जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे अभिनव पद्धतीने संपन्न झाला प्रजासत्ताक दिन!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे अभिनव पद्धतीने संपन्न झाला प्रजासत्ताक दिन!!
आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गावं म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावच्या ढोबळेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अभिनव उपक्रम राबवत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत झेंडावंदन, विद्यार्थांची भाषणे संपन्न झाली. ध्वजारोहण उपसरपंच सचिन टाव्हरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ. सविता नितीन ढोबळे यांनी भूषवले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त सेंद्रिय शेती, महिलांचे आरोग्य,आरोग्य विषयी त्यांच्या समस्या, प्रश्न मोबाईलचा अतिरीक्त वापर या विषयावर परीसंवाद या वेळी पार पडला.
सध्याचे जीवन हे धकाधकीचे जीवन बनले आहे. धावपळीच्या युगात माणूस आपल्या आहाराकडे कानाडोळा करत फास्ट फूड च्या मागे लागला आहे. तसेच आहारात येणाऱ्या पालेभाज्या, फळे, धान्य ही संकरित स्वरूपाची आहेत. ज्याचा माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे. सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे किमान आपल्या कुटुंबासाठी तरी परसबागेचा वापर करून त्यात सेंद्रिय पद्धतीने पालेभाज्या,फळभाज्या तयार करण्यात याव्यात व त्याचाच वापर रोजच्या आहारात केला जावा यासाठी पुढील वर्षात किमान 25 ते 30 कुटुंबात तरी परसबाग तयार करायची शपथ यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी घेतली.
सध्याचा तरुण व तरुणपिढी मोठ्या प्रमाणात व्यसनांच्या आहारी गेला आहे. ही तरुणांची पिढी व्यसनमुक्त करायची असेल तर गावात होणाऱ्या वराती थांबल्या पाहिजेत असा ही विचारही या वेळी मांडण्यात आला.तसेच घरात आणि लहान मुलांना मोबाईल पासुन दुर ठेवण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ही या प्रसंगी करण्यात आले.
या चर्चेत ह.भ.प.बाबुराव महाराज ढोबळे, भिमाशंकर ढोबळे(पोस्टमन),अंगणवाडी सेविका निर्मला पाचपुते, सोपानराव ढोबळे, विकास ढोबळे, काळूराम टाव्हरे यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सहशिक्षक वैजयंता थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.या वेळी सर्व मुलांचे पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी कु.पृथ्वी नितीन ढोबळे,कु.कादंबरी काळूराम लबडे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. त्यांच्या पालकांच्या वतीने मुलांना शालेय साहित्य,गोड खाऊचे वाटप करण्यात आले.