देशात मोठ्या पदावर काम करत आहे.ज्याप्रमाणे चांगले गुण मिळवणे महत्त्वाचे आहे तसेच परिपूर्ण विद्यार्थी घडणे सुद्धा महत्त्वाचे आहे. शाळा, घर, तालुका यांचे नाव मोठे झाले पाहिजे असे ठरवून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी.

क्रिश मेहकरकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्राच्या सहसचिव पूर्वा वळसे पाटील, मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विष्णू काका हिंगे, सभापती निलेश स्वामी थोरात, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे,सुभाष मोरमारे, सुनील बाणखेले,सुषमा शिंदे, सचिन पानसरे, प्रेम थोरात, शिवराज निघोट, गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका, सरपंच दीपक पोखरकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विनोद बोंबले, सचिव अनिल देसले, उपाध्यक्ष राजू आढळराव, प्राचार्य कांताराम टाव्हरे,प्रा.अरुण गोरडे आदी उपस्थित होते.

सुनील वळसे पाटील यांनी प्रास्ताविक केले. केशव टेमकर व निलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
