नातेकलेचे त्या रक्ताशी – सुनील धोंडीभाऊ अटक

जीवन प्रवास एका सूरत्याचा!!
खरंच……… माझ्या लिखाणावर प्रेम करणारे रसिक मायबाप…….
” नातेकलेचे त्या रक्ताशी “या लेखमालेतून आज दिनांक ५/२/२०२५रोजी लेख सोडित आहे. बेल्हे तमाशा नगरीतील आवाजाची जादू असलेला सुरत्या (झीलकरी )सुनील धोंडीभाऊ अटक मुक्काम पोस्ट वडझिरे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील होय. त्यांच्या आईचे नाव छबुबाई असून त्यांना दोन मुलं आहेत. मुलगी नाही .त्यांना वयाच्या दहाव्या वर्षापासून देवाने आवाजाची जादू अवगत केली आहे. हार्मोनियम, तुंतुने, झिलकरी आणि गायन काम इत्यादी कलेचे प्रकार त्यांच्या अंगी उतरले आहेत .त्यांनी कैलासवासी संगीत रत्न दत्ता महाडिक वारल्यानंतर त्याच तमाशात काम करायचे ठरवले. शिलकार ,पोवाडा ,बहिरवी,गणावळण ,लावणी फाटा इत्यादी कामासाठी सुरत्या उपयोगी पडून त्याने आपले नाव उभ्या महाराष्ट्रात गाजविले .सुनील भाऊ हे जागरण गोंधळाचे ही काम करतात. महाडिक अण्णा वारल्यानंतर त्या तमाशाची अवस्था थोडी बिघडली आर्थिक अडचणीमुळे तमाशा बंद पडण्याच्या तयारीत होता परंतु विलास भाऊ अटक ,सुनील भाऊ अटक, नंदू अटक हे कैलासवासी दत्ता महाडिक पुणेकर उर्फ अण्णा यांचे भाचे होते त्यांना या तमाशाची अवस्था पाहून वाईट वाटले .त्यांनी ठरवले की आपल्या मामांचा तमाशा पुन्हा आपण चांगल्या पद्धतीने तयार करू .आणि म्हणून सर्व जण तमाशाची धुरा सांभाळण्यासाठी त्यांनी हा तमाशा परत चालू केला .गाडी घुंगराची फेम प्रसिद्ध विलास भाऊ हे महाराष्ट्रातील एक सुंदर गायक असून ते फार हुशार आहेत .ताल,स्वर लय या त्रिवेणी संगमाचे बांधील आहेत. संगीत रत्न दत्ता महाडिक वारल्यानंतर त्या तमाशाचे संत तुकाराम हे वगनाट्य प्रसिद्ध होते.संत तुकारामांची भुमिका आण्णा करत होते.त्यांच्या भूमिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते.म्हणुन तेच वगनाट्य बसवून आणि अण्णांनी ही भूमिका करून रसिकांच्या मनात एक चांगल्या प्रकारे स्थान मिळवलं होते . विलास भाऊ अटक यांनी पुन्हा त्या तमाशामध्ये संत तुकाराम हे वगनाट्य बसून स्वतः भूमिका केली .ती ही भूमिका चांगल्या प्रकारे त्यांनी वटवली आणि महाराष्ट्रात पुन्हा त्या तमाशाचे वर्चस्व वाढवले. अण्णांच्या तमाशात राजा पाटील, संजय महाडिक, सुहास महाडिक,गेणुभाऊ आंबेठानकर साहेबराव दिघे, नारायणराव पाथर्डीकर यांनीही मोठ्या तोलामोलाची कामे करून महाराष्ट्राला आपली ओळख करून दिली. चालू वर्षी सुनील भाऊंनी बेले तमाशा महोत्सवात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते दत्ता महाडिक जीवन गौरव पुरस्कार पटकावला आहे. सुनील भाऊ अटक यांच्या जोडीला काही दिवस मुरली भोसले पण सुरते म्हणून आहेत .सध्या तमाशा क्षेत्रा मध्ये सुरत्यांचे प्रमाण कमी आहे .सुनील भाऊ सारख्या उंच आवाजाच्या सुरत्यामुळे तमाशाचे सर्व रान भरून निघते . सुरत्या हा तमाशाचा एक अनमोल दागिना आहे. सुनील भाऊ यांची राहणी साधी असून खरे बोलणे, गोरगरिबांची जाणीव, कलाकारांचे प्रेम, फड मालकाशी एकनिष्ठ पणा हे सर्व गुण त्यांच्या अंगी आहेत. त्यांचे वय 48 वर्षाचे असून सध्या 38 वर्षांमध्ये पदार्पण करून, रसिकांची सेवा करीत आहेत. तमाशाचा बाज हा पूर्वीचा राहिलेला नाही. फड मालकांनी रसिक डोक्यावर घेतला, सध्या सर्व गाणीच मागतात त्यामुळे गणगवळण, रंगबाजी, फारसा, वगनाट्य हे रसिकांना बघण्यास मिळत नाही. त्यामुळे रसिकांनी तमाशा क्षेत्राकडे पाठ फिरवली आहे. यात शंकाच नाही .अशी खंत सुनील भाऊ अटक यांनी व्यक्त केली आहे . फड मालकांनी जर पूर्वीचा तमाशा करून दाखवला आणि जुना संपूर्ण तमाशाचा बाज दाखवला तरच आपली ही कला अजरामर राहील .जिवंत राहील. असे त्यांनी आपले मत व्यक्त केले. बेले तमाशा मोहत्सवामध्ये सुनील भाऊ अटक यांचा सिंहाचा वाटा असतो .कारण माननीय जगतापआण्णाना यांच्या गाण्याला सुनील भाऊ अटक यांची साथ असते .जगताप अण्णा हे गाणं गायाला लागले की दत्ता महाडिक पुणेकर उर्फ अण्णा हे जिवंत आहेत याचा भास रसिकांना करून देतात….. यात शंकाच नाही. सुनील भाऊ अटक यांना आवाजाची परमेश्वराने एक देणगीच दिलेली आहे .अशा आवाजाची माणसं लवकर सापडत नाही .ज्याप्रमाणे काही शिंपल्यात क्वचित मोती आढळतो. त्याचप्रमाणे सुनील भाऊ हे एक बेल्हे नगरीतील मोतीच आहेत. असं म्हणायला काही हरकत नाही . बेल्हे तमाशा महोत्सवा मध्ये, महाराष्ट्रातील अग्रेसर तमाशा फडमालक ( कलाभुषण) रघुवीर खेडकर यांनी,सुनिल भाऊ अटक यांच्या कंठाचे चुंबन घेऊन,त्यांना उंच आवाजाची शाबासकी दिली.हिच त्यांच्या कलेची खरी पावती होय….
खरंच सुनील भाऊ तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, तुमच्या हातून रसिकांची सेवा घडो ,तुमचे नाव महाराष्ट्रात झळकत राहो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना.
लेखक
शाहीर खंदारे
या.नेवासा
मो.८६०५५५५८४३२