कविता हा जाणिवांचा आविष्कार : रवींद्र मालुंजकर
'पुस्तकावर बोलू काही...' उपक्रमात प्रतिपादन

कविता हा जाणिवांचा आविष्कार : रवींद्र मालुंजकर
‘पुस्तकावर बोलू काही…’ उपक्रमात प्रतिपादन
नाशिक : बालपणापासून कवितेचं बोट धरलं आणि आज तीच कविता माझं बोट भक्कमपणे धरून सर्वत्र मला फिरवते आहे. बऱ्यावाईट घटना दाखवत मार्गदर्शन करते आहे. म्हणूनच मला वाटतं की, कविता हा जाणिवांचा आविष्कार आहे, असे उदगार कवी रवींद्र मालुंजकर यांनी काढले.
येथील गिरणा गौरव प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘आठवांचे लक्ष मोती’ या साहित्यकृतीवर त्यांनी हुतात्मा स्मारकात संवाद साधला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका प्रा.सुमती पवार होत्या.
कवी मालुंजकर पुढे म्हणाले की, शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकांनी विशेषत: कवितासंग्रहांनी मला समृद्ध केलं. त्यामुळे आठवी-नववीत असल्यापासून कविता लिहायला लागलो. ‘आठवांचे लक्ष मोती’ संग्रहातील कविता सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या आहेत. अध्यापन करत असताना शिक्षक म्हणून काही भूमिका पार पाडाव्या लागतात, त्याचेही पडसाद या संग्रहातील कवितांमध्ये उमटले आहेत.
काव्यनिर्मितीची प्रक्रिया, पाऊस आणि मातापित्यांसह परिवार या विषयांवर जास्त कविता मी लिहिल्या आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी काव्यसंग्रहातील विविध कविता सादर त्यांनी करत रसिकांना मंत्रमुग्ध केले.
प्राचार्य प्र.द.कुलकर्णी आणि ॲड.प्रा.मिलिंद चिंधडे या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देण्यात आली. सूत्रसंचालन प्रा.डॉ. गिरीश पाटील यांनी केले तर आभार संजीवनी पाटील यांनी मानले.
दरम्यान, या उपक्रमात येत्या मंगळवारी (दि.२ एप्रिल) सेवानिवृत्त सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.बी.जी.वाघ हे ‘एकला चलो रे’ या साहित्यकृतीवर आपले विचार मांडणार आहेत.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या ‘पुस्तकावर बोलू काही…’ या उपक्रमात बोलताना कवी रवींद्र मालुंजकर. समवेत ज्येष्ठ साहित्यिका प्रा.सुमती पवार.