धामणी (ता.आंबेगाव) च्या खंडोबा मंदिरात अक्षयतृतीयेला वासंतिक चंदनउटी सोहळा होणार संपन्न !!

धामणी (ता.आंबेगाव) च्या खंडोबा मंदिरात अक्षयतृतीयेला वासंतिक चंदनउटी सोहळा होणार संपन्न !!
चैत्र महिण्यातील गुढीपाडव्यापासून उन्हाचा दाह वाढू लागलेला असल्यामुळे तिव्र उन्हापासून व उन्हाच्या झळांनी जीवाची काहिली होत आहे.देवाला सुध्दा उन्हाचा त्रास होऊ नये व खंडोबाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगाला शितलता व गारवा मिळावा यासाठी धामणी (ता.आंबेगाव) येथील कुलदैवत श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरातील स्वयंभू सप्तशिवलिंग व खंडोबा म्हाळसाई व बाणाईच्या पंचधातूच्या सर्वांगसुंदर देखण्या मुखवट्यांना चंदनउटी भक्तिमय वातावरणात अक्षयतृतीयेला शुक्रवार दि.१०मे २०२४ पहाटे साकारण्यात येणार असल्याचे देवस्थानाचे सेवेकरी मंडळीनी सांगितले.
या चंदनउटीसाठी सहानेवर उगाळलेलेच चंदन आवश्यक असते.श्रीक्षेत्र आळंदी येथील माऊलीच्या समाधीच्या चंदनउटी सोहळ्यासाठी चंदन देणारे ह.भ.प. बल्ल्लाळेश्वर महाराज वाघमारे यांच्याकडून श्री खंडोबा देवाच्या चंदनउटीसाठी आवश्यक असणारे अडीच किलो सहानेवर उगाळून तयार केलेले केशर व सुंगधी अत्तर मिश्रित चंदन आणण्यात येणार आहे.
चैत्रात आळंदी,पंढरपूर,.देहू,कोल्हापूर, जेजूरी या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी व ग्रामीण व शहरी भागातील देवस्थानाच्या मंदिरात गुढीपाडवा,रामनवमी,अक्षयतृतीया, हनुमान जयंती या शुभदिवशी सर्वत्र चंदनउटी सोहळा करण्यात येतो. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर चंदन नेण्यासाठी आळंदी येथे ठिकठिकाणच्या गावातील देवस्थानाचे सेवेकरी व भाविक ग्रामस्थ येतात असे वाघमारे यांनी यावेळी सांगितले.
चैत्र महिण्यामध्ये मंदिरातील वसंत ग्रीष्माचा दाह शमविण्यासाठी अक्षयतृतीयेच्या दिवशी पहाटे सप्तशिवलिंगाची वसंत पुजा अभिषेक,आरती त्यानंतर शाही चंदनउटी लेपन व ॠतुमानानुसार फळाचा नैवेद्य व उटीभजन करण्यात येणार असून मंदिराच्या गाभार्यात सुवासिक फुलांची आकर्षक सजावट करुन हा भक्तिमय सोहळा होणार आहे.तरी या चंदनउटी सोहळ्यास सर्व भाविकांनी आवर्जुन उपस्थित राहून या अक्षयपर्वणीचा लाभ घेण्याची विंनती धामणी,शिरदाळे,पहाडदरा व ज्ञानेश्वर वस्ती ग्रामस्थांनी व सेवेकरी भगत,तांबे,वाघे व वीर मंडळीनी केली असल्याचे सांगण्यात आले.