शिवसेना शाखेचे पिरवाडी व नंदवाळ येथे उद्घाटन

शिवसेना शाखेचे पिरवाडी व नंदवाळ येथे उद्घाटन
डॉ.सुरेश राठोड/कोल्हापूर
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना मराठी माणस व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी केली. राजकारणापेक्षा समाजकारण हा मूलमंत्र शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांनी केलेल्या समाजकार्याचा वसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कायमपणे जपला जाईल. आगामी काळात नव्याने निर्माण होणाऱ्या आणि नूतन बांधणी होणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या शाखा समाजकार्याचा केंद्रबिंदू ठरतील, असा विश्वास जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी व्यक्त केला.
बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील तिसऱ्या व चौथ्या शाखेचे उद्घाटन जिल्हाप्रमुख चव्हाण यांच्या हस्ते पिरवाडी व नंदवाळ येथे करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश करीत आगामी काळात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद वाढवण्याचा व समाजकार्याचा निर्धार केला. बाळासाहेब शिवसेना पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये तिसऱ्या व चौथ्या शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील यांनी शेकडो कार्यकर्ते व ज्येष्ठ शिवसैनिकांसह उपस्थित कार्यकर्ते व शेतकऱ्यांना अनेक विकास कामाबद्दल आम्ही लवकरच आपल्या गावामध्ये निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
यानंतर शिवाजीराव जाधव यांनी पिरवाडी व नंदवाळ येथील शाखा उद्घाटना बरोबर पुढील दौऱ्याच्या वेळी विकास कामाच्या उद्घाटनाला आमच्या सोबत पालकमंत्री दीपक केसरकर व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे उपस्थित राहतील, असे मनोगत व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार पिरवाडी शाखाप्रमुख जयवंत तुंबेकर व डॉक्टर गोडसे यांनी केले. तर आभार संदीप मिठारी यांनी मांडले.
या कार्यक्रमाला सूरज मकानदार, सूर्यकांत लाड, सागर पाटील, संदीप पाटील, भीमराव पाटील, शंकर पाटील यांच्याबरोबर पिरवाडी व नंदवाळ गावातील शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.