समर्थ शैक्षणिक संकुलात विद्यापीठ स्तरीय पर्यटन शिबिराचे आयोजन!!
पुणे नगर व नाशिक विभागातून उदंड प्रतिसाद!!

समर्थ शैक्षणिक संकुलात विद्यापीठ स्तरीय पर्यटन शिबिराचे आयोजन!!
पुणे नगर व नाशिक विभागातून उदंड प्रतिसाद!!
राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंग बेल्हे व जुन्नर पर्यटन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “वैभवशाली जुन्नर चे पर्यटन ” या विषयावर तीन दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रीय सेवा योजना पुणे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.श्रीकांत फुलसुंदर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके सर,जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक मनोज हाडवळे,अध्यक्ष यश मस्करे,प्रसिद्ध इतिहास संशोधक व लेखक डॉ.लहुजी गायकवाड उपाध्यक्ष डॉ.राधाकृष्ण गायकवाड,लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई,शिरीष भोर,रा से यो अधिकारी प्रा.विपुल नवले,प्रा.दिनेश जाधव,प्रा.तेजश्री गुंजाळ,प्रा.गौरी भोर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
डॉ.श्रीकांत फुलसुंदर यांनी विद्यार्थ्यांशी चर्चात्मक संवाद साधत राष्ट्रीय सेवा योजनाचे महत्व विशद केले.जुन्नर तालुक्याच्या विकासात पर्यटन क्षेत्राचे योगदान ऐतिहासिक,धार्मिक,आर्थिक व सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे.महाविद्यालयीन पातळीवर युवकांच्या माध्यमातून पर्यटन स्थळांचे संवर्धन व जपवणूक होणे हे देखील महत्त्वाचे आहे.या अनुषंगाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून युवकांमध्ये पर्यटनाविषयी जाणीव जागृती निर्माण होणे गरजेचे आहे.वैभवशाली जुन्नर चे पर्यटन कार्यशाळा ही महाविद्यालयीन युवकांमध्ये जुन्नर पर्यटना विषयी जाणीव जागृती निर्माण करणारी ठरेल.या कार्यशाळेतील सहभागी युवकांनी आपापल्या परिसरातील ऐतिहासिक,सामाजिक व धार्मिक अनुषंगाने उपलब्ध असणाऱ्या पर्यटन स्थळांचे जतन व संवर्धन करावे.त्यासाठी युवकांच्या सहभागाबरोबरच विवीध पर्यटनाविषयी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन डॉ.श्रीकांत फुलसुंदर यांनी केले.
डॉ.राधाकृष्ण गायकवाड आणि डॉ.लहुजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक,सांस्कृतिक,धार्मिक बाबतीत वैभवशाली जुन्नर चे पर्यटन यासंदर्भात सखोल मार्गदर्शन केले.यश मस्करे यांनी जैवविविधता खगोलीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले.मनोज हाडवळे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने आणि कुतूहलाने विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे देत पर्यटनातून नवनवीन रोजगाराच्या संधीची माहिती व मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी पुणे,नगर आणि नाशिक विभागातून एकूण १७० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदिप गाडेकर यांनी प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी तर आभार रासेयो अधिकारी प्रा.विपुल नवले यांनी मानले.